काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमध्ये वाद उफळला
भाजपसोबत डान्स; काँग्रेस अध्यक्षांवर पदमुक्तीची कारवाई
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाशी युती करून निवडणूक जिंकल्यानंतर आनंदात ढोलताशा व गुलालाची उधळण करत भाजपा जिल्हाध्यक्षांसोबत (BJP district president Deorao Bhongle) डान्स करणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे (Congress district president Prakash Devtale) यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या निवडणुकीवरून आमदार विजय वडेट्टीवार (MLA Vijay Wadettiwar )आणि खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांच्यात शीतयुद्ध झाले होते. खासदार बाळू धानोरकर गटाचा पराभव केल्याच्या आनंदात ढोलताशा व गुलालाची उधळण करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आनंद व्यक्त केला होता.
बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेल्या चंद्रपूरचे खासदार धानोरकर आणि माजी मंत्री ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार यांच्यामध्ये आता शितयुद्ध सुरू झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. मात्र चंद्रपूर शहरालगत असलेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आणि भाजपने हात मिळवणी केली.
स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजपा किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये अशा स्पष्ट सूचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या. तरीही काँग्रेस अध्यक्ष देवतळे यांनी उघडपणे भाजपासोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे. त्यामुळे त्यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा प्रभार पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी (City District Congress Committee President Ritesh Tiwari ) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.