दत्ताजी डिडोलकर : एक प्रेरक व्यक्तित्व | Shankhnaad News #shankhnaadnews #live
बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील छोटेसे गाव डिडोळ ही डिडोळकर परिवाराची मूळ भूमी. जळगाव जामोद येथे या परिवाराची थोडीफार शेतीही होती. मात्र, त्या काळातल्या प्रथेशी सुसंगत असणार्या मोठ्या संख्येच्या परिवाराचा संपूर्ण चरितार्थ शेतीवर होणे शक्य नव्हते. त्यामुळे तीन-चार पिढ्यांपूर्वीच घरातील काही भाऊ नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने शहराकडे वळले. देवीदासराव या काळात नागपूर येथे ब्रिटिश आमदनीतल्या कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करू लागले. जळगाव जामोद येथील शेतीत त्यांच्या वाट्याची दीड एकर जमीन होती. मात्र, पुढे ती जमीन कसण्याकरिता त्यांच्या मुला-नातवंडांपैकी कोणी गावात न राहिल्याने ती जमीन डिडोळकर परिवाराने जळगाव जामोद नगरपरिषदेला दान करून टाकली. आज तेथे गंगूबाई डिडोळकर यांच्या नावाने नगरपरिषदेने एक उद्यान उभारले आहे. याच गंगूबाईंच्या पोटी दत्तात्रेय देवीदासराव डिडोळकर यांचा जन्म १९२३ साली, ऑगस्ट महिन्याच्या ७ तारखेला झाला. प्रचलित परंपरेनुसार, आईच्या माहेरी मलकापूर येथे त्यांचा जन्म झाला. विश्वनाथ आणि काशिनाथ या दोघा मुलांच्या पाठीवर आणि शैलजा या सगळ्यात धाकट्या मुलीच्या आधी तिसर्या अपत्याच्या रुपाने दत्तात्रय हे डिडोळकरांच्या परिवारात दाखल झाले.
दत्ताजींचे वडील नागपूरला कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करीत होते. विश्वनाथ आणि काशिनाथ या दोघा ज्येष्ठ बंधुंचे शिक्षण नागपुरातच सुरू होते. चिटणीसपुरा येथे त्यांचे वास्तव्य होते. नागपूरचा हा महाल, चिटणीसपुरा इ. भाग ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आद्यभूमी. महालातल्या मोहितेवाड्यातच पहिली संघशाखा सुरू झाली होती आणि वर्षभरातच संघशाखांचा विस्तार फोफावू लागला होता. मैदानावर भरगच्च संख्येने (अगदी दीडशे-दोनशेसुद्धा) जमलेल्या कुमार-किशोरांच्या जत्रा रोज संध्याकाळी फुलू लागल्या होत्या. मैदानी खेळ, कसरती-कवायती, देशभक्तीपर गोष्टी-गीते इत्यादीच्या माध्यमांतून बालवयातल्या उत्साह, जोशाला उत्तेजन देण्याबरोबरच शिस्त आणि राष्ट्रीयता यांचे संस्कार बळकट करण्यावर शाखेवरील कार्यकर्त्यांचा भर असे. शाखेत अर्थातच शालेय वयाच्या बालकांचा (संघाच्या परिभाषेत बाल आणि शिशु) मुख्यतः भरणा असे. शाखा चालविणार्या कार्यकर्त्यांमध्ये थोडेसे मोठ्या वयाचे, तरुण असत. वडील देवीदासराव आणि दोघे मोठे भाऊ यांचाही संघशाखांशी संपर्क होताच. खेळ, खोड्या, दंगामस्ती यांसारख्या शैशव सुलभ बाबींना शाखेमध्ये भरपूर वाव होता. घरातल्या वडिलधार्यांची मानसिकता ही मुलांभोवती अतिरिक्त संरक्षक कवच उभारून, त्यांना चार भिंतीमध्ये बंदीस्त करण्याची नव्हती. उलट, उघड्या मैदानावर भरपूर खेळावे, मित्रमेळा जमवावा यासाठी घरातून प्रोत्साहन असायचे. शाखेवर समवयस्क सवंगडी भरपूर मिळायचे. खेळांचेही आकर्षण होतेच. त्यासोबत देशभक्तीपर गाणी, ऐतिहासिक महापुरूषांच्या रोमहर्षक गोष्टी इत्यादीमधून बालमनांवर देशप्रेमाचे, सामूहिकतेचे आणि अनुशासनाचे संस्कारही सहजपणे अंकित होते असत. बाळासाहेब, भाऊराव देवरस बंधूही याच काळात बाल स्वयंसेवक या रूपात संघ शाखांच्या कामात भरपूर सक्रिय होते. बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्त्वाखाली ‘कुशपथक’ नावाचा मुलांचा एक विशेष गटच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी निर्माण केला होता. खुद्द डॉक्टरांच्याच सूक्ष्म देखरेखीखाली विकसित होत असलेल्या संघाच्या या प्रारंभिक वाटचालीच्या काळातच दत्ताजी शाखेत रमू लागले होते. स्वाभाविकच संघस्पर्शाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा आणि खोलवर उमटला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच संघसंस्कारही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फुलत गेला; इतका की, पुढच्या सार्या आयुष्यातल्या जगण्याचा तोच एक प्रमुख घटक झाला.
SHARE THIS