उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, परंतु कोंबड्यांसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान कोंबड्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम करते. वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांमध्ये ताण निर्माण होतो, त्या उत्पादनक्षम राहू शकत नाहीत.
उन्हाळ्यातील तापमानवाढीमुळे योग्य नियोजनाची गरज असते. हे नियोजन जर व्यवस्थितरीत्या केले तर मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. उच्च तापमानामुळे वाढीच्या अवस्थेतील कोंबड्यांवर गंभीर परिणाम होतात. कोंबड्यांना घामग्रंथी (स्वेट ग्लॅड्स) नसतात. तसेच त्यांचे शरीर पिसांनी आच्छादलेले असल्यामुळे उन्हाळ्यात कोंबड्या अतिशय संवेदनशील असतात. कोंबड्यांच्या शरीराचे तापमान हे वातावरणाच्या तापमानापेक्षा अधिक असते.
जेव्हा कोंबड्यांच्या शरीराचे तापमान व वातावरणातील तापमान समान होते, तेव्हा त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी उष्णता बाहेर टाकावी लागते. त्यासाठी त्यांच्या श्वसनाचा वेग वाढतो. कोंबड्या तोंडाची सतत उघडझाप करतात, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ होते. जेव्हा कोंबड्यांचा श्वसनाचा वेग वाढतो, तेव्हा त्यासोबतच त्यांच्या हृदयाच्या स्पंदनाचा वेगसुद्धा वाढतो. यामुळे रक्तदाब वाढतो. या सर्व क्रिया उष्णता शरीराबाहेर फेकण्याकरिता आपोआप घडतात. यासाठी ऊर्जेची गरज असते. ती गरज रक्तातील ग्लुकोजचा वापर करून भागविली जाते. पण जर या सर्व क्रिया जास्त वेळ चालू राहिल्या तर ऊर्जेच्या अभावी बंद पडतात व कोंबड्या उष्माघाताने मृत्युमुखी पडतात. हे टाळण्यासाठी कोंबड्यांचे दैनंदिन व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे.
उष्माघाताची लक्षणे
- कोंबड्यांची हालचाल कमी होते (सुस्त होतात.)
- कोंबड्या तोंड उघडून श्वास घेतात.
- कोंबड्यांची भूक कमी होणे.
- पिसे झडतात.
- लेअर कोंबड्यांमध्ये अंड्यांचे उत्पादन कमी होणे.
- पाणी कमी प्रमाणात पिणे.
- रोगप्रतिकार शक्ती कमी होणे.
- अंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची दिसून येते.
कोंबड्यांचे शवपरीक्षण
- कोंबड्यांचे पशुवैद्यकाकडून शवपरीक्षण करणे महत्त्वाचे असते. शवपरीक्षणामुळे मरतुकीचे कारण समजते. त्यानुसार पुढील व्यवस्थापनात योग्य ते बदल करून होणारे नुकसान टाळता येते. उष्माघातामुळे दगावलेल्या कोंबड्यांमधील रक्त नेहमीपेक्षा जाड व गडद दिसून येते, गिरणी व क्रॉप हे भाग रिकामे व कोरडे असते, मूत्रपिंडावर सूज आलेली असते, नसांमध्ये रक्ताचा साठा होतो, मांसाचा रंग गुलाबी न दिसता पांढरा पडतो.
- उपाययोजना
- कोंबड्यांना थंड पाणी पिण्यास द्यावे.
- शेडचे तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी मारावे.
- शेडमध्ये हवा खेळती राहावी म्हणून पंख्याचा वापर करावा.
- शेडच्या एका बाजूला पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी मारावे.
- गादी पद्धतीत गादीची जाडी कमी करावी.
- शेडमधील कोंबड्यांची घनता कमी करावी.
- उष्णतेमुळे कोंबड्या कमी खाद्य खातात, त्यामुळे त्यांना अतिरिक्त जीवनसत्त्वे व क्षार मिश्रणे द्यावीत.
- छतावर भाताचा कोंडा, वाळलेले गवत टाकावे व ते ओले ठेवावे.
- छतावर स्प्रिंकलर्स लावावेत, त्यामुळे तापमान नियंत्रणासाठी मदत होते.
- खाद्य आणि पाण्यामध्ये जीवनसत्त्व ई व क यांची पूर्तता करावी.
- पक्ष्यांमधील इलेक्ट्रोलाईटसचा असमतोल थांबविण्यासाठी त्यांना इलेक्ट्रोलाईटस पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.
- शेडमध्ये कुलर्स, फॉगर्स बसवावेत.
- खाद्यामधे उपयोगी आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करावा.
- खाद्यामधील ऊर्जेमध्ये बदल करून फॅटच्या स्वरूपामध्ये ऊर्जा द्यावी.
- पाण्याच्या भांड्याची संख्या दोन पटीने वाढवावी.
- शेडच्या छताला पांढरा रंग द्यावा.
- वारंवार शेडमध्ये जाणे टाळावे. शेड नेहमी स्वच्छ ठेवावे.
ः अंकितकुमार राठोड, ९७३०२८३२१२
ः डॉ. सतीश मनवर, ७२१८८४२८३३
(कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
ः डॉ. सतीश मनवर, ७२१८८४२८३३
(कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
सदर वृत्त हे सकाळ(agrowon) येथून घेण्यात आले आहे.