यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील इन्स्परेशन फेलोशिप कार्यक्रमात उपस्थितांशी शरद पवार यांनी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील मुद्दे
एका वेगळ्या आणि चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण याठिकाणी एकत्रित आलो. यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने अनेक कार्यक्रम घेतले जातात. वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. हे करत असताना जीवनाच्या काही महत्वाच्या क्षेत्रात काही आगळवेगळं काम करण्याची इच्छा ज्या नव्या पिढीमध्ये आहे त्यांना हुडकून प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम हा आखला पाहिजे असे सुप्रिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले. त्यामधून या फेलोशिपचा जन्म झाला.
बाहेर फिरत असताना आम्ही पाहतो की अनेक क्षेत्रामध्ये साधीसाधी माणसं काही चमत्कार करत असतात. या सर्व फेलोशिपमध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, साहित्य अशा विशेष दोन-तीन विषयावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
देशाच्या कृषी मंत्रालयाची शपथ घेऊन आल्यावर माझ्यासमोर सर्वात प्रथम फाईल ही धान्य आयात करण्यासाठी आली. तेव्हा मनामध्ये एक निर्धार पक्का केला की काही वाटेल ते झालं तरी देशातील हे चित्र बदलायचे. यात गहू, तांदूळ, दूध, भाजीपाला, फळ या सर्व क्षेत्रात काही ना काही केल पाहिजे. हे कोण करू शकतं तर शेतकरी वर्गातील नवी पिढी. या पिढीला अधिकाधिक प्रोत्साहित केलं. या कामामध्ये मला डॉ. मायींची मला मदत झाली. त्यांनी देशामधील प्रत्येक कृषी संशोधन केंद्रात उत्कृष्ट लोकांची भरती केली.
या सर्व कालखंडात शेतकऱ्याला प्रोत्साहित करण्याचे काम धोरणात्मक निर्णय घेऊन आम्ही केले. पण शेतकऱ्यांनी देखील कर्तृत्व दाखवले. आज तुमचा सन्मान होतो मात्र कितीतरी असे शेतकरी आहेत ज्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. तरी देखील ते यशस्वी झाले. चंद्रपूर जिल्ह्यात नागभिड तालुक्यातील खोब्रागडे नावाचा दलित शेतकरी शिक्षित नव्हता, पण शेतीमध्ये अतिशय लक्ष घालणारा. त्याने पिकाचे उत्पादन वाढेल कसे याकडे लक्ष देऊन राज्यात दरएकरी सर्वाधिक पिकाचे उत्पादन घेणारा शेतकरी म्हणून यशस्वी झाला. त्याचा परिणाम राज्यपातळीवर त्यांना सन्मान मिळाला.
आज काही क्षेत्रात आपण अजूनही मागे आहोत. खाद्यतेलाच्या बाबतीत आपण अजूनही मागे आहोत. अक्षरश: हजारो कोटी रुपयाचे खाद्यतेल आपण आयात करतो. यासाठी देशातील काही घटकाने मोहरीच्या माध्यमातून खाद्यतेलाचे उत्पादन वाढवू शकतो असे संशोधन केले आहे. त्याला परवानगी दिली तर मला खात्री आहे की या देशाची खाद्यतेलाची गरज भागेल. असे काम करणारे अनेक लोक आहेत. ते शेती, साहित्य, शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत.
प्रोत्साहन दिले, काम करण्याची व कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली तर लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. आज तुम्ही सर्वांनी ज्या क्षेत्रात काम केले त्याबद्दल सन्मानित करण्यात आले. माझी आग्रही सूचना व विनंती आहे की हे काम तुम्ही थांबवू नका. सतत काही ना काही नवीन करण्याची कल्पना डोक्यात ठेवा. अपयश आले तरी त्यावर मात करण्याची हिंमत ठेवा माझी खात्री आहे तुम्ही जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
आज हा देश अनेक क्षेत्रात पुढे गेला आहे. तो पुढे गेला त्याचे कारण सामुहिक शहाणपणाची प्रवृत्ती समाजातील नव्या पिढीमध्ये आहे तिचा उपयोग करून घेण्यासंबंधी भूमिका घेतली त्याचे हे परिणाम झाले आहे.
ही फेलोशिप संकल्पना राबवून या माध्यमातून काही चांगले कर्तृत्ववान नव्या पिढीतील घटक पुढे येतील याची मला पूर्ण खात्री आहे. सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन.