Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २९, २०१८

आपणच तपासा आपले वीज बील!

vij bill साठी इमेज परिणाम       प्रासंगिक          

वीजदेयकाचे करा स्वत:च ऑडीट

‘खर्च झाल्याचे दु:ख नाही, हिशेब लागला नाही की मग त्रास होतो’ हे श्री. व.पु.काळे यांचे ‘वपुर्झा’ पुस्तकामधील वाक्य आपल्याला व्यवहारीक जीवनात तंतोतंत लागू होते असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा समजल्या जायच्या पण २१ व्या शतकात वीज ही प्रत्येकाची अत्यावश्यकच नव्हे तर मुलभूत गरज बनली आहे .पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या अनेक गरजा व दैनंदिन कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे. घर, कार्यालये,उद्योग,व्यवसाय, शेती, दुकाने वा कुठलेच ठिकाण याला अपवाद नाहीत. आजचे युग हे तांत्रिक युग आहे. त्यामुळे विजेवर चालणारी नवनवीन उपकरणे बाजारात येत आहे. त्यामुळे प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे व त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र हे उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की,विजेचे बीलही वाढत जाणार हे वेगळे सागण्याची गरज नाही. यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात आपल्याकडे उन्हापासून बचाव करण्याकरिता घरी, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी सातत्याने फॅन व कुलरचा व अनेक ठिकाणी एअर कंडीशनरचा वापर करण्यात येतो. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा वापर होत असल्यामुळे विजेचा वापर वाढणे सुद्धा साहजिकच आहे मात्र आपल्या हातात जून व जुलै महिन्याचे वीज देयक हाती आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बील भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचार्याच्या दोषामुळे चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटर मधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. मात्र हे सर्वच बाबतीत शक्य नाही. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल. त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वँट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपले महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीज बिलाची अंदाजीत रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.
त्याचबरोबर आपल्या वीज बिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०० ते ३०० व ३०० ते ५०० व ५०० ते १००० युनिट संदर्भातील दर छापलेले असतात.त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच उर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त उर्जा बचत होते. आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनदिन वापर याची माहिती झाल्यास वीज बिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीज बिल कमी करता येईल,व आलेले वीज बिल एवढे का? याचा उलगडा नक्की होईल.
१००० वॅटचे उपकरणाचा जर १ तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदर्भातील तक्ता सोबत दिला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च याचे ऑडिट केल्यास वीजबचत करणे सोपे होईल व वापरलेल्या वीजेचे बिल भरताना त्रास होणार नाही एवढे नक्की.
        


                                                                                                                      योगेश विटणकर,
                                                                                                           उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
                                                                                                  प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर
    

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.