Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

संपादकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संपादकीय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर ०१, २०१८

सावली खादी चळवळीची माऊली

सावली खादी चळवळीची माऊली

                                     इंग्रजांचा युनियन जॅक ज्या प्रदेशावर कधीच फडकला नाही, असा भाग म्हणजे दंडकारण्यातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त भूभाग. हा गोंड राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेश म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला स्वतःचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढयातील चिमूर - आष्टीचा क्रांतीकारी उठाव सर्वानाच स्मरणात आहे. मात्र खादीच्या स्वावलंबनाचा मूलमंत्र देणारा प्रदेश म्हणूनही या जिल्हयाचे नाव इतिहासात नमूद आहे. पूर्वीच्या मध्यप्रांतातील चांदा जिल्हातील सावली येथून महात्मा गांधींनी ग्रामोव्दाराचा संकल्प भारताला दिला आहे. चंद्रपूरपासून 45 किलोमिटर पूर्वेकडे असणारे सावली हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळातील ग्रामोद्योग चळवळीचे केंद्र होते. या गावामध्ये 1936 मध्ये अखिल भारतीय गांधी सेवा संघाचे अधिवेशन घेण्यात आले होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात दोन वेळा या गावाला भेट दिली. 
आपल्या व्यस्तेत सात दिवस मुक्काम केला. त्‍यांनी सात दिवस या छोटया गावात मुक्काम ठेवावा असे नेमके या गावात काय असेल असा प्रश्न नेहमी पडायचा ? सावलीत यासाठी भेट दिली आणि ‘ सावली खादी चळवळीची माऊली ’ ही नवी ओळख डोळ्यापुढे आली. ग्रामोद्योगाच्या चैतन्याचे अग्नीकुंड डोळ्यापुढे आले. चरख्याचा आवाज, खादी घातलेल्यांची गर्दी आणि अहिंसा व असहकाराच्या आयुधाने जग हलवणा-या महात्मा गांधींचा संयत स्वर मनात गुंजला.







सावलीच्या नाग विदर्भ चरखा संघाच्या आवारात या भारावलेल्या वातावरणाची कुणालाही अनुभूती येईल. सावलीच्या भूमीत ठिकठिकाणी समर्पण आणि त्यागाची उदाहरण बघायला मिळाली. 82 वर्षाच्या राजाबाळ संगडीवार यांच्या थरथरत्या हाताला हाती घेत येथील इतिहास जाणता आला. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयाच्या पुढ्यातच तेव्हा उभ्या असलेल्या आम्रवृक्षाखाली महात्माजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा विवाह झाल्याचीही माहिती त्यांनी दिली. 
गांधीजींच्या सोबत सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉक्टर करिअप्पा, जमनालाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशीला नायर आदी नेतेही या काळात सावलीमध्ये मुक्कामी होते. येथील चरखा संघाच्या प्राचीन वास्तू मध्ये गांधीजी आणि त्यांच्या कार्याचा शोध घेताना या महात्म्याने आयुष्यभर "खेड्याकडे चला "असा नारा का दिला हे लक्षात आले. दीड-दोनशे चरख्यावर काम करणारे असंख्य हात आजही सावलीत सूत कताई करतात. सावलीच्या चरखा संघात अधिकही चरख्याची घरघर सुरू असून यावर महिला- पुरूष सूत काततात. या सुतापासून सावली मध्ये उत्तम प्रतीची खादी देखील तयार होते. अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग कमिशनचा हा चरखा संघ ऐतिहासिक वास्तू आहे. 100 वर्षांपासून सावली मध्ये सूतकताई आणि खादी तयार करण्याचे कार्य चालू आहे.

1927 पासून चरख्याची घरघर
1927 मध्ये नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने खादी भंडाराची सुरुवात झाली. पुढे 1958 पासून खादी ग्रामोद्योग कमिशन अंतर्गत नाग विदर्भ चरखा संघातंर्गत हे कार्यालय आले. 100 वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील हे तालुक्याचे गाव खादी परिवाराची जुळले असून या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व नामवंत व्यक्तींनी या छोट्याशा गावाला भेट दिली आहे. मात्र हे गाव इतिहासात अजरामर झाले ते महात्माजींच्या दोन भेटीमुळेच. सावली या गावाला महात्मा गांधी यांनी दोन वेळा भेट दिली. त्यांची प्रथम भेट 14 नोव्हेंबर 1933 रोजी झाली. तर दुसरी भेट 27 फेब्रुवारी 1936 रोजी झाली. 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत महात्मा गांधी याठिकाणी मुक्कामी होते. थोडक्यात सात दिवस सावली ही देशाची राजकीय राजधानी झाले होते. सावली या गावांमध्ये आज असणाऱ्या चरखा संघातील इमारतीमध्ये या महामानवाचे वास्तव्य होते. आजही या इमारतीत महात्माजींच्या वास्तव्याच्या आठवणी अनेक वस्तू करून देतात. चरखा संघ उत्तम रितीने आजही कार्यरत आहे. जीर्ण झालेल्या, अर्धवट उभ्या असलेल्या आजूबाजूच्या अनेक इमारती आपल्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा मात्र मूकपणे सांगत असतात. अडगळीत पडलेल्या जुन्या चरख्यांकडे बघितल्यानंतर शेकडो परिवाराला रोजगार देण्याची ऊर्मी, एकतेची कळकळ, अस्पृश्यता निवारणाची चळवळ आणि स्वावलंबत्वाची मशाल कधीकाळी या चरख्यामध्ये पेटत होती, जाणवते.

सावलीतच चरखा संघ का ?
सावली परिसरात पूर्वापार मोठ्या प्रमाणात सूतापासून विणकर खादीचे कपडे, पासोड्या आदी तयार करीत होते. या भागात त्या काळामध्ये उत्तम प्रतीच्या धानाचे उत्पन्न व्हायचे तर वणी पासून पुढे लागणाऱ्या वऱ्हाड प्रांतात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित व्हायचा. त्यामुळे उच्च प्रतीचे तांदूळ वऱ्हाडात आणि व-हाडातला कापूस विणकरांच्या घरात, अशा पद्धतीची व्यापाराची रचना पूर्वापार होती. धानाचे पीक घेतल्यानंतर वर्षभर सूतकताईचे काम या परिसरात सुरू असायचे. तसेच या परिसरातील पद्मशाली समाज देखील लुगडे, धोतर तयार करण्याचे काम करत होते. येथील केवट समाजाने कोशाच्या किड्यांपासून कोशाच्या धाग्याची निर्मिती केली आहे. त्यापासून कोशाचे कापड, कोशाचे फेटे विणले जात होते या समाजाला को शाकारी म्हणत या समाजातील व्यापारी लोकांची भेट त्या काळातील प्रसिद्ध उद्योजक आणि महात्मा गांधींचे स्नेही जमनालाल बजाज यांच्याशी झाली. पुढे त्यांची भेट महात्मा गांधीजींची झाली. त्यावेळेस महात्मा गांधीची ग्रामस्वराज्य कल्पनेने भारलेले होते. सावली परिसरातील पूरक वातावरण बघता याठिकाणी खादी उद्योगाला बळकट करण्याचे जमनालाल बजाज यांच्या मनात आले. त्यांनी नर्मदा प्रसाद अवस्ती यांच्याकडे या भागाची जबाबदारी सोपवली. 1927 मध्ये खादी भांडार याची सावली येथे स्थापना झाली. नर्मदा प्रसाद हे या भंडाराचे चे पहिले व्यवस्थापक होय, आता बाळू पवार हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यापूर्वी जगजीवन बोरकर यांनी सुद्धा या ठिकाणी काम केले आहे.

सावली भारताच्या नकाशावर
सावली त्या काळात पूर्ण देशांमध्ये अतिशय प्रसिद्ध असेल खादी निर्माण करणारे गाव होते. खादीच्या स्वयंपूर्णतेने सावली या गावांमध्ये एकेकाळी 2700 चरख्यावर हजारोंच्या संख्येने हात सूतकताईचे काम करत होते. एव्हढेच नव्हे तर आसपासच्या जिबगाव, नांदगाव, बेंबाळ, भेंडाळा, व्याहाळ बुज, गडचिरोली या प्रमुख गावांमध्ये चरखा उपसंघ उभारण्यात आले होते. या ठिकाणावरून खादी बनवण्यासाठी सूत पुरवले जात होते... हे सारे ऐकूनच आज नवल वाटते. सावली खादी धोतर, टॉवेल, लुंगी, साड्या, कोसा धोतर, सूती पॅन्ट, कापड शुभ्र व रंगीत शर्टाचे कापड, मच्छरदाणी कापड इत्यादी ब्रांड सावलीने मध्य भारतामध्ये रुजवले होते. मुंबई पर्यंत सावली वरून तयार केलेले खादीचे कपडे विशेष करून वापरल्या जात होते. आजही या ठिकाणी सूतकताईचे काम चालते याठिकाणी हातमागाचे अद्याप अत्यंत सुद्धा आहे. गावातील अनेक महिला सध्या सूतकताईसाठी या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या कार्यालयाला भेट दिल्यावर अनेक महिला या ठिकाणी काम करत असल्याचे दिसून आले. आजच्या काळातही परवडले इतका रोजगार सूतकताईतून दिल्या जातो. अनेक महिला फावल्या वेळात याठिकाणी न्यूज सूतकताईचे काम करतात. सावली सारख्या भागामध्ये अशा पद्धतीचे कामकाज गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असल्याचे ऐकून आनंद वाटला.

चरख्याचा शोध आणि ग्रामोद्योग
चरख्याचा शोध 1915 मध्ये महात्मा गांधी भारतात परतले. त्यांनी कोचरब येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. या काळात त्यांनी संपूर्ण वर्षभर भारतभ्रमण केले. ग्रामीण भारताला त्यांनी या काळात जवळून बघितले. गांधीजी ईश्वरवादी होते, परंतु त्यांचा मोक्ष हा सेवेमध्ये होता. त्यांचा ईश्वरप्राप्तीचा मार्ग जनतेची सेवा होते. चालत्या बोलत्या रूपात असणाऱ्या सामान्य माणसाला ते ईश्वर मानत भारताचे स्वातंत्र्य म्हणजे त्यातल्या सात लाख खेड्यांचे स्वातंत्र्य ही त्यांची धारणा होती. त्यामुळे खेडी अर्थात गाव आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय स्वातंत्र्याच्या नैतिक लढाईला बळ येणार नाही. याबाबत त्यांच्या मनात शंका नव्हती. त्यामुळेच शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या ग्रामीण जनतेला उद्योग व्यवसायासाठी दुसऱ्या एखाद्या सर्वमान्य पूरक धंद्याची आवश्यकता त्यांच्या मनात आली. या काळातच संपूर्ण भारत इंग्रजांनी तलम कपड्याची बाजारपेठ बनवली होती. दुसरीकडे स्वस्त कपडा नसल्याने लोकांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नव्हते. दारिद्र्यात खितपत पडलेल्या जनतेसाठी अशावेळी खादी सारखा पर्याय पुढे आणण्याचा गांधीजी विचार करत होते. त्यांच्या आश्रमात खादी तयार होत होती. मात्र सूत तयार होत नव्हते. अशावेळी त्यांना आठवला चरखा मात्र तोपर्यंत आपल्या गावागावातील चरखा अडगळीत पडला होता. गांधीजींनी चरख्याला जिवंत केले. बडोदा संस्थानमधील विजापूर या गावी 1915 साली गांधीजींनी अडगळीत पडलेला चरखा शोधून काढला. पुढे चरख्याने इतिहास घडवला. अडगळीत पडलेल्या चरखा बाहेर पडून थेट काँग्रेसच्या झेंड्यावर आला. सूतकताईला गांधीजींनी ग्रामीण भागातील आर्थिक स्वातंत्र्याचा दर्जा दिला. घराघरात चरखा फिरायला लागला. खादी घालेल तोच काँग्रेसचा कार्यकर्ता असा दंडक त्यांनी प्रसंगी घातला. महात्मा गांधींचे वलय त्यांच्या शब्दाला असणारा मान यामुळे संपूर्ण ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खादीची चळवळ सुरू झाली. देश कापडाच्या दृष्टीने स्वावलंबी झाला. एका महात्म्याने ग्रामीण भागातील जनतेच्या आर्थिक स्वावलंबिता व व संपन्नतेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे देशातील हजारो खेडी कोणत्याही संपर्क व्यवस्थेशिवाय गांधीजींच्या पाठीशी उभी राहिली. सावली सारख्या चंद्रपूर जिल्हयातील छोटयाशा गावाने चरख्याच्या अग्नीकुंडातून देशाच्या स्वातंत्र्य लढयाला, ग्रामोध्दाराला अशी चालना दिली.

                                                                          प्रवीण टाके
                                                                     जिल्हा माहिती अधिकारी
                                                                        चंद्रपूर-9702858777

शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८

दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य !

दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने पोलंडमधील वैज्ञानिक परिषदेत ‘स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) या संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’ हा शोधप्रबंध सादर !

बहुतांश झोपेशी संबंधित व्याधींचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते. ज्या समस्यांचे मूलभूत कारण आध्यात्मिक असते,त्यांचे संपूर्ण आणि कायमस्वरूपी निवारण केवळ आध्यात्मिक उपायांनीच होऊ शकते. नामजपासारखी दैनंदिन आध्यात्मिक साधना जीवनातील समस्यांच्या मूलभूत आध्यात्मिक कारणांवर प्रतिबंधात्मक कार्य करते, तसेच समस्यांचे निवारणही करते.दैनंंदिन आध्यात्मिक साधनेमुळे झोपेशी संबंधित व्याधींवर मात शक्य होते. त्याचबरोबर साधना करणार्‍या व्यक्तीची आध्यात्मिक उन्नतीही होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी सादर केलेल्या ‘स्वप्ने आणि झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) या संदर्भातील आध्यात्मिक दृष्टीकोन’, या शोधनिबंधात मांडली. या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तर सौ. किस्लौस्की सहलेखिका आहेत. २० आणि २१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत फोकस प्रिमियम हॉटेल, ग्डान्स्क, पोलंड येथे ग्डान्स्क विद्यापिठाने आयोजित केलेल्या द्वितीय आंतरराष्ट्रीय इंटरडिसिप्लिनरी कॉन्फरन्समध्ये हा शोधनिबंध मांडण्यात आला.

सौ. किस्लौस्की पुढे म्हणाल्या की, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाची स्थापना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या ३७ वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनाच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर केली आहे. या विश्‍वविद्यालयाच्या वतीने सूक्ष्म जगत आणि त्याचा मानवावर होणारा परिणाम यांबाबतही संशोधन केले जाते. अतिंद्रिय घटनांसंदर्भातील वस्तू आणि ध्वनिचित्रीकरण यांचा जगातील सर्वात मोठा साठा विश्‍वविद्यालयाकडे आहे.

त्यानंतर सौ. किस्लौस्की यांनी ‘अतिंद्रिय कारणांमुळे पडणारी स्वप्ने आणि स्वप्नावस्था किंवा जागेपणी भासमान होणारी दृश्ये (Phantasms)’ या संदर्भातील त्यांचे संशोधन मांडले. हे संशोधन प्रभावळ आणि ऊर्जा मापक यंत्रे, तसेच स्पंदनशास्त्राचा अभ्यास यांच्या साहाय्याने केले आहे. जीवनातील सर्व समस्यांची मूलभूत तीनच कारणे म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असतात, हे या संशोधनातील प्रमुख सूत्र आहे. प्रारब्ध हे आध्यात्मिक कारणांपैकी प्रथम कारण आहे. आपल्या जीवनातील आपल्या नियंत्रणाबाहेरच्या घटना म्हणजे प्रारब्ध. दुसरे आध्यात्मिक कारण म्हणजे सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती,तर अतृप्त मृत पूर्वजांचे लिंगदेह, हे तिसरे आध्यात्मिक कारण आहे. रात्री वाटणार्‍या अनामिक भीतीमागील (Night terrors)प्रमुख मूलभूत कारण मानसिक असते; मात्र भीतीदायक स्वप्ने, झोपेतील अर्धांगवायू (स्लीप पॅरालिसिस) आणि झोपेत चालणे,यांमागील मूलभूत कारण आध्यात्मिक असते. सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती आणि अतृप्त मृत पूर्वजांचे लिंगदेह ही या व्याधींची मूलभूत कारणे असतात.

एका आध्यात्मिक संशोधन केंद्रामध्ये ४४ जणांच्या केलेल्या सर्वेक्षणातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रेही त्यांनी मांडली. या सर्वेक्षणातील ८५ टक्के जणांनी सांगितले की, त्यांनी आध्यात्मिक साधना चालू केल्यानंतर त्यांच्या स्लीप पॅरालिसिसची वारंवारता आणि तीव्रता वाढली. सर्वेक्षणातील ६५ टक्के जणांनी सांगितले की, त्यांना हा त्रास साधना सुरू केल्यानंतर चालू झाला; मात्र ते जसजशी साधना करत गेले, तशी या त्रासाची वारंवारता आणि तीव्रता कमी होत गेली. जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक उन्नती घडवून आणणारी योग्य साधना चालू करते, तेव्हा सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्ती त्या व्यक्तीला साधनेपासून परावृत्त करण्यासाठी झोपेशी संबंधित व्याधींसारख्या अडचणी निर्माण करतात. साधारणतः ५० टक्के स्वप्ने पडण्यामागे सूक्ष्म जगतातील अनिष्ट शक्तींचा हात असतो. भीतीदायक स्वप्नांच्या बाबतीत हा प्रभाव अजून अधिक असतो. उर्वरित ५० टक्के स्वप्नांवर आपल्या अंतर्मनाचा प्रभाव असतो.

शोधप्रबंधाच्या समारोपात सौ. किस्लौस्की यांनी झोपेशी संबंधित व्याधींवर केलेल्या त्यांच्या विस्तृत संशोधनावर आधारित काही उपाय सांगितले. सर्वेक्षणातील ८० टक्के व्यक्तींनी सांगितले की, स्लीप पॅरालिसिसची तीव्रता कितीही जास्त असली, तरी त्यातून बाहेर पडण्यात त्यांच्या दैनंदिन साधनेच्या प्रयत्नांची सर्वाधिक मदत झाली. नामजपामुळे स्लीप पॅरालिसिसमधून पटकन बाहेर येता आले, असे सर्वांनीच सांगितले. यासाठी दर दिवशी किमान २ घंटे नामजप करणे आवश्यक असते. समस्येची तीव्रता अधिक असल्यास नामजप अधिक कालावधी करायला हवा. प्रत्यक्ष स्लीप पॅरालिसिस झाले असतांना देवाला प्रार्थना करणे आणि नामजप यांमुळे त्यातून लवकर बाहेर पडता येते. स्लीप पॅरालिसिस होणार असल्याची चाहूल लागताच नामजप चालू करणे किंवा असल्यास नामजप वाढवणे याचा लाभ होतो.

आपला नम्र,
श्री. रूपेश रेडकर,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, (संपर्क : 9561574972)

मंगळवार, मे २९, २०१८

आपणच तपासा आपले वीज बील!

आपणच तपासा आपले वीज बील!

vij bill साठी इमेज परिणाम       प्रासंगिक          

वीजदेयकाचे करा स्वत:च ऑडीट

‘खर्च झाल्याचे दु:ख नाही, हिशेब लागला नाही की मग त्रास होतो’ हे श्री. व.पु.काळे यांचे ‘वपुर्झा’ पुस्तकामधील वाक्य आपल्याला व्यवहारीक जीवनात तंतोतंत लागू होते असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा समजल्या जायच्या पण २१ व्या शतकात वीज ही प्रत्येकाची अत्यावश्यकच नव्हे तर मुलभूत गरज बनली आहे .पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या अनेक गरजा व दैनंदिन कामे विजेच्या उपकरणावरच अवलंबून आहेत ही वस्तुस्थिती आहे. घर, कार्यालये,उद्योग,व्यवसाय, शेती, दुकाने वा कुठलेच ठिकाण याला अपवाद नाहीत. आजचे युग हे तांत्रिक युग आहे. त्यामुळे विजेवर चालणारी नवनवीन उपकरणे बाजारात येत आहे. त्यामुळे प्रत्येक घरी विद्युत उपकरणांची यादी वाढतच आहे व वाढतच जाणार आहे व त्यात रोज नवनवीन विद्युत उपकरणाची भर पडत आहे. मात्र हे उपकरणे वाढली व त्याचा वापर वाढला की,विजेचे बीलही वाढत जाणार हे वेगळे सागण्याची गरज नाही. यासोबतच दरवर्षी उन्हाळ्यात आपल्याकडे उन्हापासून बचाव करण्याकरिता घरी, दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी सातत्याने फॅन व कुलरचा व अनेक ठिकाणी एअर कंडीशनरचा वापर करण्यात येतो. तापमानापासून बचाव करण्यासाठी याचा वापर होत असल्यामुळे विजेचा वापर वाढणे सुद्धा साहजिकच आहे मात्र आपल्या हातात जून व जुलै महिन्याचे वीज देयक हाती आले की, अनेकांच्या भुवया उंचावतात. माझा वापर एवढा नसताना बील भरमसाठ आल्याचे त्यांना वाटत असते. एखाद्या प्रकरणात कर्मचार्याच्या दोषामुळे चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटर मधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. मात्र हे सर्वच बाबतीत शक्य नाही. त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये, दुकान व इतर ठिकाणी असलेली विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनदिन वापर याची जर माहिती करून घेतली व अभ्यास केला तर आपल्यालाही सत्यता पडताळता येईल. त्यासाठी वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व अॅप आहेत त्यावर जाऊन आपण आपल्या घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वँट व संख्या,आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास ही माहिती टाकल्यास आपले महिन्याला होणारा एकूण युनिट वापर व वीज बिलाची अंदाजीत रक्कम याची माहिती आपण प्राप्त करू शकता.
त्याचबरोबर आपल्या वीज बिलाच्या मागे असलेल्या वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रती युनिट दर दिलेले असतात त्यामध्ये ० ते १००, १०० ते ३०० व ३०० ते ५०० व ५०० ते १००० युनिट संदर्भातील दर छापलेले असतात.त्यामुळे एखाद्या महिन्यात जास्त वीज युनिट वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढत असतात. घरात विजेचा वापर करताना आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच उर्जा बचतीचे प्रमाणपत्र लाभलेल्या व स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर करावा, जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त उर्जा बचत होते. आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनदिन वापर याची माहिती झाल्यास वीज बिलाचे नियोजन करण्यासाठी विजेच्या वापरावर लक्ष ठेवून वीज बिल कमी करता येईल,व आलेले वीज बिल एवढे का? याचा उलगडा नक्की होईल.
१००० वॅटचे उपकरणाचा जर १ तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते, त्यामुळे एकूण विजेचे वॅट व १ युनिट विजेसाठी लागणारा वेळ यासंदर्भातील तक्ता सोबत दिला आहे. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती घेतल्यास व स्वत:च याचे ऑडिट केल्यास वीजबचत करणे सोपे होईल व वापरलेल्या वीजेचे बिल भरताना त्रास होणार नाही एवढे नक्की.
        


                                                                                                                      योगेश विटणकर,
                                                                                                           उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
                                                                                                  प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर
    

शनिवार, मार्च ०३, २०१८

डावे गेले, भगवे आले

डावे गेले, भगवे आले

ईशान्य भारतामधील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी(3 मार्च) जाहीर झाले. सुरुवातीचे कल पाहता त्रिपुरामध्ये भाजपाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. याठिकाणी तब्बल 25 वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे सरकार येणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मेघालयात भाजपाला तितकेसे यश मिळालेले नाही. याठिकाणी काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचे चित्र आहे.
या दोन राज्यांबरोबर नागालँडमध्ये सत्ताधारी नागा पिपल्स फ्रंटने (एनपीएफ) भाजपासोबतची 15 वर्षांची युती तोडल्यामुळे तिथे काय होणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. एनपीएफमधून फुटून निघालेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नेपीयू रीयो यांच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीशी (एनडीपीपी) भाजपाने युती केली होती. दुपारी 12 वाजेपर्यंतचे निकाल पाहता, नागालँडमध्येही भाजपने नव्या मित्रासोबत (एनडीपीपी) चांगले यश मिळवल्याचे चित्र आहे.
नागालँड विधानसभेची सदस्य संख्या ६० असून ५९ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. मावळत्या विधानसभेत एनपीएफचे ३८ , काँग्रेस-८, राष्ट्रवादी काँग्रेस-४, भाजप-१, जेडीयू-१ अपक्ष-८ असे पक्षीय बलाबल होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपा-एनडीपीपी 32, एनपीएफ 26 आणि अपक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तुर्तास तरी भाजप आपल्या नव्या मित्राच्या सहाय्याने नागालँडमध्ये पुन्हा सत्तेत येईल, असे चित्र दिसत आहे. नागा पिपल्स फ्रंट पक्ष या ठिकाणी 2003 पासून सत्तेत होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजपाने राज्यात स्वत:ची पाळेमुळे रोवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेली २५ वर्षं डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरात भाजपनं मुसंडी मारलीय. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकलेल्या भाजपनं तिथे स्पष्ट बहुमत मिळवून माणिक सरकार यांचं सरकार खालसा केलंय, तर नागालँडमध्ये नव्या मित्राला सोबत घेऊन जुन्या मित्राला - नागा पीपल्स फ्रंटला धूळ चारली. त्यामुळे 'सेव्हन सिस्टर्स'पैकी पाच राज्यांत आता भाजपचा झेंडा फडकतोय. मेघालयमध्येही काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं त्यांनी सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात, पण आत्तातरी ईशान्येतील पाच राज्यं धरून देशातील एकूण २० राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सत्तेत आहे. काँग्रेसप्रणित यूपीएकडे फक्त पाच राज्य उरली आहेत. याचाच अर्थ, देशातील ६७.८५ टक्के जनतेवर एनडीएचं राज्य आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, जम्मू, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा येथे भाजपची सत्ता आहे
कर्नाटक, पंजाब, मेघालय, मिझोरम, पाँडेचरी या पाच राज्यात काँगेसची सत्ता आहे. काँग्रेसची सत्ता ज्या राज्यांमध्ये आहे, तिथे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ७.७८ टक्के जनता राहते. एनडीएची सत्ता असलेल्या २० राज्यांमधील लोकसंख्येचा विचार केल्यास, ६७.८५ टक्के जनतेचे ते राजे आहेत. तर उर्वरित २४ टक्के जनतेवर तृणमूल, अण्णा द्रमुक, बीजू जनता दल, टीआरएस, डावे आणि आम आदमी पार्टी यांचं राज्य आहे.

शनिवार, फेब्रुवारी १०, २०१८

पकोडा आंदोलन

पकोडा आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना रोजगारासंदर्भात भजी (पकोडा) तळण्याचा सल्ला दिल्यावरुन केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत गिरगाव चौपाटीवर काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पकोडा निषेध आंदोलन करण्यात आले. पोलीस भरतीत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चंद्रपुरातील बेरोजगार तरुणतरुणींनी चक्क रस्त्यावर पकोडे तळून व फुकट वाटून सरकारला हाक दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पकोड्याचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली होती. दरम्यान, अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांचा समाचार घेतला होता. मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले होते. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला होता.
दरम्यान, रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी औरंगाबादचे तरुण गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर चक्क भजी तळून या तरुणांनी मोदींचा निषेध केला होता. त्यांच्या हातातील ‘नो जॉब नो जॉब, पकोडा शॉप पकोडा शॉप’ हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न मोदी यांनी तरुणांना दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा मोदी पकोडा स्टॉल लावण्याचा सल्ला देतात. पकोडा स्टॉल लावणे हे काम करणं चूकीचे नाही. मात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने अभ्यास करून वडिलांचा आर्थिक ताण सहन करत डिग्री मिळवली. त्यांची खिल्ली उडवण्याचे काम अशा वक्तव्यातून केलं जात असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. मोदींनी माफी मागावी किंवा आयटी कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात तरुणांना पकोडा सटॉल लावण्याची परवानगी देणारा आदेश काढावा अशी मागणीही या बेरोजगार तरुणांनी केली होती.
इकडे चंद्रपुरात सध्या पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. येथे केवळ ५१ जागांसाठी भरती होत आहे. त्याकरिता राज्यभरातून तब्बल १७ हजारांहून अधिक उमेदवार या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. यात स्थानिक युवकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या जागा वाढविण्यात याव्या, या मागणीसाठी शिवसेनेचे सुरेश पचारे यांच्या नेतृत्वात पोलीस भरतीसाठी आलेल्या युवक-युवतींनी चंद्रपुरात पकोडा आंदोलन केले. त्यांनी तुकूम परिसरात ताडोबा मार्गावर पकोडे तळून नागरिकांना वाटत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात सुमारे १०० ते १५० युवक युवती सहभागी झाले होते. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा चंद्रपुरात दिवसभर होती. तसेही सध्या देशात पकोडा हा शब्दश: व खाद्यश: अशा दोन्ही अर्थांनी बहुचर्चित बनला आहे.