चंद्रपुर/प्रतिनिधी:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पर्वावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छता ही सेवा मोहिमेचा पंधरवाडा देशभर साजरा केला जातो आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे भिवापूर वॉर्डातील मां तुळजा भवानी मंदिर परिसरात झरपट नदी स्वच्छता अभियान मा. ना. श्री. हंसराज अहिर, केंद्रीय गृह राज्य मंत्री यांच्या उपस्थितीत दि. १५-०९-१८ रोजी राबविण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. ना. श्री. हंसराज अहिर म्हणाले की स्वच्छता हा कार्यक्रम आपण सर्वांना नवीन नाहीये. देशातील १० कोटी लोक आज या मोहिमेत सहभागी आहेत. स्वच्छता मोहिमेसाठी आपल्यापुढे राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा यांचा आदर्श आहे. आजपासून २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा हा देशपातळीवरील कार्यक्रम आहे. हा शासकीय कार्यक्रम जरी असला तरी आजपर्यंत झालेल्या यशस्वी स्वच्छता मोहिमेचे श्रेय केवळ केंद्र सरकारला, राज्याला, महानगरपालिकेला नाही तर लोकसहभागाला आहे. घरोघरी शौचालय बांधणे सोपे काम नव्हते, सरकारने देशातील लोकांना शौचालये घरोघरी बांधण्यास सरसकट मदत केली. लोकांनी सहभाग नोंदविला विशेषतः महिला शक्तीचे यात मोठे योगदान आहे. संस्कारी भारतात प्रगतीच्या दृष्टीने या अनेकविध मोहीम आपण यशस्वीपणे पार पाडतो आहे.
झरपट - इरई नदी ही आपली शहराची जीवनवाहिनी आहे. या नदीला पुनर्जीवित करावी ही भावना आपण सर्वांची आहे. या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. किल्यांच्या दुरुस्ती तसेच देखभालीकरिता केंद्राने ३४ कोटी निधी देण्याचे मान्य केले आहे. हा निधी टप्याटप्याने मिळेल. याचप्रमाणे महाकाली मंदीर, अंचलेश्वर मंदिर, गोंड राजांची समाधी याकरिताही केंद्राने निधी द्यावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छतेबाबत चांगले काम करत आहे. चांदा फोर्टची जागा रेल्वेनी महानगरपालिकेला दिली असून तिथे झाडे लावण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.. महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक यांच्या समन्वयाने शहराचा विकास साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आरोग्याचे महत्व समजून देशाला स्वच्छतेचे आवाहन केले. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. आपल्या शहरात महानगरपालिकेने शासकीय योजना प्रभावीपणे राबवून उत्तम काम करून उघड्यावर शौच करण्याचे प्रमाण शून्यावर आणले. आज घरोघरी शौचालये आहेत. मा. केंद्रीय गृह राज्य मंत्री व मा. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने अमृत योजनेत चंद्रपूर शहराचा समावेश झाला. शहराचा दूषित पाण्याचा प्रश्न लवकरच संपुष्टात येणार आहे. बऱ्याचशा कल्याणकारी योजना लवकरच अमलात आणल्या जाणार आहेत. आपले शहर निरोगी कसे राहील यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायचा आहे.
याप्रसंगी बोलतांना मा. महापौर सौ. अंजली घोटेकर म्हणाल्या की आजपासून स्वच्छता मोहीम देशभरात राबविली जात आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री मा. ना. श्री. हंसराज अहिर याकामी स्वतः पुढाकार घेतला आहे.
स्वच्छ भारत सुदृढ भारत ही संकल्पना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी मांडली. स्वच्छतेचे महत्व त्यांनी देशाला समजावून सांगितल्याने ही मोहीम देशव्यापी झालेली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबविल्या जात असल्याने शहर स्वच्छ व सुंदर राहायला सुरवात झाली आहे. आज देशातले १० कोटी लोक या उपक्रमात सहभागी आहेत. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवावा. पालिका स्वच्छतेचे कर्तव्य करतेच परंतु जनतेनेही यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी स्वच्छता राखण्याची शपथ घेण्यात आली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध ठिकाणी साधलेला संदेश व संवाद दाखविण्यात आला. तसेच मंत्री महोदयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
याप्रसंगी मा. आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, मा. महापौर सौ. अंजली घोटेकर, उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, गटनेता श्री. वसंत देशमुख, स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे, जिल्हाधिकारी श्री.कुणाल खेमनार, आयुक्त श्री. संजय काकडे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. हेमसिंग राजपूत, अतिरिक्त आयुक्त श्री. भालचंद्र बेहेरे, श्री. विजय देवळीकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपायुक्त श्री. गोस्वामी, श्री. बोकडे उपस्थित होते.