थडीपवनी तेव्हा महापुराने गाजली.२९ वर्षानंतर बौध्द तरूण अरविंद बन्सोड हत्येने गाजत आहे. घटना घडली २७ मे-२०२० रोजी. आवाज गाजतो जूनच्या प्रारंभी. माणसाचा जीव कवडीमोल झाला. कोणीही यावे. निर्दयीपणे एकाद्याला खल्लास करावे. काय होता त्याचा दोष. सिलेंडर गोदामाचा फोटो काढणे. फोटो काढण्याची ही राक्षसी शिक्षा.वाटत नााही. चार-पाच तरूण असे काही करतील.पण हे घडले. सत्य की अर्धसत्य हे तपासात उघडकीस येईल. सीसी टिव्ही पुरावे नष्ठ करण्याची चर्चा आहे. त्यावरून संशय बळावतो. ' कर नाही त्याला डर कशाचा ' असं म्हणतात. मात्र डर आहे म्हणून एकएक पुरावा नष्ट तर केला जात नसेल.
ज्या पध्दतीने आरोपींनी घटना सांगितली. त्यास सीसी टीव्ही दृश्य सबळ पुरावे ठरले असते. त्यांचे निर्दोषत्व सिध्द करता आले असते. आरोपींच्या मते अरविंद विषारी औषधी घेवून आला. तुमच्या मारहाणीमुळे अपमान झाला. त्या कारणाने विष पितो म्हणत जहर प्याला. हा प्रकार गँस सिलेंडर एजेन्सीच्या थडीपवनी कार्यालयात घडला. त्याच कार्यालयात अरविंद बन्सोड व गजानन राऊत यांना मारहाण झाली. तेव्हा ग्राहक असतील तर एक-दोन किंवा चार. ते सुध्दा थडीपवनीचे. ओळखीचा कोणी नाही. तरी अपमान कसा झाला. आत्महत्येस प्रवृत्त करेल असा अपमान वाटत नाही. आरोपींची स्टोरी कुछ हजम नही होती .पण हे त्यांना सिध्द करावे लागेल.
काही मिनिटात गेम
गजानन म्हणतो. त्या मारहाणीनंतर आम्ही गावी जाण्याचे ठरविले. तेव्हा अरविंद म्हणाला, तु पेट्रोल भरून ये. एकदा मोबाईल मागून बघतो. लगेच पेट्रोल भरून आलो. बघतो तर मयूर व त्याचे साथीदार अरविंदला कारमध्ये कोंबताना दिसले. मी घाबरलो. मला येवू दिले नाही. त्यामुळे मी तडक गाव गाठले. बघितलेला प्रकार सांगितला. लगेच धिरजसोबत जलालखेड्याकडे निघालो. काही मिनिटांतच नेमके काय घडले असावे. त्याचा अंदाजच येत नव्हता.
आपबिती सांगितली...
मृतकाचा धाकटा भाऊ धिरज बन्सोड याने सांगितले. घटनेची माहिती कळताच जलालखेड्यातील आरोग्य केंद्रात पोहचलो. तेव्हा सांगण्यात आले. काटोलच्या रूग्णालयात पाठविले. लगेच तिकडे रवाना झालो. तिथे पोहचलो. तेव्हा रूग्णवाहिकेत टाकण्यात आले. दुपारचे दोन अडीज वाजले असावेत. मी डोक्याकडे व गजानन पायाकडे बसला. आरोपी रूग्णालयातच होते. मयूरला ओळखतो. त्यांच्यासोबत कारमध्ये तीन-चार जण होते. वाटेत अरविंदला घटनेची माहिती विचारली. तेव्हा सांगितले. चौघांनी मारले. मला विष पाजले. छातीला सारखा हात लावत होता. बटन काढून बघितले.तर सूज दिसली. कातडी लाल होती. रूग्णवाहिका नागपुरात पोहचली. तेव्हा चार वाजले असावेत. मेडिकलच्या आयसीयू वाँर्ड १४, बेड ९ वर दाखल केले. डाँक्टरांनी लघवीची पिशवी व सलाईन लावले. रात्री ११ वाजता श्वास घ्यावयास त्रास होत असल्याचे म्हणाला. आम्ही डाँक्टरकडे धावलो. माहिती देताच डाँक्टर, नर्स आल्या. त्यांनी कृत्रिम श्वास यंत्र लावला. हे सांगताना त्याला हुंदका आला. थोड्या वेळाने अरविंद बेशुध्द झाला. त्यानंतर बोलला नाही. २८ मे रोजी वडील जनार्धन आले. त्यांचे बोलणे झाले नाही. अरविंदच्या डोळ्यावर कापडी पट्या ठेवल्या होत्या.त्या कारणाने नजरानजरही झाली नाही.
ते चार तास...
धिरज म्हणतो, अरविंद याचा थडीपवनी, जलालखेडा ,काटोलपर्यंचा प्रवास आरोपींसोबत झाला. कारमध्येच त्याला विष पाजले असावे. छातीवर मारले . तो जिवंत राहू नये असाच आरोपींचा प्रयत्न होता. त्यांचे हावभाव तसेच होते. तो वाचला तर बिंग फुटेल अशी त्यांना भीती वाटत असावी.
मी ठाण्यात तक्रार करण्यास गेलो. तेव्हा तक्रार नोंदवून घेतली नाही. किशोर गेला. त्याची तक्रार घेतली. त्याला जास्त काही समजत नाही. कशीतरी सही करताे. त्याने तक्रारीची काँपी मागितली. ती दिली नाही. आमचे कोणाचेही बयाण नोंदवून घेतले नाही. तोपर्यंत बन्सोड यांच्या घरी बरेच लोक गोळा झाले. ते सर्वच शोकाकूल दिसले. किशोर बाहेर गेला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलणे झाले नाही.
जनार्धन बन्सोड म्हणाले, मुलगा कधीच कोणासी भांडला नाही. गावाची ३५० वर लोकवस्ती आहे. गावातील कोणी काम सांगितले. तर तो एेकत होता. गावातील एकाचा गँसचा नंबर लावण्यास मित्रासोबत थडीपवनीला गेला होता. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
समता सैनिक दल
जलालखेडा पोलिसांची गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ केली. हे कळताच समता सैनिक दलाचे काही कार्यकर्ते नागपुरात एकत्र आले. त्यांनी ८ जूनला दुपारी जलालखेडा गाठले. पोलिस स्टेशन समोर गर्दी वाढली. सायंकाळी अंधार वाढू लागताच गर्दी आणखी वाढली. अनिकेत कुत्तरमारे व सहकाऱ्यांनी घोषणा केली. अँट्रासिटीतंर्गत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही हटणार नाही. रात्री १२ नंतर आणखी सैनिक येतील. या शब्दात बजावले. तिथेच ठिय्या ठोकला. फोनाफोनीनंतर हालचाल वाढली. रात्री ८ वाजून ५ मिनिटाच्या ठोक्याला अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविला. खात्री पटल्यानंतर रात्री १० वाजता ठिय्या संपला. आरोपींच्या विरोधात अँट्रासिटीतंर्गत गुन्हा २७ मे रोजीच दाखल करावयास हवा होता. तब्बल ११ दिवस टोलवाटोलवी चालली. त्यातून आरोपींना पळून जाण्यास मदत झाली. ठाणेदार कर्तव्यास जागले नाही. उलट पुरावे नष्ट करण्यास संधी दिली. त्यामुळे ठाणेदाराला सह आरोपी करावे. तातडीने निलंबित करावे अशी मागणी आहे.
होतकरू गमावला
अरविंद एम.ए.झाला होता. एमपीएससीची तयारी करीत होता. कोरानामुळे परिक्षा पुढे ढकलली. हा होतकरू तरूण गमावल्याचं दु:ख आहे. पोलिसांनी व डाँक्टरांनी तत्परता दाखविली असती. तर प्राण वाचले असते. हे तेवढेच खरे. पोलिस असे का वागले ? हे कोडे आहे. तपासात ते उघडकीस येईल. त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अरविंद आरोपींच्या ताब्यात सकाळी ११ वाजेपासून २ वाजेपर्यंत होता. तरी पोलिस जागचे हलले नाही. नातेवाईकांचे ऐकलं नाही. एका फोनवर पोलिस धावून जातात.हा समज खोटा ठरला. या प्रकरणात नातेवाईक ठाण्यात जावूनही पोलिस ढिंम्मच राहिले. अखेर पोलिसांचा नांद सोडून नातेवाईकांनी दवाखान्याकडे धाव घेतली. कोटाल हे तालुक्याचे ठिकाण . तिथेही विषबाधेवर उपचार नाही. नागपूरकडे धाव घ्यावी लागली. यात पुन्हा दोन-अडीच तास गेले.आरोग्य व्यवस्था व उपचाराचीही चौकशी व्हावी. जेणे करून भविष्यात उपचारा अभावी कोणाचा जीव जाणार नाही. त्या ४८ तासातील आरोपींचे काँल्स डिटेल्स तपासले. तर बरेच काही हाती लागेल.
पिंपळदरा हे अरविंदचे गाव. थडीपवनीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. तर जलालखेडा पोलिस स्टेशन १६ किलोमीटर दूर आहे. मारहाणीनंतर वैद्यकीय तपासणी करावयास हवी होती. ती करण्यात आली नाही. मृत्यूपूर्व बयाण नोदविला नाही. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी या प्रकरणात अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले नाहीत. हे न करता आयपीसीच्या कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. यावरून पोलीस अधिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात अडकतील.
१६ जूनकडे लक्ष...
छायाचित्रावरून हत्या झाली. मयूर उंबरकर गँस एजेन्सी चालवतो. त्याचे सिलेंडर गोदाम भरवस्तीत आहे. ते नियमाला धरून नाही. मोबाईलने छायाचित्र काढले . सोबत त्याचा मित्र गजानन होता. त्यांचा मोबाईल हिसकला. कार्यालयात नेले. तिथे मारहाण केली. त्यातून हे प्रकरण वाढले. हा मतदार संघ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आहे. दडपण वाढले आहे. आरोपींचा १६ जूनपर्यंत जामीन आहे. आता अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविल्याने जामीन रद्दची शक्यता आहे.माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी पीसीअार विभागाचे महाआयुक्त खालिद कैसर यांना १२ जूनला फोन लावला. दुसऱ्या दिवसी नांदेड येथून एसपी अपर्णा गिते जलालखेड्यात पोहचल्या. सर्वांचे मँजिस्टेड समोर बयाण नोंदवा असे आदेश ठाणेदाराला दिले. काहींना ठाण्यात बोलाविले. काही स्थळांची पाहणी केली. त्यांच्या आगमनाने ग्रामीण पोलिस हादरलेत.
२९ वर्षानंतर....
३० जुलै-१९९१ला जाम नदीला महापूर आला. या महापूराचा मोवाडसह अनेक गावांना फटका बसला होता. त्यात २५० लोक वाहून गेले होते. थडीपवनीत इंगळे गुरूजी होते. त्यांनी अनेकांना वाचिवले. वृृत्त संकलनास फिरताना तेव्हा थडीपवनी परिसरात पुराचे अडथळे जाणवत होते. त्याच भागात २९ वर्षानंतर पुन्हा जावे लागले. आता कोरोना टाळेबंदीचे अडथळे जाणवले. माणसांना भेटताना दोन्ही बाजूंनी कोरोनाचा तणाव स्पष्ट जाणवत होता. तेव्हा जीव वाचविणाऱ्यांची चर्चा होती. आता जीव घेणाऱ्यांची चर्चा. हे हत्या प्रकरण गाजणार आहे. जलद कारवाई हाच उपाय आहे. तपासाला योग्य दिशा व गती द्यावी. विषाची बाटली. कृषी केंद्रातून आली. ते केंद्र कोणाचे. कोणी आणली. पावती केव्हा फाडली. कोणाच्या नावाने फाडली.ते दुकान सील झालं काय ? कागदपत्र ताब्यात घेतले काय? तर कालपर्यंत नकारघंटा होती. सिलेंडर दुकानात सीसी टिव्ही कँमेरे होते काय? कोणी लावले. केव्हा काढले. पुरावे आहेत की नष्ट केले. मोबाईल काँल्स डिटेल्स अन् बरेच काही.१५ दिवसानंतरही पोलिसांच्या हाती नाहीत.
भूपेंन्द्र गणवीर, ज्येष्ठ पत्रकार
............BG............