किल्ले शिवनेरीवर आढळले युद्धनीती शास्त्रानुसार वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाचे दुर्मीळ अवशेष
जुन्नर/आनंद कांबळे
जुन्नर : अनेक वेळा आपण ऐतिहासिक स्थळांना,वास्तुंना भेट देत असतो.त्यावेळी अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी आपल्या नजरेतून नकळतपणे निसटून जातात किंवा त्या गोष्टीचे महत्व किंवा वैशिष्ट्य माहीत नसल्याने आपण पाहूनही जास्त लक्ष न देता पुढे जात असतो.अशाच काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या युद्धनीती शास्त्रानुसार बनवण्यात आलेल्या बांधकामाचे अवशेष किल्ले शिवनेरी वर आढळून आले आहेत.
"जुन्नरी कट्टा" या इतिहासावर आधारित चर्चा करण्यासाठीच्या साप्ताहिक बैठकीत ठरल्यानुसार सदस्यांसाठी किल्ले शिवनेरीचे दुर्ग वाचन आयोजित केले होते.यामध्ये शिवाजी ट्रेल,जुन्नर विभाग चे श्री मोहन रासने,अोंकार ढाके,रमेश खरमाळे,विजय कोल्हे व सुमारे ३५ ते ४० जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.यावेळी किल्ल्याच्या पश्चिमेच्या दिशेस असणार्या तटबंदीवर साधारणतः २५०ते ३०० फूट सरळ कड्यावर बांधलेल्या 'चर्या' दिसल्या.इतक्या वर्षांनंतरही त्या चर्यांवरचे प्लास्टर अजूनही सुस्थितीत असलेले दिसले. महाराष्ट्रात असणार्या किल्ल्यांवर एकाही गडावर न आढळलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली चर्या व त्या चर्यांमध्ये असलेल्या 'जंग्या' असा वेगळाच व महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ असा मध्ययुगीन कालखंडातील युद्धनीतीशास्रावर आधारीत बांधकामाचा नमुना शिवनेरीवर दिसून आल्याचे दुर्ग अभ्यासक विनायक खोत यांनी सांगितले.
या बांधकाम शैली बद्दल मार्गदर्शक मिलिंद क्षीरसागर, प्रा. सचिन जोशी व इतिहास अभ्यासक प्रा. प्र के घाणेकर यांनी प्रकाश टाकला.
१) चर्या- गडकोटांवर संरक्षणासाठी जी तटबंदी व बुरूज बांधलेले असतात त्या तट व बुरुजांच्या सर्वात वरच्या भागात साधारणत एक फूट ते अडीच फूट उंचीचे वेगवेगळ्या आकाराचे विशेषतः कमळ पाकळीचा आकाराचे बांधकाम म्हणजे चर्या होय.या चर्यांचा उपयोग प्रवेशद्वारांचा वरील बाजूस सुशोभनासाठी वा इतर विशिष्ट कार्यांसाठी (१७ व्या शतकात)केलेला दिसून येतो. तसेच तट व बुरुजांवरील चर्या या गस्तीच्या सैनिकांना फांजी किंवा गस्तीच्या मार्गावरून फिरत असताना तटाच्या पलीकडच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच युध्द प्रसंगी दोन चर्यांच्या मधील मोकळ्या जागेतून बाणांचा मारा करण्यासाठी झालेला इतिहासात वाचावयास मिळतो .
२) जंग्या- तटबंदीच्या व बुरुजांच्या चर्याखालील भिंतीचा भाग की ज्यामधून फांजीवर बसून अथवा उभे राहून शत्रूवर बाणांचा, बंदुकांचा,आगीच्या पलोत्यांचा मारा करता येईल अशी तटाच्या भिंतीत उतरत्या रचनेची तयार केलेली छिद्रे म्हणजे जंग्या होत. ज्यांची रूंदी साधारणतः ६ इंच व उंची ८ ते १२ इंच व तट बुरुजांच्या आरपार असणारे छिद्र की ज्यामधून गनिमावर अचूकपणे माराही करता येईल व मारा करणारा दिसणारही नाही अशा पध्दतीचे केलेले बांधकाम म्हणजे जंग्या होय.
बहमनी राज्यातील ज्या राजधान्या ज्याच्यामध्ये गुलबर्गा आणि बिदर या दोन किल्ल्यांवर मात्र आपणास चर्यांमध्ये जंग्या असलेला बांधकामाचा प्रकार पाहावयास मिळतात परंतु तटाच्या भिंतीत असलेल्या चर्यांमध्ये सुद्धा जंग्या आढळून आल्याचे किंबहुना दुर्ग संवर्धनातील मार्गदर्शक, इतिहास अभ्यासक व तज्ञ यांचे मते अशा स्वरुपाचे युद्धनीतीला अनुसरुन असलेले चर्यांमधील जंग्या या महाराष्ट्रात जवळपास पाहायला मिळत नाही. तर कदाचित नळ दुर्गावर अशा प्रकारच्या चर्या असण्याची शक्यता काही अभ्यासकांनी बोलून दाखविली.