पंजाबात खेला.....!
कॉंग्रेसने पंजाबात खेला केला. कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. इतक्या सफाईने फेरफार केला. चरणजितसिंग चन्नी यांच्या डोक्यावर सीएमचा ताज चढला. या घटनेने इतिहास घडला. वर्तमानात देशातील ऐकमेव अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री भेटला. स्वातंत्र्यानंतर या देशाला आठ अनुसूचित जातीचे मुख्यमंत्री मिळाले. चरणजित चन्नी नववे आहेत. त्यापैकी सात मुख्यमंत्री कॉंग्रेसने दिले.एक बसपा, एक जदयूचा मुख्यमंत्री झाला. बिहारात तीन, महाराष्ट्र, आंध्र , उत्तरप्रदेश, राजस्थान व तामीळनाडूत प्रत्येकी एक मुख्यमंत्री झाला. त्यानंतर आता पंजाबने नंबर लावला. हिंदुत्व आक्रमक असताना कॉंग्रेसने ही खेळी केली. या खेळीने कॉंग्रेसवाले उत्साहित आहेत. भाजपची किरकिरी झाली. हिंदुत्व अजेंड्यावर ठोसा पडला. उत्तर प्रदेशात धुराचे ढग वाढले. त्यांनी चिंतेत भर घातली. लगेच योगी आदित्यनाथ यांनी डझनावर ट्वीटचे बार सोडले. त्यावर आंबेडकरी विचारवंत दिलीप मंडल बोलले. खेळ खूर्चीचा झाला. अन् मौर्य बसले तर...! या शंकेने योगींची धकधक वाढली. ट्वीटवर ट्वीट केले. त्यातून आंबेडकरी भावना व्यक्त केल्या. खेळी पंजाबात झाली. पडसाद उत्तर प्रदेशात उमटले. मायावतींना सुध्दा बोलावे लागले. या खेळीची देशभर चर्चा आहे. योगींनी मंत्रीमंडळ विस्तार केला. त्यात अनुसूचित जातींना प्राधान्य दिले.तसेच प्राधान्य पंजाब मंत्रीमंडळात झळकले. हिंदुत्वाचे फंडे जोरात असताना अचानक त्यात बदल आले. अनुसूचित जातीचे फंडे जोर धरू लागलेत. ही बाब राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. या खेळीने संघ- भाजप नॅरेटिव्हला धक्के बसू लागले. त्यामुळेच भाजपला उत्तरप्रदेशची निवडणूक जड जात आहे.
छुपा मास्टरस्टोक.....!
पंजाब म्हणजे कॅप्टन अमरिंदरसिंग. हे समिकरण . पक्षश्रेष्टींनी हा भ्रम तोडला. त्यांचा राजीनामा घेतला. ही जोखीम होती. ती कॉंग्रेसने उचलली. त्यामागे होता छुपा मास्टरस्टोक. या खेळीने अब पंजाब हमारा असा संदेश दिला. सोबत अनेक राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये जोष भरला. तो वेगळा. पंजाबात शिरोमणी अकाली दल- बसपाची युती. पहिला धक्का त्या युतीला दिला. दुसरा धक्का आम आदमी पार्टीला बसला. आपची हवाच काढली. पहिल्याच पत्रकार परिषदेत चन्नी उदगारले. मी आम आदमी. गरीब मुख्यमंत्री. राहुल गांधी क्रांतीकारी नेता. त्यामुळे माझी निवड झाली. थकित वीज, पाणी बिल माफ. मी. शेतकऱ्यांसोबत. त्यांचे आंदोलन रास्त. केंद्र सरकारने मागण्या मान्य कराव्या. वीज, पाणी बिलावर राजकारण करणाऱ्या आप पार्टीला चित केले. एका दगडात अनेक पक्षी मारले.असे म्हटले तर अतिशोयोक्ती होणार नाही. भाजपने 2017 पासून दलितांच्या घरी पंगती सुरु केल्या. त्यांची सुरुवात उत्तर प्रदेशातून.पश्चिम बंगालातही त्या सुरु होत्या.
जेवनावळींचे बाजारीकरण...
भाजपने जेवनावळींचे जोरात बाजारीकरण केले. शहा-नड्डा बैठक मारून जेवतानाचे छायाचित्र काढले जात. ते टीव्हीवर वारंवार झळकवित. त्या भाजप नेत्यांना ही निवड झोंबली. काही जणांनी टीका केली. दिखावी निवड संबोधले. दिखावी का असेना तुम्हाला कोणी रोखले होते. भाजपचे डझनावर राज्यात मुख्यमंत्री आहेत. काही राज्यात अलिकडेच मुख्यमंत्री बदलले. त्यात एकही अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री नाही. मुस्लिम नाही हे तुमच्या तत्वात नाही.ते एकादाचे समजता येईल. मात्र ज्यांच्यासोबत जेवनावळी उरकता. त्यांच्यातील मुख्यमंत्री का दिला नाही. हे भाजपसाठी अडचणीचे ठरणार . पंतप्रधान अयोध्येत जातात. सफाई कामगारांचे पाय धुतात. ते तासंतास मीडियावर दाखविले जाते. निवडणुकीच्या धामधुमित बांगला देशात जातात. दलित प्रेम उफाळून आल्याचे भासवितात. कारण त्यांची मते हवित. देण्याची वेळ येते. तेव्हा हात आखडता घेण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे. त्यामुळे जे कॉंग्रेसला जमले. ते भाजपला जमले नाही. ते काही असो पंजाबात आतापर्यंत जे मुख्यमंत्री झाले. ते महालातील झाले. ते सहज उपलब्ध नव्हते. साध्या घरात राहणारा मुख्यमंत्री पहिल्यादा मिळाला. त्यावरही मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, माझा बेड गाडीतच लागला असतो. त्यामुळे भेटीसाठी सदैव उपलब्ध राहीन. मी दलित नाही. आंबेडकरवादी मुख्यमंत्री असे सांगून बदलत्या पिढीसोबत ते नाते जोडतात. सुरक्षा लवाजमा घटवितात.
महंतशाही हटविणारा पंजाब
पंजाबात एकेकाळी हिंदू महतांचे वर्चस्व होते. सरदार मास्टर तारासिंग यांनी त्या विरोधात लढा दिला. शिख धर्माला स्वतंत्र मान्यता मिळवून दिली. शिख धर्म हिंदू धर्माचा भाग नाही. हे ठणकावून सांगितले. तसेच महंतांचे वर्चस्वही संपविले. अकाली दलाला शक्ती देण्याचे काम केले. शिख धर्मातील अनेक जातींना अनुसूचित जातीच्या सवलती मिळवून देण्यातही ते आघाडीवर होते. त्यामळे अनुसूचित जातींची अकाली दलासोबत जवळीक वाढली. पंजाबातील तरूण पिढीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रभाव आहे. डॉ.आंबेडकरांनी ऑक्टोबर-1951 मध्ये पंजाबचा तीन दिवसाचा दौरा केला होता.रविदासी व वाल्मिकी समाज त्यांना मानणारा आहे. त्या काळात सेठ किसनलाल,के.सी. करतारसिंह, गुरुदास आलम सारखी मंडळी त्यांच्या संपर्कात होती. आजही अनुसूचित जातींवर आंबेडकरी विचारांचा प्रभाव आहे. आंबेडकरांच्या नावावर पंजाबात भव्य म्यूझियम उभारला जात आहे. तो देशातील दुसरा मोठा म्यूझियम राहील. 27 एकरात तो राहणार आहे. या कपूरतळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेले होते. तिथे जंगी सभा झाली होती.तिथे ते साकारत आहे. पंजाब 3 कोटी लोकसंख्येचा प्रदेश. त्या पंजाबात एक तृतियांस अनुसूचित जातीची लेकसंख्या. समाजकल्याणचा 1385 कोटीचा बजेट. दोन लाखावर विद्यार्थी शिष्यवृत्ती उचलतात. अनेक विदेशात आहेत.अनिवासी भारतीय.सेनेतही 90 टक्के हा समाज. हे सगळे हेरून कॉंग्रेसची ही पंजाब खेळी. ती किती राज्यात प्रभाव टाकेल. ते भविष्यात कळेल. सध्या अनेक राज्यात हिंदुत्व नॅरेटिव्ह बदलण्यास भाग पाडेल.तसे संकेत आहेत. त्यात ओबीसी जनगनणेचा मुद्दा आणखी सहाय्यभूत ठरेल.
- भूपेंद्र गणवीर
....................BG...................