तापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो. उष्णतेचा थेट परिणाम आरोग्य आणि उत्पादनावर होतो. त्यामुळे तापमानवाढीच्या काळात कोंबड्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
तापमान वाढल्याने कोंबड्यांचा आहार कमी होतो. कोंबड्या कमजोर होतात. उत्पादनात घट होते. स्वास्थ्य बिघडल्यामुळे विविध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. हे लक्षात घेऊन पोल्ट्री शेड आणि कोंबड्यांचे तापमान कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. कोंबड्या त्वचाद्वारे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. सगळ्या प्राण्यांमध्ये घाम ग्रंथी असतात. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. परंतु कोंबड्यांमध्ये घाम ग्रंथी नसतात.
उष्णता वाढल्याने कोंबड्यांमध्ये दिसणारी लक्षणे
- श्वासोच्छ्वास जलदगतीने होतो.
- भरपूर प्रमाणात तहान लागते.
- भूक मंदावते. दिलेले खाद्य कमी प्रमाणात खातात.
- पंख पसरून उभ्या राहतात.
- कमी प्रमाणात खाद्य खाल्याने, अंडी आणि मांस तयार करण्याची क्षमता कमी होते.
- अंडी उत्पादन कमी होते. अंड्याचा आकार बारीक होतो. कवच बारीक होते.
- शरीराच्या तापमानात वाढ होते.
उष्णता लागण्याची प्रमुख कारणे
- शेडमध्ये कमी जागेत जास्त कोंबड्या असल्याने उष्णतेचा त्रास होतो.
- खाद्य आणि पाण्याची अयोग्य व्यवस्था.
- पोल्ट्री शेडमधील अयोग्य वायुविजन.
- पोल्ट्रीमध्ये गुदमरल्यासारखे होणे, दुर्गंधी येणे. शेडमधील लिटर वेळोवेळी न हालवणे किंवा खराब झालेला भुसा न बदलणे.
- शेडबाहेरील तापमानात वाढ.
उपाययोजना
- उन्हाळयामध्ये कोंबड्यांच्या शररातील तापमान स्थिर रहाणे आवश्यक असते.
- पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे. खाद्याची पौष्टिकता वाढवावी.
- छत आणि भिंती थंड ठेवाव्यात.
- शेडमधील हवा खेळती राहिल अशी व्यवस्था करावी.
पाणी व्यवस्थापन
- उन्हाळयात पोल्ट्रीशेडमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्यप्रकारे व्यवस्था ठेवावी.
- स्वच्छ आणि थंड पाण्याचा अखंड पुरवठा असावा. पाण्याचे तापमान १५ ते २० सेल्सिअस पेक्षा जास्त झाले तर त्यांना उष्णता जाणवेल.
- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्यासाठी धातूच्या भांड्याऐवजी मातीच्या भांड्याचा वापर करावा, जेणे करून पाणी थंड राहील, कारण धातूच्या भांड्यांमध्ये पाणी लवकर गरम होते.
- पोल्ट्रीशेडमध्ये स्वयंचलित पाण्याची व्यवस्था नसेल तर दिवसातून दोन वेळा किंवा भांड्यातील पाणी कमी झाल्यास त्यामध्ये पाणी टाकावे.
खाद्य नियोजन
- उन्हाळ्यात कोंबड्यांची भूक कमी होते. ज्यामुळे त्यांच्या खाद्याचे प्रमाण घटते. जेवढी पौष्टिकता खाद्यातून मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरात कमजोरी येते आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्यासाठी आपल्याला खाद्याची पौष्टिकता वाढवायला पाहिजे.
- खाद्यातील पौष्टिक तत्त्व जसे की प्रथिने, कर्बोदके, खनिजे आणि जीवनसत्वे इत्यांदीचे प्रमाण १५ ते २० टक्के एवढे वाढवावे. खाद्यामधील जीवनसत्त्व सी ताणतणाव कमी करण्यासाठी मदत करते. खाद्य आणि पाणी यांचे प्रमाण हे १:३ असे असायला पाहिजे. समजा एक कोंबडी जर १०० ग्रॅम खाद्य खाते, तर तिची पाण्याची आवश्यकता ३०० मि.लि.पेक्षा जादा होईल. पाणी ताजे, स्वच्छ आणि थंड असेल तर अतिशय योग्य ठरते.
- धनंजय गायकवाड ९४२२१०७७१९
(लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, जालंदर, पंजाब)
(लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, जालंदर, पंजाब)
सदर माहिती हि सकाळ (agrowon)अंकातून घेण्यात आली आहे.