Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर ०१, २०२१

ते 14 आदिवासी अद्याप बेपत्ता...! मंगेझरीची हृद्यद्रावक कथा




ते 14 आदिवासी अद्याप बेपत्ता...!

मंगेझरीची ह्रदयद्रावक कथा

महाराष्ट्राच्या सीमेवर देवरी तालुका. या तालुक्यातील मंगेझरी एक छोटेसे आदिवासी गाव. गावकऱ्यांसाठी 20 एप्रिल-1993 हा काळ दिवस ठरला. या दिवशी नक्षलवाद्यांनी दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी भूसुंरूग स्फोट घडविला. या नक्षली स्फोटाची आठवडाभर चौकशी चालली. त्यासाठी गावातील 14 लोकांना पोलिसांनी नेले. 20, 21, 22 एप्रिल तीन दिवस पोलिसांचा कहर सुरु होता.महिलांनाही नेले होते. सर्वांना सोडले.14 जणांना सोडले नाही.चौकशी चालू आहे असे सांगत. तेव्हापासून ते परतले नाहीत. घरवाले प्रतीक्षा करून थकले. अडीच दशकं उलटली. पत्नी, मुलंबाळं सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत. सरकारी यंत्रणांकडे सारखी विचारणा आहे. त्यांचे अश्रू आटले. तरी शोध नाही. सामाजिक व राजकीय नेते आले. त्यांनी घटनेचं भरपूर राजकारण केलं. कोणीच न्याय दिला नाही. आजच्या घडीला ते न्यायाविना आहेत. काही महिला विधवाही नाहीत. पतीही नाहीत. तब्बल सात वर्षानंतर अनेकींनी कागदोपत्री विधवा नोंद केली. विधवा नोंदीशिवाय सरकारी योजनेचा लाभ नाही. हा सरकारी यंत्रणांचा दबाव. व्यवस्थेपुढे त्यांचा नाईलाज झाला. त्या तांत्रिक दृष्ट्या हरल्या. तरी स्वत:ला विधवा मानावयास तयार नाहीत.आमचे नशिब म्हणून सुटकेचा निश्वास सोडतात. अजीबोगरीब स्थिती म्हणतात. ती अशी ! सर्वांना न्याय हवा. न्याय हा त्याचा अधिकार. त्या अधिकाराला आदिवासी मुकलेत. गोंदिया जिल्ह्यात अशी दोन गावं माहित आहेत. एक बेवारटोला. दुसरा मंगेझरी. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात किती असतील. त्यांचा अंदाज नाही. न्याय मागण्याची हिंमत नाही. कोणी हिंमत केली.तर नक्षली समर्थक हा ठप्पा. मग पोलिसी यातनांचा सामना. त्यामुळे मौन राहण्याचा मार्ग निवडतात. मंगेझरी अपवाद आहे. न्याय मागत आहे.

माणूसकी हरवली.....!

उपरोक्त दोन गावात असंच घडलं. बेवारटोल्यात 17-18 वर्षाच्या चार तरण्या पोरी बेपत्ता आहेत. त्या गावाची कहाणी वेगळीच आहे. मंगेझरीतील 14 आदिवासी कुटुबांना न्याय मिळाला नाही. पोलिसांनी मारलं की नक्षलवाद्यांनी पळविलं. उत्तर नाही. गुढ कायम आहे. भरपाई सोडा۔ सरकारी यंत्रणाकडून साधी विचारपूस नाही .कुटूंबियांना धीराचे दोन शब्द नाहीत. आजही आठवणीने नातेवाईकांचे डोळे पानावतात. अश्रू टपकतात. नक्षली बनले असते. तर कधीतरी घराकडे फिरकले असते ना जी. हा त्यांचा भाबडा सवाल ! पोलिसांनीच काही तरी काळंबेरं केलं असावं. हा त्यांचा संशय. आजही तो कायम आहे. त्यांच्या संशयात दम आहे. मात्र ते पडले अशिक्षित. तेवढेच गरीब. दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. ते न्यायासाठी कसे लढणार. जयभीम चित्रपट देशभर गाजत आहे. तिथे पिडितांना अँड.चंद्रु नायक मिळाला. इथं कुणी मिळाला नाही. हे मंगेझरीतील आदिवासींचं दुर्दैव. खटला चालवणारा इमानदार भेटला नाही. भरपाई त्यांच्या पदरात पडलीच नाही. कुटुंबातील कमावता गेला. तर त्या कुटुंबाची अवस्था काय होते. इथं त्या अवस्थेत 14 कुटुब होरपळत आहेत. प्रत्येक कुटुंबांच्या वेदना वेगवेगळ्या आहेत. स्वतंत्र बातम्यांचे विषय आहेत. त्या कधी बाहेर आल्याच नाहीत. कमावता पुरूष नाही. कमावत्याविना कशा जगतात. त्या आदिवासी माता-भगिनी. त्यांच्या कथा वेदनादायक आहेत. एक-दोन नशिबवान. त्यांनी परिवार सावरला. बाकींच्याचे हाल आहेत. पत्रकारितेत नवखे असलेल्यांनी या खेड्यांना भेटी द्याव्यात. या घटनांचा अभ्यास करावा. केस स्टडी म्हणून खूप काही शिकता येईल. अलिकडे पत्रकारितेत मिशन घटले. कमिशन वाढले. त्यामुळे आदिवासींना न्याय नाही. त्याचा हा सर्वात मोठा पुरावा होय.


ते दुर्दैवी 14 जण ..!

कोणी मारले की पळविले. या प्रश्नावर काय सांगावे! स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसवाले आले. त्यांना घेवून गेले. पुढे काय झाले. ते पोलिसांनाच माहित. गावातील प्रत्येकांचे एकच उत्तर. मोजून पस्तीस घरें. लोकवस्ती दोनशे पाच. एक-दुसऱ्याच्या सुखदु:खात सहभागी.या घटनेने अख्खे गाव व्यथित आहे.एक दुसऱ्याला सावरत जगत आहे. गावातील त्या बेपत्ता 14 आदिवासींमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. एक बाप
आणि तीन मुलें. त्यात 1- तारसू ताराम, 2- बाबूलाल तारसू ताराम 3- नारूलाल तारसू ताराम, 4- संतलाल तारसू ताराम ,संतलाल हा आठव्या वर्गात शिकणारा मुलगा. 5-कुंवरलाल झाडू ताराम, 6- शामसाये रामू कुंभरे,7- धनीराम बकाराम आचले, 8- धुलीचंद नजरू होळी,9- दुलिचंद सकरू कोरेटी, 10-रामनाथ हिराशी हिचामी, 11- हनू एैकतू मडावी, 12- गेंदू पंचम नेताम,13- सोमा दुर्गू कोरेटी,14- दुबा कारू परतेकी यांचा समावेश आहे. हे नक्षली बनले असावेत असा पोलिस तर्क देतात. हा तर्क न पटणारा आहे. तीन भाऊ आहेत. त्यातले दोन तरुण. ते नक्षली बनले. तर कदाचित पटले असते. विद्यार्थी असलेल्या लहान भावाला आणि पन्नाशी ओलांडलेल्या बापाला नक्षलवादी कसे बनू देणार. परिवारातीस एक तरी परतला असता. नक्षलवाद्यांच्या इतिहासात अशी घटना नसेल. त्या परिवारात तेव्हा दीड वर्षाची  एकुलती मुलगी होती. तिचा सांभाळ आई आणि आजी सुरजाबाईने केला. सुरजाबाई आता 75 वर्षाची आहे. नातीसाठी घरजावई आणला. प्रत्येकांच्या  मन हेलाविणाऱ्या कथा आहेत. 


प्रकरण मॅनेज झालं....!

हे प्रकरण कोर्टात गेलं. नागपुरात ते मॅनेज झालं असा आरोप नारायणराव ताराम यांचा आहे. ते आदिवासी सेवा सोसायटीतील देवरी शाखेत व्यवस्थापक होते. सेवानिवृत्तीनंतर गावात राहतात. घटनेच्या क्षणा-क्षणाचे ते साक्षीदार. ते सर्वात अगोदर घटनास्थळी पोहचले. त्यांच्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले. गावाने प्रंचड यातना भोगल्या. तरी गाव सरकारी योजनांपासून दूर आहे. या त्यांच्या व्यथा आहेत. स्फोटात सात गावकरी दगावले. त्यांच्या परिवाराला पन्नास-पन्नास हजार मिळाले. परंतु बेपत्ता असणाऱ्यांच्या परिवाराला एक दमडी सुध्दा  मिळाली नाही. सरकार आदिवासींबाबत एवढी निष्ठूर का असावी. या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही.

स्फोटाची थोडक्यात घटना....!

20 एप्रिल-1993.रोज मंगळवार. देवरी बाजाराचा दिवस. नक्षल्यांनी सूरंग पेरून ठेवले होते. पोलिस व्हॅन टप्पात येताच स्फोट घडविला. क्षणात पोलिस व्हॅन हवेत उडाली. सर्वांनी किंकाळ्या फोडल्या.त्या हवेत विरल्या. 10 एसआरपी जवान शहीद झाले. 7 गावकरी ठार झाले. डझनावर महिला मुलें जखमी झाली.अवघ्या परिसरात थरकाप उडाला.ते स्थळ नजरेसमोर आले की अंगावर काटे उभे राहतात. दुसऱ्या दिवशी वृत संकलनासाठी सकाळीच  मंगेझरी गाठली. सोबत  सहकारी जयंत नरांजे,छायाचित्रकार बाळू नागभीडकर होते.भंडाऱ्यातून प्रा. एच.एच.पारधी यांना घेतले. दिवस उजाडण्यापूर्वी देवरीत पोहचलो.  पोलिसांनी  गाव सील केल्याचं कळलं. गावाकडे जाणारे रस्ते अडवून ठेवले होते. मुख्य मार्गाने जाताना पोलिसांनी अडविले. सर्व प्रयत्न करूनही नकारघंटा कायम होती. आमचा नाईलाज झाला. एका स्थानिकाने एक आड मार्ग सांगितला. त्या मार्गे वळलो. ओबडधाबड रस्ता बघून कार चालक नाराज झाला. मात्र दुसरा उपाय नव्हता. कसे तरी मंगेझरीत पोहचलो. तेव्हा गावकरी गांगरलेले होते.  थोडी फार माहिती हाती लागली. तो पर्यंत वर्धाचे एस.पी. संजय बर्वे पोहचले. ते फोटोग्राफरसह बघून डाफरले. सर्व मार्ग बंद असताना कसे पोहचले. पहिलाच प्रश्न ..! लोकमतमधून आलोत. कोणी अडविले नाही. गावात विचारणा झाली. कार्ड दाखविल्यावर सोडले. गावात नक्षली दबा धरून असावेत. धोका आहे. गावाची झडती होईपर्यंत बाहेरच्यांना प्रवेश नाही. पोलिस वगळून..!असे रागात उदगारले. आड मार्गे आले. एक शिपाई उदगारला. तेव्हा बर्वे आणखीच डाफरले. नक्षल्यांनी जागोजागी सूरुंग पेरून ठेवले आहेत. कमीजास्त घडलं असतं.तर पोलिसांवर ठपका. परताना मुख्य मार्गे जा. या शब्दात बजावले. त्यांची चिंता आणि राग आमच्या लक्षात आला. आम्ही चुक केली होती. सुदैवाने अनुचित काही घडलं नाही. तरी आम्ही थोडे चमकलो.  लगेच  पोलिसांजवळ थांबा असे  बजावले. गावाची झडती घेईपर्यत येवू नका. गावातही लपून असू शकतात. औपचारिकता पार पाडू द्या. तोपर्यंत लगेच वायरलेसवर मॅसेज सुरु झाला. कोणालाही सोडू नका. झडती सुरू असताना त्यांना संदेश आला. लगबगीने ते परतले. गावकऱ्यांशी आम्ही बोललो. ते केवळ एैकीव माहिती पलिकडे बोलत नव्हते.जे घटनास्थळी गेलेत . ते जखमींसोबत दवाखान्यात आहेत. एवढेच सांगत.

घटनास्थळी सन्नाटा होता...

 आम्ही लगबगीने घटनास्थळी पोहचलो. तिथे सूरूंग स्फोटाने वाहनाची झालेली अवस्था बघितली. सभोवार जंगल होते. उंच झाडे होती. काही झाडांवर मानवी अवयवांचे भाग लटकलेले  दिसले. त्यावरून स्फोटाची भीषणता  कळली. तिथे सन्नाटा होता. तेथून देवरी गाठली. ठाण्यात अधिकाऱ्याची वर्दळ वाढली होती. अधिकाऱ्यांकडून सोयींची माहिती दिली जात होती. रुग्णालयात एकिकडे शहीद पोलिसांची प्रेतं होती. बाजूला मृतक गावकऱ्याची प्रेतं आढळली. बाहेर नातेवाईकांचा आक्रोश  होता. या घटनेची माहिती
 नारायणराव ताराम यांना मुखोदगत आहे. ते आजही सांगतात पोलिस येण्यापुर्वी आम्ही घटनास्थळी पोहचलो. त्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले.या घटनेत नारायणराव यांनी भावसून,सासू आणि पुतण्या गमावला.मात्र मुलगा, मुलगी, दुसऱ्या एका भावसूनेला वाचविण्यात यश आले. गाडी चालू होती. डिझेल लिंकेज होते. ती गाडी  काडीने वायर खेचून  बंद केली. ती बंद केली नसती तर आगीचा भडका उडाला असता. व्हॅनमध्ये फसलेलेही जळाले असते. मंगेझरीत एसआरपी कॅम्प होता. मंगळवार बाजाराला व्हॅन जात असे. त्यात गावकरीपण कधीकधी जात. म्हैसूलीत 19 एप्रिलला लग्न झाले. दुसऱ्या दिवशी वरात येणार होती. त्यासाठी जाणारेही व्हॅनमध्ये बसले. तीन किलोमीटर अंतरावरील  कन्हाळगावात ते उतरणार होते. मात्र गावापासून एक किलोमीटर अंतरावरच स्फोट घडविला.  आवाज आला. पाठोपाठ धुराचे लोट दिसले. मंगेझरी पासून देवरी 11 किलोमीटर. तेथील पोलिस साडे तीन तासांनी घटनास्थळी पोहचली. तर 25 किलोमीटरवरून चिचगड पोलिस  अडीच तासांनी पोहचली होती. गोंदियाचे एसपी बाबासाहेब कंगाले हे बदलून गेले. त्यांच्या रिक्तपदी अरन्ना बदलून आले होते. ते रजेवर गेले.उपअधिक्षक माटे सुध्दा रजेवर.अशी संधी साधून स्फोट घडविला. त्यामुळे घटनास्थळी वर्धेतून बर्वे यांना यावे लागले होते. या प्रकरणात  देवरी दलमचा हात होता. पोलिसांनी त्याला दुजारा दिला. त्या आरोपींना अद्याप अटक नाही. मात्र 14 निरअपराधी आदिवासी  बेपत्ता आहेत. लोकशाहीचे चारही स्तंभ या गावात पराभूत आहेत. अठ्ठावीस वर्ष उलटले. न्याय नाही.  नेमके झाले काय कोणीच सांगत नाही.पोलिसांनी  हातवर केले. चौकशी करून सोडल्याचे सांगतात. आदिवासींच्या हिताच्या गप्पा मारणारे  मौन आहेत. मंगेझरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

-भूपेंद्र गणवीर
.....................BG.....................
Mangejharichi heartbreaking story


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.