Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १८, २०२१

नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील जलसंवर्धनाच्या कामाची केली पाहणी |

वर्ध्यातील धाम नदी तसेच मोती नाला या ठिकाणी झालेल्या जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांची माहिती



नागपूर/ वर्धा 18 ऑक्टोबर 2021
पुराच्या पाण्यामुळे धाम नदी तसेच मोती नाला या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होत होते. परंतु ही समस्या आता नाला रुंदीकरण व खोलीकरण यामुळे उद्भवत नसून या ठिकाणी झालेल्या जलसंधारणामुळे सुमारे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली असून 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याची माहिती केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज वर्धा येथे पत्रकार परिषदेत दिली. 



नितीन गडकरी (Nitin Gadkari) वर्धा जिल्ह्यातील (Wardha district) जलसंवर्धनाच्या कामाची पाहणी करण्याकरता एक दिवसाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी ही माहिती दिली. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील येळाकेळी गावच्या धामनदीच्या 26 किलोमीटर लांबीच्या तसेच मांडवा येथील मोती नाल्याच्या 9 किलोमीटर लांबीच्या जलसंधारणाचे कार्य चालू आहे. यातील धाम नदीच्या जलसंधारणाच्या कार्याला जमनालाल बजाज फाउंडेशनने सहकार्य केले असून मोती नाला येथील जलसंधारणाच्या कार्याला जवाहरलाल नेहरू पोर्टच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळत आहे. अशा प्रकारचे कमी खर्चात तसेच पर्यावरणीयदृष्ट्या सक्षम असे प्रकल्प गावागावात उभारले तर कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही असा आशावाद गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी वर्ध्याचे खासदार रामदास तडस, पुर्ती सिंचन संस्थेचे माधव कोटस्थाने उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात तामसवाडा नाला खोलीकरणाने नदीचे पात्र रुंद झाले आणि पाणीसाठा पूर्वीप्रमाणे होऊन नदीचा प्रवाह पूर्ववत झाला हा पॅटर्न 'तामसवाडा पॅटर्न ' म्हणून प्रसिद्ध झाला . अशाच पॅटर्नच्या आधारे वर्धा जिल्ह्यातील मांडवा येथील मोतीनाला जलसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून मृतप्राय अशा मोती नाल्याचे पुनरुज्जीवन करण्याकरिता नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळाले . तीन टप्प्यात सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा पूर्ती सिंचन समृद्धी संस्था आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे . यामुळे सुमारे 9 किलोमीटर लांबीचा मुख्य मोती नाल्यावर जलसंवर्धनाचे कार्य करण्यात आले असून या प्रकल्पामध्ये सुमारे 280 घन मिलिलिटर जलसाठा प्रति वर्ष होत आहे . त्यामुळे सुमारे 600 एकर शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले असून शेतीपूरक व्यवसायात सुद्धा वाढ झाली आहे .या प्रकल्पाकरिता पूर्ती सिंचन समृद्धी व कल्याणकारी संस्थेचे दत्ता जामदार , माधव कोटस्थाने , सद्भावना ग्रामीण विकास संस्थेचे मिलिंद भगत तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी यांची मोलाची साथ लाभली आहे .

या मोती नाल्याची पाहणी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडवा येथील जन सभेला संबोधित केले . सोयाबीन कापूस यासारख्या पिकाऐवजी या परिसरातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी . फळशेतीसाठी 'वन ड्राप मोअर क्रॉप' या तत्वाद्वारे ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी . तामसवाडा पॅटर्ननुळे या परिसरात जलसंवर्धन झाले असून इथे एकही शेतकरी आत्महत्या होवू नये अशी अपेक्षा गडकरींनी व्यक्त केली. मोतीनाला पुर्नज्जीवन प्रकल्पाच्या उभारणीत हातभार लावणारे पाटबंधारे विभागाचे अभियंता मोहाडे यांचा सत्कारही वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी यावेळी केला. यावेळी वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच मांडवा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यापुर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी मधील धाम नदीच्या जलसंधारणाचे काम बघितले .धाम नदीच्या मध्यम प्रकल्पातून उन्नई बंधाऱ्या पर्यंत सिंचन तसेच एमआयडीसीमध्ये औद्योगिक वापराकरीता वापरल्या जाणा-या पाण्याचा प्रवाह बारमाही असतो. परंतू या प्रवाहामुळे नदीपात्रात काटेरी झुडपे तसेच इतर वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात झालेली वाढ नदी प्रवाहात अडथळा निर्माण करत . यासोबतच या नदी तीरावर पाणीपुरवठ्यासाठी विहिरी खोदल्या होत्या त्यामध्ये सुद्धा दूषित पाण्याचा पुरवठा होत होता या पाणीपुरवठ्यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुढाकाराने व वर्ध्यातील जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्या सहकार्याने धाम नदीतून गाळ काढण्याचे काम हे 27 ते 31 मे 2021 दरम्यान करण्यात आले आणि यामध्ये नदीप्रवाहाच्या 200 मीटर लांबी मधून एकूण 16 हजार 233 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे . याचा फायदा कालव्यातील पाणीसाठा वाढण्यास आणि शेती सिंचनास झाला आहे .या धामनदीच्या पुनर्जीवन्नप्रकलुआ अंतर्गत कांचनुर ते मोरांगना, मोरांगना ते खैरी , खैरी ते आंजी मोठी , आंजी मोठी ते येळीकेळी अशा 26 किमी लांबीच्या नदी जलसंधारणाचे काम राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांच्यामार्फत केले जात आहे.

Kanchanur to Morangana, Morangana to Khairi, Khairi to Anji Mothi, Anji Mothi to Yelikeliinspects water conservation work 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.