सध्या अभ्यासाऐवजी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या!
- डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पालकांना आवाहन
- मनपातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यासाठी "मुलांमधील कोव्हीड संसर्ग" प्रशिक्षण
- तिसरी लाट थोपविण्यासाठी "माझी मुलं, माझी जबाबदारी"
चंद्रपूर, ता. १० : कोरोनाची तिसरी लाट लहान बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. त्यामुळे आशा स्थितीत आतापासून सावध असणे गरजेचे आहे. या काळात बालकांच्या मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांनी सुद्धा बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कोणतीही लक्षणे दिसतात डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आयएपीच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राणी हिराई सभागृहात गुरुवारी (ता. १०) आरोग्य कर्मचाऱ्यासाठी "मुलांमधील कोव्हीड संसर्ग, काळजी आणि उपाययोजना संदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्याना मार्गदर्शन केले. मंचावर मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे उपस्थित होते. प्रशिक्षणात डॉ. नरेंद्र जनबंधू, नागरी आरोग्य केंद्र २ रामनगरच्या आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी भारत, नागरी आरोग्य केंद्र १ इंदिरानगरच्या आरोग्य अधिकारी जयश्री वाडे, आरोग्य अधिकारी अश्विनी येडे, डॉ. सोहा अली, डॉ. अतुल चटके आदीसह मनपाच्या सर्वेक्षण परिचारिका, अधिपरिचारिका, पब्लिक हेल्थ नर्स, बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कोव्हिड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचे प्रमाण दिसून आले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असेल, असे तज्ञ सांगत आहेत. तिसरी लाट येण्यापूर्वीच मनपाचे आरोग्य विभाग पूर्वतयारीने सज्ज झाले आहे. कोरोनापासून मुलांचा बचाव करताना आणि उपचार करताना वैद्यकीय चमूंनी कोणती काळजी घ्यावी, लहान मुलांमध्ये आढळणारी कोव्हिड-19ची लक्षणे कोणती? स्तनदा मातांनी काळजी कशी घ्यावी, लक्षणे कशी ओळखावीत, आदींवर आयएपीच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
मुलाना ताप, घसा खवखवणे, पोट बिघडणं, उलट्या या सोबतच इतर काही लक्षणं आढळून येत असल्यास सर्वप्रथम आईच्या लक्षात येते. लहान मुलांना शब्द सापडत नाहीत. फक्त ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या आईला, वडिलांना, आजी-आजोबांना आपल्या भावना व्यक्त करतात. त्यामुळे आरोग्य केंद्रात येणाऱ्या माताशी संवाद साधा. त्यांना बोलतं करून आजाराच्या काय समस्या आहेत, हे जाणून घ्या. त्यानुसार उपचार करा, असा सल्ला डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी दिला. वजन कमी झालं किंवा वजन वाढलं या दोन्ही गोष्टी जर असतील तरी याकडे लक्ष देण्याची पालकांना गरज आहे. शिवाय डोळे लाल होणे किंवा हातापायाला सूज आली असेल, बाळाची लघवी कमी होत असेल, त्याच्यामध्ये सतत चिडचिड वाढली असेलतर घरातल्या बाळाची काळजी घेणाऱ्या आईने वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सांगितले.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देणार आहे. जेणेकरुन ते लवकरात लवकर कोविडची बालरोग प्रकरणे ओळखू शकतील आणि प्रभावी क्षेत्रात जनजागृती करू शकतील, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली.
सामान्य लक्षणे
- ताप
- कोरडा खोकला, घसा खवखवणे
- धाप लागणं
- तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं
वेगळी लक्षणे
- पोट बिघडणं
- उलट्या होणे
- डोकेदुखी
- बेशुद्ध पडणे
- सतत चिडचिड करणे
- अंगावर पुरळ येणं
- डोळे लाल होणं
- हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं
सामान्य लक्षणे
- ताप
- कोरडा खोकला, घसा खवखवणे
- धाप लागणं
- तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं
वेगळी लक्षणे
- पोट बिघडणं
- उलट्या होणे
- डोकेदुखी
- बेशुद्ध पडणे
- सतत चिडचिड करणे
- अंगावर पुरळ येणं
- डोळे लाल होणं
- हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं