Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ०८, २०१९

'हॅपीनेस इंडेक्स'वर आज देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन - सुधीर मुनगंटीवार




वृक्ष लागवडीसंदर्भात चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत वनमंत्र्यांचा संवाद

मुंबई, दि. 8: विश्वात आज देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना 'पर कॅपिटा इन्कम' प्रमाणे 'पर कॅपिटा हॅपीनेस' काय आहे याचा विचार केला जात असून माणसाच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हास्य ही खरी संपत्ती मानण्यात येत असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन ओनर्स तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांसमवेत काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात संवाद साधला आणि त्यांना या मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार मंगलप्रभात लोढा, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह चित्रपटगृहांचे प्रतिनिधी, निर्माते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

जीवनात वन नसते तर जीव कुठेच रमला नसता असे सांगून श्री. मुनगंटीवार यांनी जिथे वनसृष्टी आहे तिथेच जीवसृष्टी असल्याचे स्पष्ट केले. वन के लिए मन से बात करण्यासाठी आलेल्या सर्व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. सेवाभाव, मानवता भाव याबरोबर समाजातील व्यक्तींच्या मनात वृक्षभाव रुजविण्यासाठी चित्रपटक्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य करावे, या क्षेत्रातील मान्यवरांच्या फॉलोअर्सची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा एक संदेश खूप मोठी प्रेरणा ठरू शकतो हे लक्षात घेऊन या सर्व मान्यवरांनी आपल्या समाजमाध्यमांमधून वृक्षलागवडीस प्रोत्साहन देणारे संदेश द्यावेत, जिथे शक्य असेल तिथे वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी होऊन इतरांना प्रेरणा द्यावी असे आवाहन ही त्यांनी केले.

चित्रपटगृहाच्या मालकांनी वृक्षलागवडीस प्रोत्साहन देणाऱ्या चित्रफिती सामाजिक कार्यात योगदान देण्याच्या भावनेतून चित्रपटगृहात विनामूल्य प्रदर्शित कराव्यात, या जनजागृतीच्या कामात मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सर्वांच्या सहकार्यातून 33 कोटी वृक्षलागवडीचे मिशन पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आपले योगदान हे वृक्षलागवड, जतन आणि संवर्धनात असले पाहिजे असा आग्रह धरला. 33 कोटी वृक्षलागवड हा यावर्षी सर्वात मोठा उपक्रम असून महाराष्ट्राचे हे काम जगासाठी पथदर्शी स्वरूपाचे राहील असेही ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहिली असून आतापर्यंत 61 लाख लोक हरित सेनेचे सदस्य झाले आहेत. आपल्या सर्वांना मिळून ही सेना एक कोटी ची करावयाची आहे त्यामुळे सर्वांनी हरित सेनेचे सदस्य व्हावे, वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनात योगदान द्यावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीत वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी राज्य शासनाचा 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम, आतापर्यंत झालेली वृक्षलागवड आणि लोकसहभाग याची माहिती दिली.

यावेळी झालेल्या सादरीकरणात वन विभाग राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. वृक्षलागवडीतील पारदर्शकतेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, 1926 हॅलो फॉरेस्ट हेल्पलाईनची माहिती, हरित सेना, आजपर्यंत झालेली वृक्षलागवड, त्यातील लोकसहभाग, आदी माहितीचा त्यात समावेश होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.