Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १६, २०२२

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर




पुणे, दि.१६: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ येथे आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंदर सिंह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दिशा देण्यासाठी त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून तणावमुक्त शिक्षण दिले पाहिजे.

पायाभूत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी कृतीयुक्त शिक्षण द्यावे. व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठित, तांत्रिक शिक्षण देण्यावर भर द्यावा. शैक्षणिक प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागाने सतत प्रयत्नशील रहावे. शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल करावे, नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण द्यावे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर द्यावा, असेही श्री. केसरकर म्हणाले.

विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेवून वेळेत निकाल लावावेत. शासन आदेशांची अंमलबजावणी वेळेत करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

मंत्री केसरकर म्हणाले, दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत राज्य व विभाग स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या प्रकारच्या शिष्यवृत्ती, पारितोषिके देण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून इच्छुक कंपन्या सहकार्य करतात. त्यांच्याशी   संपर्क करून अशा प्रकारच्या देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा प्रयत्न करावा. 

श्री. देओल म्हणाले, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी विभाग नेहमी प्रयत्नशील आहे. बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे ते म्हणाले.

यावेळी श्री. गोसावी यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीस शिक्षण संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण आयुक्तालयाचे सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेचे  सहसंचालक रमाकांत काठमारे, उपसंचालक  डॉ.कमलादेवी आवटे, प्राचार्य विकास गरड, परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड, शैलजा दराडे, माध्यमिक शिक्षण उपसंचालक डॉ.वंदना वाहुळ, प्राथमिक शिक्षण उपसंचालक निलिमा टाके आदी उपस्थित होते.
000

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.