Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०८, २०१८

घनकचऱ्याचा ‘सावनेर पॅटर्न’

Solid weaste, Saoner pattern | घनकचऱ्याचा ‘सावनेर पॅटर्न’नागपूर/प्रतिनिधी:
 कुठल्याही शहरातून जमा करण्यात आलेला सुका-ओला कचरा नष्ट करणे ही गोष्ट आता जुनी झाली. जमा झालेल्या कचऱ्यातून उत्पन्न कसे मिळविता येईल, यासाठी प्रयत्न करून त्यात यशही आले. एवढेच काय तर डम्पिंग यार्ड परिसरात पिकाचे उत्पादन घेतले जात असून मत्स्यपालनही केले जाते, शिवाय निसर्गरम्य परिसर म्हणूनही तो भाग आता विकसित होऊ लागला आहे. या माध्यमातून प्रशासनाला लाखोंचा महसूलही मिळू लागला आहे. हे कथानक नसून वास्तवता आहे आणि त्याला मूर्तरुप सावनेर नगर परिषदेने दिले आहे. त्यामुळे आता घनकचऱ्याचा ‘सावनेर पॅटर्न’ अख्ख्या राज्यभर ‘हिट’ ठरू लागला आहे. यासाठी विशेषत: मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
नगर परिषद प्रशासनातर्फे शहरातील गल्लो-गल्लीमध्ये गाड्या फिरवून कचरा संकलित केला जात. त्यानंतर तो कंपोस्ट डेपोमध्ये जमा केला जातो. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरते. त्या परिसरातून ये-जा करणाऱ्यांची दमछाक होत असते. सोबतच डासांचेही प्रमाण वाढले हाते. त्यावर मात करण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना करता येईल, यासाठी नगर परिषदेने विचारमंथन केले. त्यातून त्यांना सेंद्रिय खत निर्मिती केंद्र, पीक उत्पादन आणि मस्त्यपालनाचा मार्ग सापडला.
नगर परिषदेने यासाठी ओला आणि सुका कचरा असे व्यवस्थापन केले. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम राबविला. हे सेंद्रिय खत चार रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. आतापर्यंत सावनेर पालिकेने तब्बल साडेसात टन खताची विक्री करीत महसूल मिळविला. सुका कचऱ्याचे २७ भागामध्ये विलगीकरण केले. यामध्ये काच, कपडा, प्लास्टिक, कागद, केस, थर्माकोल, टायर, रबर, इलेक्ट्रिक साहित्याचा कचरा, भंगार असे प्रकार केले. ते वेगवेगळे करून तो कचराही विक्रीसाठी ठेवला. त्यामुळे या माध्यमातून नगर परिषदेला अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले.
प्लास्टिकचा उपयोग रस्ता निर्मितीसाठी केला. काही प्लास्टिक हे बुटीबोरी एमआयडीसीतील एका कंपनीला विकले. डम्पिंग यार्डमध्ये शेणखताद्वारे गांडूळ खत निर्मितीही केली जाते. सरासरी पाच क्विंटल खत तेथे तयार केले जाते.
मत्स्यपालनाने दोन समस्या मार्गी
सावनेर नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डमध्ये मस्त्यपालनही केले जाते. यासाठी तलाव तयार केले असून वाघूर (कॅटफिश) माशाचे बीज सोडले. यात दोन हजार मस्त्यपालन केले जाते. हे बीज हावडा (कोलकाता) येथून आणले आहे, हे विशेष! या माध्यमातून नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडली. शिवाय नगर परिषदेच्या हद्दीत मांसविक्री करणाऱ्या दुकानासमोर, परिसरात पडून राहिलेल्या मांसामुळे दुर्गंधी सुटते. ते मांस माशांसाठी खाद्य म्हणून वापरले जाते. यातून मांसाची विल्हेवाटही लागली आणि मास्यांसाठी खाद्य म्हणून होणाऱ्या खर्चावरही बचत झाली.
नर्सरी, भाजीपाल्याचे उत्पादन
याच डम्पिंग यार्ड परिसरात नगर परिषदेने शेती विकसित केली. तेथून मका, ऊस, केळी, भेंडी, कोहळे, लवकी, पालक, अंबाडी, तूर असे उत्पादन घेतले जाते. सोबतच नर्सरीही विकसित केली आहे. त्यामुळे या माध्यमातूनही नगर परिषदेला उत्पन्न मिळू लागले आहे. नगर परिषदेच्या आर्थिक भरभराटीस आता डम्पिंग यार्डची मदत मिळत आहे, हे विशेष! एवढेच काय तर डम्पिंग यार्ड परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. बगिचा तयार करण्यात आला. यामुळे सावनेर नगर परिषदेच्या सौंदर्यातही भर पडली असून नगर परिषदेचे नाव सर्वदूर होऊ लागले आहे. यामध्ये मुख्याधिकारी संघमित्रा ढोके यांचा महत्त्वपूर्ण हातभार आहे. त्यांना नगराध्यक्ष रेखा मोवाडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी यांच्यासह नगरसेवक आणि ग्रामस्थांनीही मदत केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.