आपलं मुल दिव्यांग आहे हे सर्वप्रथम आई-वडिलांनी स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे
ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये डॉ. उज्वला मंगरूळकर
प्रत्येकात उणिवा असतातच मात्र दिव्यांगांच्या उणिवांवर बोट ठेवले जाते. बिच्चारा समजून कीव न करता त्यांच्यातील दिव्य गुण शोधले पाहिजे, आपलं मुलं दिव्यांग आहे हे सर्वप्रथम आई-वडिलांनी स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी धीर ठेवणे तसेच एकमेकांना दोष न देणे फार महत्वाचे आहे. ग्रामायण प्रतिष्ठानच्या ज्ञान गाथे च्या 49 व्या भागात डॉ. उज्ज्वला मंगरुळकर यांनी दिव्यांगांचे संगोपन आणि त्यांच्या प्रती समाजाची बांधिलकी या विषयावर प्रबोधन केले.
7-8 महिन्यानंतर मुलातील दोष हळूहळू दिसू लागतात. जितक्या लवकर आपण थेरपी सुरू करू तितका मुलांमधे लवकरात लवकर बदल दिसून येतो. ही मुले फार अस्थिर असतात. डोक्यात वादळ असते. एक्युपेशनल थेरपी द्वारे अनेक ऍक्टिव्हिटीज मुलांकडून करून घेतल्या जातात. जसे मणी ओवणे, दाब देणे, क्रम लावणे, मॅच करणे, वेगवेगळे आकार एकत्रित करणे, प्लास्टिक, लाकडी व स्टील खेळण्यांच्या माध्यमातून हलके-जड ओळखणे. अशा अनेक कृतीमुळे मुले हळू हळू शांत होत एकाच ठिकाणी बसायला लागतात. स्पीच डेव्हलप होते, नजर स्थिर होत जाते, टॉयलेट ट्रेनिंग अशा अनेक गोष्टी मुले शिकतात. मुलांच्या वर्तनात स्थिरता येते.
या मुलांना बोलता येत नसले तरी समजत असतं, त्यामुळे घरात सर्वांनी प्रत्येक वस्तू बद्दल, कृती बद्दल त्यांच्याशी बोलत राहणे आवश्यक आहे. ही मुले थोडी उशिरा जेव्हा बोलू लागतात तेव्हा हा शब्दसंग्रह त्यांच्या उपयोगी येतो.
एक्युपेशनल थेरपी सेंटर वर आईला देखील ट्रेनिंग दिल्या जाते. रोज एक तास सेंटरवर आई मुलासोबत घालविते. वडिलांची जबाबदारी ही तेवढीच महत्वाची आहे असे डॉक्टरांनी नमूद केले. गार्डन थेरपी, ग्रुप थेरपी, पोहणे, खेळ, स्टेज शो या माध्यमातून मुलांमधे आत्मविश्वास वाढीस लागतो.
दिव्यांग मुलांना सामान्य मुलांच्या शाळेतच टाकायला हवे. अनेक शाळा देखील या उपक्रमाला सहाय्य करीत आहेत. ही मुले जेवढी शिकवाल तेवढी शिकतात हे त्यांनी श्रोत्यांसमोर काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
या मुलांना सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ऑटिस्टिक मुलांना खास करून संधी दिली जाते. ही मुले अतिशय प्रामाणिक, निर्व्यसनी आणि एकाग्रतेने काम करणारी असतात. नागपूरमध्ये इंद्रधनू, संवेदना यासारख्या संस्था या विषयात छान काम करत आहे असेही डॉक्टर मंगरूळकर यांनी विशेषत्वाने नमूद केले.
आई-वडिलांनी या मुलांशी सामान्य मुलांप्रमाणेच वागावे ही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. मुलांना दुकानात पाठवणे, लहान-सहान घरातील कामे सांगावीत. त्यातून मुले व्यवहार शिकतात आणि व्यस्त राहतात. त्याचप्रमाणे या मुलांचे फाजील लाड करू नये तसेच त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष देखील करू नये असे त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
समाजाने दिव्यांगांना बिच्चारा म्हणणे सोडावे, समजत नाही म्हणून हिणवू नये. आई-वडिलांना उगीचचे सल्ले देऊ नये. जमेल तर मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करावा, अशी समज डॉक्टरांनी समाजाला दिली.
शासकीय मेडिकल कॉलेजमधून एक्युपेशनल थेरपी हा अभ्यासक्रम केल्यानंतर डॉ. विक्रम मरवाह यांचे सल्यानुसार डॉ. शशिकला यांच्या मार्गदर्शनात मॅडमने थेरपी सेंटर सुरू केले.
कोरोना काळात डॉ. मंगरूळकर ऑनलाइन थेरपी सातत्याने देत होत्या. संपर्कातील मुलांच्या आई-वडिलांशी त्या संपर्कात होत्या. गरीब घरातील दिव्यांग मुलाला देखील ही थेरपी परवडण्यासारखी आहे असेही त्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. त्यांच्याकडे अशा मुलांना सवलत देखील देण्यात येते त्याचा संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठान ने केले आहे.
संपर्कासाठी फोन नंबर 9923830078