पारेषणच्या 5 उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता
ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशामुळे भविष्यात योग्य दाबाने वीज मिळणार
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या पाचही जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना भविष्यातही पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी 220/33 आणि 132 केव्हीचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पारेषणच्या 2017-18 ते 2022-23 या पाच वर्षाच्या विकास आराखड्यात या उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या पाचही उपकेंद्रांची कामे सुरु होणार आहेत. पूर्व विदर्भातील शेतकरी, औद्योगिक ग्राहकांना आजही योग्य दाबाने वीजपुरवठा होत असतानाच भविष्यातही कमी दाबाने वीजपुरवठा होऊ नये म्हणून हे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. परिणामी पूर्व विदर्भाच्या पारेषण क्षमतेत वाढ होईल.
कोलारी येथे 132/33 क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. येथील भंडारा, मोखेबर्डी वाहिनीला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच 132 केव्ही लिंकलाईन नागभीडपर्यंत नेण्यात येणार आहे. यातून चिमूर तालुक्यातील भुयार आणि मोखाबर्डी या चंद्रपूर जिल्ह्यातील भागाला लाभ होणार आहे.
कुही तालुक्यात पाचगाव 220/33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात येईल. सध्या 33/11 केव्ही पाचगाव उपकेंद्राला या 220/33 मधून वीजपुरवठा होईल. पाचगाव आणि कुहीच्या परिसरातील भागाला योग्य दाबाने वीजपुरवठा या उपकेंद्रामुळे होणार आहे. यामुळे कमी दाबाचा वीजपुरवठ्याची समस्या निकाली निघणार आहे. या भागात येणार्या टेक्सटाईल उद्योग आणि अन्य उद्योगांनाही याचा फायदा होईल.
कडोली 220/33 केव्ही उपकेंद्र- सध्या पारडी 132/33 आणि मौदा 132/33 केव्ही उपकेंद्राअंतर्गत अनेक उद्योग आहेत. या सर्वांना गुमथळा फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. या 8 ते 10 स्टील रोलिंग मिल्सचाही समावेश आहे. भविष्यात आणखी मोठे उद्योग या भागात येऊ घातले आहे. हे लक्षात घेता कडोली येथे 220/33 केव्ही उपकेंद्र उभारण्यात येत आहे. यामुळे वीजपुरवठा सुरळीत आणि पूर्ण दाबाने होण्यास मदत होईल.
येनवा 220/33 केव्ही उपकेंद्र-आगामी काळात काटोल-येनवा या भागात एमआयडीसी होऊ घातली आहे. त्यामुळे साहजिकच उद्योगांचे प्रमाण वाढणार. महावितरणच्या मागणीनुसार येनवा 220/33 केव्ही उपकेंद्र पारेषणतर्फे उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रामुळे कळमेश्वर आणि वरूड लाईनवरही वीजपुरवठा करता येणार आहे.
रोहना 220 केव्ही खापरखेडा उपकेंद्राची क्षमता वाढविण्याचे काम यातून होणार आहे. सध्या 33/11 केव्ही रोहना उपकेंद्राला अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. खापरखेडा उपकेंद्राची क्षमता वाढविल्यानंतर कमी दाबाची समस्या संपणार आहे. सध्या भागीमहारी (सावनेर) या 132/33 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. या वाहिनीची लांबी 45 किमीपर्यंत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे इएचव्ही उपकेंद्राची या भागातून सतत मागणी होती. 220 केव्ही खापरखेडाची क्षमता वाढविण्यामुळे या भागातील ही समस्या संपणार आहे.
रामटेक तालुका 132/33 केव्ही घोटीटोक उपकेंद्र- यामुळे अरोली, मनसर व भंडारा नजीकच्या भागाला कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची तक्रार होती. घोटीटोक उपकेंद्रामुळे ही समस्या निकाली निघणार आहे.
नवीन 5 उपकेंद्रे हे नागपूर जिल्ह्यात असली तरी या उपकेंद्रातून पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील काही तालुक्यांना वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. नागभीड कोलारीवरून चिमूरला वीजपुरवठा होणार आहे. गडचिरोलीतील चामोर्शी भागातील ग्रामीण भागाला वीजपुरवठा होईल. यामुळे आदिवासी भागाला सक्षम आणि योग्य दाबाने वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. सिरोंचा येथे 132/33 केव्हीचे उपकेंद्र विचाराधीन आहे. तेलंगणा शासनाने या लाईनसाठी परवानगी दिली आहे. किस्मतपेठ येथून 132 केव्हीची लाईन भविष्यात उभारण्यात येणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील 220/33 केव्ही उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात आली असून कारंजा घाडगे येथील 220/132/33 केव्ही उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आर्वी, आष्टी या भागातील कमी दाबाची वीजपुरवठ्याची समस्या संपणार आहे. महापारेषणच्या या पाच वर्षाच्या आराखड्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्याने योग्य दाबाने वीजपुरवठा होईल.