Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०७, २०२०

ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणच्या महिला कर्मचारी मैदानात

नागपूर/प्रतिनिधी:-
   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानां जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यात महावितरणच्या महिला कर्मचारी मागे  नाहीत. त्यांनी  देखील कोरोना विरोधातील लढाईत आपला सहभाग नोंदवला आहे. मागील १५ दिवसात सर्वत्र बंद असताना या महिला कर्मचारी वीज ग्राहकांना विना व्यत्यय वीज पुरवठा मिळावा यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

    हिंगणा एमआयडीसी येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात सहायक अभियंता पदावर कार्यरत वैशाली दोरखंडे यांच्याकडे १०० उच्च दाब आणि सुमारे ३०० लघुदाब वीज ग्राहक आहेत. रोज सकाळी ८ वाजता त्या कार्यालयात येऊन नियमित कामे पूर्ण करतात.  कार्यालयातील सर्व १२ जनमित्रा समवेत सतत संपर्कात असतात. "लॉक डाऊन” मुळे  कारखाने बंद आहेत पण महावितरणकडून या परिसरातील वीज पुरवठा नियमितपणे सुरु आहे. मागील आठवड्यात येथील उपकेंद्रात रोहित्रात रात्री बिघाड झाला होता. अश्यावेळी वैशाली दोरखंडे यांनी रात्री उपकेंद्रास भेट देऊन पाहणी केली आणि येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ती पावले उचलली.


   याच कार्यालयात कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत असणाऱ्या मनीषा जावणे यांच्याकडे वीज ग्राहकांच्या तक्रारी दूर करणे,  थकीत वीज देयकाची वसुली करणे, यासाठी वीज ग्राहकांकडे पाठपुरावा करणे, देखभाल-दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करणे यासारखी जवाबदारी सोपवली आहे. सध्याच्या "लॉक डाऊन"मुळे वसुली थांबली असली तरी फोनच्या माध्यमातून थकबाकीदार वीज ग्राहकांना ऑनलाईन द्वारे वीज देयकाचा भरणा करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जवाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

   शहरातील टेलिकॉम नगर शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आशा साठे यांच्याकडे सध्या वीज ग्राहकांच्या फोनवर येणाऱ्या तक्रारीचे निराकरण करण्याची जवाबदारी सोपवली आहे. या अगोदर त्या थकबाकीदार वीज ग्राहकांकडून देयकाची वसुली करणे, देयकाची रक्कम न भरणाऱ्या वीज ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करणे या प्रकारची कामे करीत होत्या.


    प्रताप नगर शाखा कार्यालयात तंत्रज्ञ पदावर कार्यरत जानव्ही आव्हाड या अगोदर थकबाकीदार ग्राहकाकडून देयकाची रक्कम वसूल करणे, रोहत्रावरील नोंदी घेणे, वीज ग्राहकांचे नादुरुस्त मीटर बदुलन देणे यासारखी कामे करीत होत्या. पण मागील १५ दिवसापासून कामाचे स्वरूप बदलले आहे. शाखा कार्यालयात वीज ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेणं, वेळ पडल्यास टॉवर लॅडरवर घेऊन  त्याचे निराकरण करण्यासाठी जात आहेत.

    जयश्री बागडे या ३३/११ कि.व्हो. उपकेंद्र खापरखेडा येथे ऑपरेटर पदावर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची वेळ अगोदर सकाळी ८ ते दुपारी ४ होती पण यात कोणताही बदल झालेला नाही. मात्र अगोदर दर तासाला नोंदी न घेता रात्री आणि दुपारी १२ वाजता नोंदी घेत आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यास याची माहिती त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असतात.


    प्रिती वंजारी या प्रतिनियुक्तीवर गांधीबाग शाखा कार्यालयात कार्यरत आहेत. वीज ग्राहकांचे नादुरुस्त मीटर बदलून देणे,वेळ प्रसंगी सहकाऱ्यांसोबत तक्रार निवारण करण्यासाठी जाणे या प्रकारची कामे त्या सध्या करीत आहेत. महावितरणच्या या रणरागिणी अखण्डित वीज पुरवठ्यासाठी तत्पर असताना कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी ग्राहकांनी कृपया घरेच राहून सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.