पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना रोजगारासंदर्भात भजी (पकोडा) तळण्याचा सल्ला दिल्यावरुन केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत गिरगाव चौपाटीवर काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पकोडा निषेध आंदोलन करण्यात आले. पोलीस भरतीत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चंद्रपुरातील बेरोजगार तरुणतरुणींनी चक्क रस्त्यावर पकोडे तळून व फुकट वाटून सरकारला हाक दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पकोड्याचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली होती. दरम्यान, अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांचा समाचार घेतला होता. मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले होते. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला होता.
दरम्यान, रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी औरंगाबादचे तरुण गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर चक्क भजी तळून या तरुणांनी मोदींचा निषेध केला होता. त्यांच्या हातातील ‘नो जॉब नो जॉब, पकोडा शॉप पकोडा शॉप’ हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न मोदी यांनी तरुणांना दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा मोदी पकोडा स्टॉल लावण्याचा सल्ला देतात. पकोडा स्टॉल लावणे हे काम करणं चूकीचे नाही. मात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने अभ्यास करून वडिलांचा आर्थिक ताण सहन करत डिग्री मिळवली. त्यांची खिल्ली उडवण्याचे काम अशा वक्तव्यातून केलं जात असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. मोदींनी माफी मागावी किंवा आयटी कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात तरुणांना पकोडा सटॉल लावण्याची परवानगी देणारा आदेश काढावा अशी मागणीही या बेरोजगार तरुणांनी केली होती.
इकडे चंद्रपुरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथे केवळ ५१ जागांसाठी भरती होत आहे. त्याकरिता राज्यभरातून तब्बल १७ हजारांहून अधिक उमेदवार या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. यात स्थानिक युवकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या जागा वाढविण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेनेचे सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात पोलीस भरतीसाठी आलेल्या युवक-युवतींनी चंद्रपुरात पकोडा आंदोलन केले. त्यांनी तुकूम परिसरात ताडोबा मार्गावर पकोडे तळून नागरिकांना वाटत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात सुमारे १०० ते १५० युवक युवती सहभागी झाले होते. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा चंद्रपुरात दिवसभर होती. तसेही सध्या देशात पकोडा हा शब्दश: व खाद्यश: अशा दोन्ही अर्थांनी बहुचर्चित बनला आहे.