एकिकडे भांडारदरा धरणाचे अलौकिक दृष्य दिसत होत तर दुसरीकडे सह्याद्रीचे ब्रम्ह रूप होत. हा सह्याद्री म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच म्हणावे लागेल. या सह्याद्रीत विविध ठिकाणे असून त्याचे रंग बदलणार्या सरड्याप्रमाणे विविध प्रकारची रूपे पहावयास मिळतात. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती असत. परंतु नंतरच्या काळात अनेक भटक्यांचा ओघ वाढला मग खरेतर गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि मग इतके दिवस अज्ञात असलेली विविध ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहित होण्यास सुरुवात झाली. यातुनच पर्यटनाला खरी चालना मिळाली व त्या ठिकाणी पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. याच ठिकाणां पैकी असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी. की जिचे महत्व व ख्याती आशियातील सर्वात मोठी लांब घळ म्हणुन करण्यात येते,असे वनरक्षक व पर्यटन मार्गदर्शक रमेश खरमाळे यांनी सांगितले .
अकोले तालुक्यातील व नगर जिल्ह्याचा अतिशय दुर्गम भाग म्हणजे साम्रद गाव , या साम्रद गावाजवळ असलेली आणि रतनगड, कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन या किल्ल्यांचा शेजार व नैसर्गिक सौंदर्य लाभलेली सांदन दरी अनेक वर्ष उपेक्षित होती. पण भटक्यांच्या माध्यमातून ज्यावेळी ही दरी लोकांना माहिती पडली आणि ज्यांनी ह्या दरीची थरारकता अनुभवली ते लोक वारंवार येथे भेट देऊ लागले आणि अशा तऱ्हेने अज्ञात असलेली दरी लोकांना ज्ञात झाली. व ती प्रकाश झोतात आली असे ही खरमाळे यांनी सांगितले .
साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)यांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडतात. साम्रद या आदिवासी पाड्यापासून साधारणपणे 10- 15 मिनिटांमध्ये रुळलेल्या पायवाटेने आपण घळीच्या तोंडापाशी येतो.अगदी एका ओढ्यात आपण उतरावे एवढा सोपा मार्ग या दरीच्या तोंडाशी दिसून येतो. सांदण दरी जमीन पातळीच्या खाली असल्यामुळे दरीत शिरण्यासाठी थोडेसे खाली उतरायला लागते. सांदण दरी हा निसर्गाचा चमत्कार आहे. लाखो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दरी निर्माण झाली असावी. त्यामुळे सांदण दरी म्हणजे जमिनीला पडलेली भेग वाटते.
दरीच्या सुरुवातीला दोन ओढे एकत्र मिळतात व याच ओढ्यावर जिवंत पाण्याचा झरा आहे. झरा दगडांनी बंदिस्त झालेला असल्यामुळे झऱ्याला वर्षभर पाणी असते. पुढे हे पाणी या उतरत्या ठिकाणी वाहत जाते.झऱ्याचे पाणी दगडांमधून वाहत असल्यामुळे थंडगार असते. ह्या झऱ्याच्या पुढे असलेला सोप्पा कातळटप्पा उतरून गेल्यानंतर आपण नाळेच्या घळीत प्रवेश करतो. ह्या ठिकाणावरून दरीचे अक्राळविक्राळ रुप समोर येते. नाळ काही ठिकाणी 15 - 20 फूट आहे, तर काही ठिकाणी अगदीच 2-3 फूट आहे. दरी जमिनीच्या खाली असल्यामुळे दोन्ही बाजूला कातळाची उंचच उंच भिंत आहे.
पहिला कातळटप्पा पार केल्यानंतर 14 -15 फूट लांब आणि 3 ते 4 फूट खोल पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. कुंडात असलेले दगड पाण्यात असल्यामुळे त्यांच्यावर शेवाळ जमले आहे त्यामुळे सांभाळून पाय ठेवत हे कुंड पार करावे लागते. हे कुंड ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरु होऊन नाळ अरुंद होण्यास सुरुवात होते. दरीमध्ये लहानमोठे दगड, मोठमोठ्या दरडी यांचा खच पडलेला असल्यामुळे सपाट भाग कुठेच आढळुन येत नाही. ह्या दगडांमधूनच वाटचाल करीत आपण पाण्याच्या दुसऱ्या नैसर्गिक कुंडाजवळ पोचतो. ह्या कुंड साधारणपणे 4 - 5 फूट खोल आणि 15 - 20 फूट लांब आहे. ह्या कुंडापर्यंत सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे कुंडात वर्षभर थंडगार पाणी असते. हे कुंड पार करताना उडणारी तारांबळ आणि थरार ज्यांनी अनुभवला आहे ते सर्वजण ह्या दरीच्या प्रेमात नक्कीच पडले असतील. जवळपास छातीला लागेल एवढे पाणी येथे पार करून पुढे जावे लागते.
नाळ 1.5 किमी लांब आहे. पण वाटेवर पडलेल्या दगडांचा खचामुळे दरीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी 50-55 मिनिटे लागतात. हे अंतर पार करीत असताना मोठमोठ्या दरडी, दोन्ही बाजुला असलेल्या कातळभिंती आणि मधूनच दिसणारे नभ या पलिकडे दुसरे काहीही नजरेस पडत नाही. नळीच्या टोकाला पोचल्यानंतर सह्याद्रीचे घडणारे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष येथे अप्सराच अवतरली की काय? असा भास होतो. शेकडो फूट खोल सरळ तुटलेले कडे पाहिल्यानंतर थरार म्हणजे काय ह्याची अनुभूती येते. इथूनच खाली जाणारी वाट पुढे करोली घाटातून डेहणे गांवात जाते.
परतीच्या मार्गाला पुन्हा साम्रद गांवात पोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुन्हा माघारी फिरत दगडांच्या खाचखळग्यातून मार्गक्रमण, दोन्ही थंड पाण्याची कुंड पार करत आणि सुरुवातीला लागलेला कातळटप्पा चढून याव लागते.
प्रस्तरारोहणाची साधनसामुग्री असेल तरच करोली घाट उतरून डेहणे गांवात जाणे शक्य होत, अन्यथा करोली घाट उतरण्याच्या प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. सांदण दरीच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहचत नसल्यामुळे दरीत कायम थंडावा असतो.
सांदण दरीकडे पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या, दारूच्या बाटल्या, प्रातविर्धी इ. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत असेल असे चित्र येथे परीसर फिरून पाहील्यावर कळते . त्यामुळे ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन ते कसे कमी होईल याकडे पर्यटकांबरोबर, ग्रामस्थ यांनी सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे.
याबाबत रमेश खरमाळे यांनी पर्यटकांना काही सूचना केल्या आहेत.
1. सुरक्षित भटकंती करा व सोबतीला कुणाला तरी घ्या.
2. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नये.
3. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. व सोबत अत्यावश्यक साधन सामुग्री ठेवा.
4. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरातील सदस्यांना सांगूनच जा.
5. पायवाटा माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा.
6. मळलेल्या पाऊलवाटांचा वापर करा, अनोळखी वाटेने जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.