Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

गरबा, दांडीयाप्रेमींची निराशा

नागपूर दि. 05 : जिल्ह्यात 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र दुर्गापुजा, दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवरात्र उत्सव साजरा करतांना सर्व नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी. गरबा दांडीया, सांस्कृतिक कार्यक्रम ( #Garba #disappointment #Dandiya lovers) आयोजित करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.

कोविड -19 च्या संसर्गजन्य रोगाचा विचार करता महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, आरोग्य विभाग यांचे आदेशान्वये ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथेचित पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मयादित स्वरूपाचे मंडप उभारावे. यावर्षीच्या नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची 2 फुट मर्यादेत असावी. शक्यतो घरातील धातु/ संगमरवर या मुर्तीचे पुजन करावे. शाडूची किंवा पर्यावरणपुरक मुर्ती असल्यास घरी विसर्जन करावे. शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी. आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावे. घरी विसर्जन शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनाच्या स्थळी विसर्जन करण्यात यावे.

नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही यांची खबरदारी घ्यावी. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. तसेच ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत जनजागृती करावी. गरबा दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे. साथरोग जसे कोरोना, मलेरिया, डेंग्यू, इतर आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छताबाबत जनजागृती करावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक समाज माध्यमाद्वारे प्रसारित करण्याची व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये ब्रेक’ द चेन’ अंतर्गत सुधारित सूचनाचे काटेकारेपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.

देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विर्सजनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुतीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

स्थानिक प्रशासन, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग, गाव समितीनिहाय मुर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीस कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी

कोविड -19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनानी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाचे पालन न करणारी किंवा उल्लंघन करणारी कोणतेही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा, 1987 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असेल, असे मानण्यात येईल. हा आदेश महानगर पालिका क्षेत्र वगळून नागपूर जिल्ह्यांसाठी लागू असेल, असे विमला आर. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कळविले आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.