जन्म दिन विशेष
प्रचंड साहस आणि पराक्रमाचं दुसरे नाव म्हणजे लाचित बरफुकन. महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांना मान,आदर आहे अगदी तसाच सन्मान सुदूर पूर्वेकडील ब्रम्हपुत्रेच्या तीरावरील आसाम राज्यात वीर सेनापती लासित बरफुकन यांना आहे. मुघलांनी अर्धा भारत आपल्या गुलामगिरीत आणला पण आसाम त्यांना शेवटपर्यंत जिंकता आले नाही. आसाम अजेय राहिले !
प्रचंड फौजेनिशी आसाम पादाक्रांत करण्याच्या उद्देशाने आलेल्या मुघलांना गुवाहाटी जवळ झालेल्या तुंबळ युद्धात ब्राम्हपुत्रेचं पाणी अक्षरशः पाजणारा वीर लासित इतिहासात अजर अमर झाला. चाळीस हजार मुघली सेना पालापाचोळ्या सारखी उडाली अन पळाली ती जीवाच्या आकांताने पुनः आसामात आलीच नाही. असामच्या काळ्या जादूने जादू केली . संपूर्ण हिंदोस्ता जिंकणारी बडी मुघली सल्तनत येथे सपशेल नतमस्तक झाली , अहोम राज्यापुढे , त्याच्या वीर सेनापती लसित बरफुकन पुढे . या युद्धाचे जगप्रसिद्ध नाव आहे. “सराईघाटचे युद्ध ” सन 1671 .
मोमाई तामुली बारबरुआ यांचे घरी दिनांक 24 नोवेंबर 1622 रोजी जन्माला आलेले हे सातवे अपत्य आपल्या मातृपितृ कुळाबरोबरच देशाचा ही गौरव ठरले. आपल्या वडीलांप्रमाणे लहानपणापासून मेधावी बुद्धिमत्ता घेऊन हा बालक जन्माला आला. पिता राजा प्रतापसिंहाच्या दरबारातील हे जबाबदार अधिकारी बरुआ. लहानपणापासून वारंवार होणारे मुघलांचे हल्ले लासित पहात आला होता. आपल्या देशावर , आपल्या राज्यावर आलेले हे परकीय संकट त्याला अस्वस्थ करी. आपणही मोठे होऊन सैन्यात भरती व्हावे आणि दुष्ट मुघलांना चांगला धडा शिकवावा असे त्याचे ध्येय ठरले होते . तरुण लासित पित्याच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विद्येत प्रवीण झाला . मनाचा दिलदार आणि उत्साहाचा खळखळता निर्झर म्हणजे लासित. अहोम राजे चक्रदेव सिंहांनी त्याच्यातील कर्णधाराचे गुण ओळखले, पारख केली. बल आणि बुध्दीला संयम आणि विवेकाची जोड मिळाल्याने लासित लाखात एक ठरला.
त्यावेळी जवळजवळ संपूर्ण भारतावर क्रूरकर्मा औरंगजेबाची सत्ता होती. बंगालपर्यंत विजयी होत असलेले मुघल सैन्य पुढे मात्र असफल होत असे. औरंगजेबाने आसामच्या या अहोम राज्यावर अनेक आक्रमणे केली. परंतु ती सर्व आक्रमणे बलशाली अहोम सैन्याने परत फिरवली, पराभूत करून परतावून लावली. अहोम सैन्याचे वैशिष्ट्य असलेली थलसेना ,या सेनेतील अधिकारी आणि त्यांची पद नावे मोठी रंजक आहेत. शंभर शिपायांचा प्रमुखाला साइकिया म्हणत , एक हजार शिपायांचा प्रमुख हा हजारिका असे., तीन हजार शिपायानंचे नेतृत्व राजखोवा करीत असे. सहा हजारी तो फुकन आणि या सगळ्यांचा सेनापती तो बरफुकन . अशी अहोम सेनेची मांडणी होती. वीर लासित, सैन्याची एक एक पायरी वर चढत होता. बरुआ पद अत्यंत महत्वाचे असे, राजाच्या निजी सहायक पद.. त्यानंतर घोडा बरुआ म्हणजे घोडेस्वार दल प्रमुख झाला. राजा चक्रध्वज सिंहांनी त्याला सोन्याची मुठ असलेली अहोम तलवार आणि उंची वस्त्रे देऊन विधिवत अहोम राज्याचा सेनापती म्हणून नियुक्त केले.
अहोम राज्य मुख्यत ब्राम्ह्पुत्रेच्या काठावर विस्तारले होते. सन 1230 ते 1825 पर्यंत जवळजवळ 600 वर्षे ते अपराजित होते. भारतावर दीर्घकाळ शासन करणारे मुघल शासक देखील आसामच्या अहोम राजवटीला नष्ट करू शकले नव्हते . वेळोवेळी मुघल सैन्य आक्रमण करी अहोम राज्याचा भाग जिंकून घेई. अहोम शासनाची राजधानी असलेल्या जोरहाट जवळील गड्गाव येथपर्यंतचा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला होता. पण अहोम सेना पुन्हा त्यांचा पराभव करीत त्यांना थेट गुवाहाटी पर्यंत मागे लोटत जाई. औरंगजेबाच्या राज्यकाळात त्याने अनेक आक्रमणे केली. पण संपूर्ण आसाम जिंकण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहीली .
सन 1671 त्याने आपला पराक्रमी सरदार रामसिंहाला मोठ्या फौजेनिशी आसाम जिंकण्यासाठी पाठवले. इकडे राजा चक्रध्वजसिंहांनी देखील लाचित बरफुकनला प्रतीआक्रमणाची आज्ञा दिली. वीर लाचितने तडफेने बंदबारी आणि काजली नावाची दोन ठिकाणे मुघलांच्या हातून मुक्त केली. आणि युद्धात मिळालेल्या लुटीचे सामान आदी राजाकडे पाठवून दिली. त्यानंतर लगेच लाचित गुवाहाटी च्या दिशेने त्वरित निघाला. वाटेतील मुघलांच्या लष्करी छावण्या आणि सेनेचा पराभव करीत त्याने मुघलांच्या ताब्यातील गुवाहाटीवर हल्ला केला. अनपेक्षितपणे अहोम सैन्याच्या या आक्रमणाने बेसावध असलेल्या मुघलांचा पराभव झाला. इथे लाचितला मोठी लुट मिळाली. वस्तू आणि समान आणि इतर मौल्यवान वस्तू त्याने राजाकडे पाठवून दिल्या. लुटीत मिळालेली रोकड पैसा मात्र त्याने आपल्या सैनिकात वाटून दिला . आपल्या सेनानायकाचा दिलदारपणा आणि सैनिकाबद्दल असलेला कळवला पाहून अहोम सेनेत आनंद संचारला, त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. तेजपुर जवळ झालेल्या लढाईत तोफेचा गोळा लागून राम सिंहाचा भाचा मरण पावला. सततच्या पराभवाने मुघल सैन्यात बेदिली माजली . या उलट लाचितचे सैन्य एकजुट होते, आपल्या सेना नायाकावार त्यांचा द्रुढ विश्वास होता.
आता मात्र रामसिंह इरेला पेटला , कुठल्याही परीस्थित विजय मिळवायचाच त्यासाठी ‘साम दाम दंड भेदाचे’ शास्त्र त्याने उपसले. परत एकदा गुवाहाटी जिंकण्यासाठी त्याने कंबर कसली. अंगियातुठी नामक गावा नजीक अमिनगाव येथील अहोम किल्ला नुमा लष्करी ठाणे ताब्यात घेण्यासाठी मुघलीसेना दिन-दिन चे नारे लावत गुवाहाटीच्या दिशेने निघाली. परंतु हा किल्ला युधाकरिता पूर्ण सिद्ध नव्हता . किल्ला बनविण्याची जबाबदारी खुद्ध लाचितच्या मामाकडे होती. सेनानायाकाचा आदेश असताना ठाणेदाराने हे ठिकाण मजबूत करावयास हवे होते. मुघल सेना तेथे पोचण्याच्या आधी लाचित सायंकाळीच आमिनगावी पोचला. पाहतो तो काय ? अद्याप किल्ला पूर्ण झालाच नव्हता . ठाणेदाराने उपलब्द मजुरांकडून दिवसरात्र काम करविले परंतु अद्याप काम पूर्ण झालेच नव्हते. लाचित संतापला. तोंडावर गुवाहाटी गिळंकृत येणारी मुघलसेनेला थोपवायचे असेल तर येथेच हा किल्लाच थोपऊ शकणार होता. ‘माझा मामा देशापेक्षा श्रेष्ठ नाही’ असे म्हणत कामात हलगर्जी करण्याऱ्या मामाचा शिरच्छेद त्याने केला. त्याचा रुद्रावतार पाहून सर्व मजूर आणि सैन्य कामास लागले त्यांनी रातोरात किल्ला बांधून काढला. हा किल्ला ‘मोमाइ कटा गड’ या नावाने ओळखला जातो. दुसऱ्या दिवशी मुघल सेना येथे दाखल झाली. अहोम सेनेने पराक्रमाची शर्थ करित मुघल सेनापती रामसिंहला येथे पराभूत केले.
त्यानंतर रामसिंहाने सारिप खान यास सैन्याला नौकांच्या सहाय्याने ब्राम्हपुत्रे प्रवाहातून गुवाहाटी जिंकण्यासाठी पाठवले . रामसिंहाची हि चाल लक्षात येताच लाचितने देखील अहोम सेनेच्या नौका सिद्ध केल्या. सततच्या दगदग, अविश्रांत मेहनतीने त्याची तब्येत ढासळली होती. अंगात खूप ताप असताना त्याने आपला बिछाना युद्धनौकेवर नेला. त्याच्या उपस्थितीने अहोम सेनेत जोश संचारला. गुवाहाटीकडे वेगाने जाणाऱ्या मुघलांच्या नौकांना आता अहोम सेनेच्या तिखट तोफांचा सामना करावा लागला. गुवाहाटी जवळ सहज पोचलेल्या मुघल सेनेला अहोम सेनेचे हे अनपेक्षित आक्रमण धक्कादायक होते. काठावरील अहोम तोफांच्या गोळ्यांनी त्याच्या नौकांच्या चिंधड्या उडायला लागल्या. अहोम युद्ध नौका मुघल सैन्याला भिडल्या .हाथघाईची लढाई झाली. शेकडो मुघल सैनिक कापले गेले . ब्रम्हपुत्रा लाल झाली ती शत्रूच्या रक्ताने . बघता बघता मुघल सेनेची दाणादाण उडाली. रामसिंह आणि मुघल सेनेची प्रचंड हानी झाली. आसामच्या इतिहासातील मुघलांच्या आक्रमणचा शेवटचा अध्याय . अहोम आणि आसाम चिरकाल अपराजित राहिला. हा सुवर्ण इतिहास आपल्या पराक्रमाने लिहिणाऱ्या वीर सेना नायक लासित बरफुकन यांना शतकोटी विनम्र अभिवादन .
‘ मारिता मारिता मरे तो झुंजेन ’ हीच इथल्या पराक्रमी वीरांची ख्याती . लसित बरफुकन हा पराक्रमाचा असाच एक दीपस्तंभ !
-प्रसाद अनंत बरवे ,
(+917276051697)
नागपूर