नागपूर: गुरूवार दि.10 ऑगष्ट 2023 रोजी नागपूर विभागांतर्गत सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाखेतील पदवीधर युवकांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊजी पटोले यांच्या शुभहस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून नागपूर शहर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नितीन इटनकर तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमारजी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
Job Card Distribution Program on behalf of Govindrao Vanjari Foundation
स्व.आमदार गोविंदरावजी वंजारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अँड.अभिजित गो. वंजारी यांची आहे. तसेच याप्रसंगी देशातील सर्व प्रकारच्या युपीएससी, एमपीएससी, बँकीग, रेल्वे, सहकार क्षेत्र, तत्सम प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची अचूक व महत्वपूर्ण माहिती असणान्या अभ्यासिकेचे विमोचन सुध्दा याप्रसंगी होणार आहे. गोविंदराव वंजारी फाऊंडेशन व पुण्यातील जॉब फेअर इंडियाच्या संयुक्त विद्यमाने जॉब कार्ड वितरणाचा कार्यक्रम आयोजित कैलेला आहे. यामध्ये राज्यातील व देशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकरीची संधी बेरोजगार पदवीधरांना उपलब्ध होणार असून यामध्ये सर्व प्रकारचे पदवीधर त्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, बी.ए., बी.कॉम., बी.एससी, बीबीए, बीसीसीए, बीसीएस तसेच अनेक प्रकारच्या पदवीधरांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या जॉब कार्डच्या माध्यमातून कार्ड अक्टीवेट झाल्यानंतर त्या पदवीधर युवकाला वर्षाच्या 365 दिवसापैकी किमान दोनशेपेक्षा अधिक दिवस दररोज एसएमएस द्वारे वेगवेगळ्या कंपनीतील नोकरीची माहितीची उपलब्धता होणार असून या माध्यमातून होतकरू अशा पदवीधर युवकांना योग्य ठिकाणी सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. आतापर्यंत या जॉब कार्डकरिता 10000 पेक्षा अधिक युवक-युवतींनी Abhijitwanjarri.jobfairindia.in या लिंकवर रजिस्ट्रेशन केलेले आहे. तसेच अजूनही या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीमध्ये सहभाग घेता येईल. असे आवाहन पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले आहे.