फलटण (जि. सातारा) येथील फूड बर्ड ऍग्रो प्रायव्हेट कंपनीच्या कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणी दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. संजय भगवान मोरे (वय39, रा. दौलतनगर, सातारा) आणि जॉन्सन ख्रिस्तोफर रायचुर (वय 33, कोरेगाव, जिल्हा सातारा) अशी त्या दोघांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, की कंपनीच्या एका युनिटमध्ये 75 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास कंपनी 220 कडकनाथ कोंबड्या व दहा महिन्यांचे कोंबडी खाद्य, औषध व भांडी देणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. सभासदांकडून एका वर्षात कडकनाथ कोबडीची एकूण 8500 अंडी 2 लाख 38 हजार रुपयांना कंपनीतर्फे खरेदी करु तसेच एका वर्षात दोन लाख 38 हजारांचा फायदाही गुंतवणूकदारास होईल, असे आमिष दाखवण्यात आले.
यापूर्वी कंपनीचे संचालक राहुल दत्तात्रय ठोंबरे, सुखदेव रामचंद्र शेंडगे (दोघे रा. सरडे, ता. फलटण, सातारा) आणि सचिन तुकाराम करे (रा. माळेगाव, ता. बारामती) या तिघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली नाही, त्यांनी कागदपत्रांसह तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सांगलीतील गुंतवणूकदारास फलटण येथे जाण्यास त्रास होतो, म्हणून सांगलीतील शंभरफुटी रस्ता परिसरात कंपनीने कार्यालय उघडले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांनी पैसे गुंतवले होते. त्याची रक्कम 1 कोटी 54 लाख 66 हजार रुपये इतकी होती. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार कंपनीचे चेअरमन, संचालक, व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.
वृत्तसेवा:सकाळ वृत्तपत्र