मुंबईचे आयुक्त आय. एस. चहल यांची सूचना
* मुंबईच्या तज्ज्ञाकडून नागपूरच्या कोविडचा आढावा
* पालकमंत्री व गृहमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
* कोरोना प्रतिबंधासाठी ऑनलाईन समन्वयाचा वापर करा
नागपूर, दि. 4: कोरोनाच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी तपासणी करणे, क्वारंटाइन करणे आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईमध्ये उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूर येथे देखील झोननिहाय वॉर रूम तयार करून ‘एकछत्री समन्वयात’ या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत कोरोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी आज येथे केली.
नागपूर शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील कोरोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी श्री. चहल उच्चस्तरिय तज्ज्ञ मंडळासह आज नागपुरात दाखल झाले. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुढाकार घेत या मुंबईच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण केले. या पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मावळते पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीला जिल्ह्यातील सद्य:स्थितीबाबत पालकमंत्री नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील मृत्यूदर व बाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी कोरोना संदर्भात जिल्ह्यात सुरू असणाऱ्या चाचण्या उपाययोजना व तपासणीबाबत अहवाल सादर केला.
श्री. चहल यांनी शिष्टमंडळाच्यावतीने नागपूरमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी काही प्रमुख सूचना केल्या. यामध्ये चाचण्यांची संख्या आणखी वाढवण्यात याव्यात, आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर व्हावा, गंभीर रुग्ण संशयित रुग्ण यांच्यासाठीच फक्त अँटिजेन चाचणीचा वापर करण्यात यावा, अॅम्बुलन्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात यावी, खासगी असो वा सरकारी प्रत्येक हॉस्पिटल मध्ये वॉर रूम उघडल्या गेली पाहिजे, माहिती सदैव अद्ययावत झाली पाहिजे, गंभीर रुग्णाच्या इलाजाबाबतचे प्रत्येक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये साठवले गेले पाहिजे, प्रत्येक बाधितांचे विश्लेषण झाले पाहिजे, बेडची उपलब्धता ऑनलाईन पद्धतीने सर्वांना माहीत झाली पाहिजे, हॉस्पिटल्सची कॅन्टीन्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावी, हॉस्पिटलमधील स्वच्छतागृहाचे दर चार ते पाच तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, सोशल मीडियावर व अन्य माध्यमात येणाऱ्या चुकीच्या पोस्ट, बातम्यांचे खंडन करण्यात आले पाहिजे, आदी सूचनांचा समावेश आहे.
धारावी आणि मुंबईतील अन्य भागांमध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष झोपडपट्टीमध्ये जाऊन उपाययोजनांची पाहणी केली. त्यामुळे यंत्रणेत सुधारणा करता येते. नागपुरात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी अधिक वाढवाव्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ज्यांच्याकडे स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. राहण्याची व्यवस्था अपूर्ण आहे, अशा बाधितांच्या संपर्कातील नातेवाईकांना तातडीने अलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात यावे. याशिवाय कोरोना साखळी तुटणे शक्य नाही. संशयित रुग्णांना तात्काळ दाखल करून त्यांना लगेच उपचार मिळाले पाहिजेत. तसेच त्यांच्या अहवालाची उपलब्धता तात्काळ होईल यासाठी रात्री देखील काम सुरू राहिले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. वॉर रूम मधून सूचना जाणे व त्याचे एकत्रित विश्लेषण होणे आवश्यक आहे. वॉर रूममधून ज्या भागात उद्रेक आहे. त्या भागातील लोकप्रतिनिधींना देखील वस्तुस्थिती कळली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणच्या प्रसाधनगृहात निर्जंतुकीकरण मोठ्या प्रमाणात व वारंवार झाले पाहिजे, असेही त्यांनी सुचवले.
पालकमंत्री राऊत यांनी गरज पडल्यास ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील यंत्रणेत सहभागी होतील असे स्पष्ट केले. तसेच रशिया, चीन आदी ठिकाणावरून आलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या आणीबाणीच्या परिस्थितीत नियुक्ती करण्यात यावी, वर्धा व अन्य ठिकाणच्या खाजगी हॉस्पिटलशी संपर्क साधून मनुष्यबळ वापरण्यात यावे, निवृत्त झालेल्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात यावे, असे निर्देश दिले.
या बैठकीमध्ये झोननिहाय नियुक्त करण्यात आलेल्या सनदी अधिकारी वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक माधवी खोडे, खनिकर्म विभागाचे राममूर्ती, विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्य मनीषा खत्री यांनी गेल्या काही दिवसातील त्यांची निरीक्षणे सादर केली व सूचना मांडल्या.
श्री. चहल यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तर त्यांच्यासोबत आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत व यंत्रणेसोबत सद्य:स्थितीवर चर्चा केली.