Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून ०९, २०१८

आम्ही वीज कर्मचारी आम्हालाही समजून घ्या...

प्रासंगिक.....
आम्ही वीज कर्मचारी आम्हालाही समजून घ्या....

थोडासा पाऊस झाला तरी महावितरण जाणीवपुर्वक लाईट बंद करते, ढगांचा कडकडाट झाला तरी लाईट जाणार असे गृहीत धरून फ़ेसबुक, वॉट्सॲप यांसारख्या समाजमाध्यमांवरून महावितरणच्या यंत्रणेची, कर्मचा-यांची खिल्ली उडविण्याचे प्रकार मागिल काही वर्षांपासून वाढीस लागले आहेत. महावितरण कर्मचारी करीत असलेल्या कामाबाबत मात्र अनुकूल बोलायला मात्र कुणी येत नाही. 


‘पहिला ढग... पहिला पाऊस.. पहिली वीज.. पहिली गडगड 
पहिली माती.. पहिला गंध….. हे सगळं जुळुन आलं, की 
आमच्याकडे….. पहिले लाईट जातात ...’ 

असं बोलणे सहज असले तरी ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वीज ग्राहकाचे घरकुल प्रकाशमान ठेवण्यासाठी झटतो, तो केवळ महावितरणचा कर्मचारी, नववर्षाच्या जल्लोषाची रात्र असो किंवा होळीचा उन्मादाचा सण, दिवाळीच्या रात्रीही संपुर्ण महाराष्ट्र उत्सव साजरा करीत असतांना, महावितरण कर्मचारी मात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या कामी असतो, प्रसंगी आपल्या बहुमूल्य प्राणाची पर्वा न करता आपल्याला अंधारात राहावे लागू नये यासाठी राब-राब राबित असतो, त्याच्या या कार्याकडे पद्धतशिरपणे दुर्लख करणारे कधी हा विचार करतील की, लाईट गेली की ती येते, याचाच अर्थ भर पावसात, जीवघेण्या वादळातही महावितरणचे कर्मचारी आपली सेवा बजावित असतात, गेलेली लाईट ही काही भुताटकीने आपसुक येत नाही, मात्र त्याकडे साळसूदपणे दुर्लक्ष करीत वीज कर्मचा-यांच्या समर्पणाबाबत, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबाबत प्रश्नचिन्ह उभी केली जातात. 
‘आता असच होनार .. पाऊस येईल तासभर ... लाईट जाईल रातभर ......................

अन ... बिल येईल हात भर ......’
पण अशी खिल्ली उडविण्यापुर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे, वीज पुरवठा करणे महावितरणचा मुख्य व्यवसाय आहे. जाणीवपुर्वक वीज पुरवठा खंडित करून कुठलाही फ़ायदा फायदा होणार तर नाही; झालाच तर तोटाच होतो, कारण वीजेचा वापर झाला कि, मीटरवर वापरलेल्या वीज युनिटची नोंद होते आणि त्याचे बिल ग्राहक भरतात, तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करीत, वीज दराचे गणित न कळणा-या नेटीझन्सनी हे देखील लक्षत घ्यावे की, पाऊस आल्यावर खूप वेळेस महावितरण कडून वीज पुरवठा खंडित केला जातो असे नसून पावसाआधी येणाऱ्या वादळामुळे, सोसाट्याच्या वा-यामुळे लांबच लांब असणाऱ्या विद्युत वाहिन्या हेलकावे खाऊन, एखाद्या झाडाची फांदी लागून ताणल्या जातांना किंवा तुटतात. 
त्यामुळे विद्युत वाहिनी ट्रिप होऊन वीज पुरवठा खंडित होतो, अशा संभाव्य धोक्यामुळे विद्युत वाहिनी ट्रिप होऊन वीज पुरवठा खंडित होणे हा एक सुरक्षा प्रणालीचाच महत्वाचा भाग आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने संभाव्य जीवित आणि वित्त हानी टळते, यातही सर्वाधिक महत्वाचा भाग म्हणजे पाऊस सुरु होताच अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो आणि काही वेळांत, तासांत विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु होतो. ह्या सुरळींत होणाऱ्या विद्युत पुरवठ्या मागे महावितरणचे कर्मचारी मुसळधार पावसांतही ११ केव्ही, ३३ केव्ही वीजवाहिनीवर जीव धोक्यात घालून काम करून तो खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरु करतात, त्यासाठी त्यांना ह्याच पावसांत किंवा वादळांत, उपकेंद्रापासून ग्राहकांच्या घरापर्यंतच्या सगळया विद्युत वाहिन्यांची तपासणी करावी लागते आणि असेल तिथला बिघाड शोधून तो दुरुस्त करून वीजपुरवठा सुरु करावा लागतो आणि वीज बिलाबाबत सांगायचे झाल्यास काही तांत्रिक चुका वगळल्यास वीजबिल हे ग्राहकांनी वापरलेल्या एकूण वीजवापराप्रमाणेच दिल्या जाते. अश्या चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती करण्यासाठीची यंत्रणाही महावितरणकडे प्रभावी पद्धतीने कार्यरत आहे. 
                                मुंबईत 2005 असो किंवा 2017 असो, या काळात अनेकदा तेथील स्थानिक वीज वितरण कंपनीच्या मदतीला महावितरण धावल्यानेच तेथील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला यासोबतच महाराष्ट्रात 2016 च्या झालेल्या संततधार मुसळधार पावसाने नाशिक व कोल्हापूरसह महाराष्ट्रभर भिषण परिस्थिती होती. या बिकट परिस्थितीत महावितरणचे अभियंता व जनमित्र यांनी ही यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर अथक परीश्रम घेतले. कोल्हापुरात पंचगंगेच्या महापुरात बोटीने जाऊन महावितरणचे अभियंते व जनमित्रांनी 'व्हाईट आर्मी'तील 15 जवानांच्या सहकार्याने वडवणे व निगवे गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. 
चंद्रपूर, ग़डचिरोली, गोंदीया येथेही प्राणाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम याच महावितरण कर्मचा-यांनी केले आहे. तर नोव्हेंबर 2009 मधील कोकणातील 'फयान' वादळ असो किंवा 2014 मध्ये महाराष्ट्रभर झालेली प्रचंड गारपीट असो, उद्‌ध्वस्थ झालेली वीजयंत्रणा उभारून वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व जनमित्र प्रतिकुल परिस्थितीतही आपली भुमिका चोखपणे पार पाडीत असतात. 
वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण त्यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना विजेच्या धोकादायक आव्हानात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करावे लागते, याची माहिती बर्‍याचदा नसते. पण वीज अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना न्याय मिळेल, एवढे निश्चित. पाऊस आल्यावर वीज घालवणे हा महावितरणचा उद्योग नाही तर ती गरज आहे.
            उगाच जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांवर अशी टीका, खिल्ली उडवू नका, अश्या अटितटिच्या वेळेस सहकार्याची अपेक्षा असते, ती पुर्ण करा, सरतेशेवटी एकच सांगावेसे वाटते.ज्या वादळात लोकांची घरे उध्वस्त होतात, 

अश्या वादळात "महावितरण'' कर्मचारी आपल्यासाठी झटत असतात.
 योगेश नरहरी विटणकर,
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत
(महावितरण)
प्रादेशिक कार्यालय, नागपूर
भ्रमणध्वनी क्रमांक - ७८७५७६१०३२










SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.