आमदार राजू पारवे यांचे प्रतिपादन ;मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त मेळावा
चांपा:
समस्त पिडीत , शोषित , वंचित समाजाने अधिकारी आणि लोकप्रतिनिधीपूढे बोलायला शिकले पाहिजे .आपले प्रश्न रेटुन धरले पाहीजे .असे केले तरच खऱ्या अर्थाने मूकनायक होता येईल , असे मत उमरेडचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी व्यक्त केले .
मूकनायक शताब्दी वर्षानिमित्त चांपा ग्रामपंचायतीत आयोजित सोहळ्यात ते उदघाटक म्हणून बोलत होते .अध्यक्षस्थानी सरपंच अतिश पवार होते .नायब तहसिलदार योगेश शिंदे , सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के , सहायक गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव , बानाई चे अध्यक्ष पी .एस खोब्रागडे , जेष्ठ विचारवंत डॉ .वासुदेव डहाके , कवी डॉ .मच्छिंद्र चोरमारे, महेंद्र गायकवाड , प्रा .मोहन चव्हाण , माझी महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई वाघाडे , हळदगावच्या सरपंच जिजाबाई छापेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
पारधी समाजाच्या उत्थानासाठी गेली २५वर्षे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते बबनराव गोरामन यांना मूकनायक , तर अनिल पवार यांना मूकनायक पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले .
भटके विमुक्त आदिवासी संघ , प्रगतिशील आणि समाज पत्रकार संघ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजीत या कार्यक्रमाला परिसरातील चांपा हळदगाव , दहेगाव , राजुलवाडी , वडद , खेतापूर , बिरसानगर कुही फाटा , आदी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती .
डॉ बाबासाहेब यांची मूकनायक पाक्षिक सुरू करण्यामागील भूमिका डॉ .वासुदेव डहाके यांनी मांडली , तसेच सत्कारमूर्तीच्या कार्याची माहितीही दिली .
वंचितांनी स्वतः ताकदवान बनले तरच प्रगती शक्य होईल , असे मत नायब तहसिलदार योगेश शिंदे यांनी मांडले .
सहायक पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी शिक्षणाचे महत्व विशद केले .जोवर बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण करणार नाही , तोवर खऱ्या अर्थाने विकास होणार नाही, असे मत पी .एस .खोब्रागडे यांनी व्यक्त केले .प्रदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना बानाई संघटनेतर्फे सर्वोत्तोपरी मदत करण्यात येईल , असे आश्वासनही त्यांनी दिले .
डॉ .मच्छिंद्र चोरमारे यांनी मूकनायक सुरू झाल्यापासून ते आजवरच्या परिवर्तनाचा कालपट श्रोत्यांसमोर उभा केला .महेंद्र गायकवाड यांनी आदिवासी बेड्यांवरील शंभर बालकांना वह्या आणि शैक्षणिक साहित्य देण्याची घोषणा केली .पुष्पाताई वाघाडे यांनी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी सतर्क असले पाहिजे , असे मत व्यक्त केले .प्रा .मोहन चव्हाण यांचेही भाषण झाले .सूत्रसंचालन प्रमोद काळबांडे यांनी केले .तर आभार मुकुंद अडेवार यांनी मानले .विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी आमदार राजूभाऊ पारवे यांना त्यांचा मागण्यांचे निवेदन दिले .
मूकनायक सन्मानामुळे नवी ऊर्जा :बबन गोरामन
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मूकनायक सन्मान मिळणे , ही माझ्या आयुष्यातील मोठी घटना आहे .मी गेलो पंचवीस वर्षे पारधी समाजाच्या उत्थानासाठी बारा राज्यमध्ये फिरलो , पारधी समाजातील अंधश्रद्धा आणि व्यसनावर कडा प्रहार केला .शाळाबाह्य बालकांना मोठया प्रमाणात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले .या माझ्या कार्याला मूकनायक सन्मानाचे मानकरी बबन गोरामन यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले .मूकनायक पत्रकार पुरस्काराछे मानकरी अनिल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले .माझी लेखणी केवळ पारधी समाजासाठीच नव्हे, तर सर्व वंचितांच्या उत्थानासाठी चालली .यापुढे माझे वृत्त सुरूच ठेवणार आहे, असे अनिल पवार म्हणाले .