महाराष्ट्राची राजधानी मुंबई. तिला देशाची आर्थिक राजधानी असेही संबोधले जाते. या मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख . कोरोना संकटाने त्यांची जबाबदारी जास्तच वाढली. ती पेलण्यास ते निर्धाराने पुढे सरसावले. बघता-बघता त्यांनी आपली छाप पाडली. या काळात राज्यातील डझनभर मंत्र्यांनी अतिशय चांगले काम केले. त्यामध्ये काँग्रेसचे तरूण मंत्री अस्लम हे एक आहेत.
मुंबई हे गर्दीचे शहर. करोडो लोकांचे लोंढे रोज रस्त्यावर असतात. लाईफ लाईन असलेली लोकल ट्रेन दिवसरात्र धावते. हाँटेल, माँल्स २४ तास उघडे ठेवणे सुरू झाले होते. कोरोनाने त्यावर पाणी फेरले. आता रस्ते ओस पडलेत. तरी कोरोनाग्रस्त सारखे वाढत आहेत. ही कुबेरनगरी . मायानगरीही म्हटले जाते. येथून विदेशी विमानांचे उड्डानेही जास्त अाहेत. हा आजार विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांनी आणला. तो आता राशनकार्डवर धान्य खरेदी करणाऱ्यांच्या घरात पोहचला. कुबेरांच्या घरात मोलमजूरी करणारा वर्ग राहतो गर्दीच्या वस्तीत किंवा झोपडपट्टीत . त्या वस्त्यांमध्ये कोरोना पोहचल्याने मुंबईने देशाची चिंता वाढवली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या कामाने देशावर छाप पाडली. त्यांच्या मुंबईच्या टिममध्ये महत्वाचा रोल पालकमंत्र्यांचा आहे. सर्वाधिक फिडबँक त्यांचा आहे. कोरोनाग्रस्त भागात जाणे. लोकांच्या सूचना शांतपणे एेकणे. लगेच त्यावर निर्णय. पाठोपाठ अंमलबजावणी. या पध्दतीने त्यांचा कामाचा झपाटा सुरू आहे. १५-१५ तास काम सुरू असते. भाजी बाजारांत सामाजिक विलगिकरण होत नाही. हे लक्षात येताच बाजार मोकळ्या मैदानात हलविणयात यावे असा आग्रह धरला. एवढेच नव्हे तर ते करवून घेतले. मोकळ्या जागेत बाजार नेल्याने काही लोकांच्या तक्रारी वाढल्या. बाजार दूर पडतो. त्यावर वस्तीनिहाय ९-१० भाजीपाल्यांची दुकाने लावण्याची उपाययोजना सुरू आहे. जागा उपलब्ध झाल्यास ती दुकाने कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रस्तावआहे.
मुंबईत १५० च्या वर वस्त्या सील करण्यात आल्या. त्या बहुतेक वस्त्यांना भेट दिली. त्या भागाची पाहणी केली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या रूग्णालयांना भेटी दिल्या. तेव्हा तिथे कोरोनाग्रस्तांची लिप्ट वेगळी ठेवा. त्या रूग्णांना आणणाऱ्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग ठेवण्यास सांगितले. धारावी, कोळीवाडा ,वसई, विरार ,भाईदर भागात कोरोनाग्रस्त आढळले. यामुळे मुंबईचे टेंशन वाढले. या दबावाला झुंगारून अस्लम शेख यांचे काम सुरू आहे.
लाँकडाउन लागू झाल्याने लाखो मजूर मुंबई व आसपासच्या भागात अडकले. त्यांना आधार देणे. छावण्या उघडणे. भोजन व्यवस्था करणे. यामध्ये लक्ष घातले. प्रशासनाला कामाला लावले. त्यामुळे दोन-तीन लाख मजूरांची सोय झाली. आम्ही टेस्ट वाढविल्या. त्यामुळे रूग्ण वाढलेत. मोठ्या संख्येने लोकांना क्वारंटाईन करीत आहोत. हे युध्द जिंकूच असा त्यांचा निर्धार आहे. मरकजमधून परतणाऱ्यांना स्वत:हून क्वारंटाईनसाठी पुढे या असे आवाहन केले. प्रतिसादही मिळाला. मात्र पन्नासावर लोक आले नाहीत. त्यांच्या विरोधात कारवाई करा असे निर्देश दिले. मुंबईच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही असे बजावले. ही होय देशभक्ती.हिला म्हणतात खरी राष्ट्रभक्ती. मुंबईत कोरोना वाढू नये. यासाठी सर्व आघाड्यांवर काम सुरू केले. टँक्सी, लोकल ,बेस्ट, समुद्रवारी सारीच बंद आहे. विदेशातून आलेल्यांना स्वत:च्या घरात क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला होता. काहींनी हा सल्ला पाळला नाही. ती चुक मुंबईला भोवली. त्यामुळे आता मुख्यमंत्री, पालकमंत्री कठोर बनलेत.मुंबईत कोरोना विरोधी जंग जोरात आहे.
- भूपेंन्द्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार