वर्धा:विशेष प्रतिनिधी:
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील कोरोनाबाधित मृत महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या सर्व 141 जणांना जिल्हा प्रशासनाने करण्यात क्वारंटाई केले आहे. तर 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मागील आठवड्यांपर्यंतपर्यंत ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होताच जिल्हा प्रशासन नियम अधिक कठोर करत कामाला लागले आहे. कोरोना पॉझिटिव्ह मृत महिलेच्या संपर्कात असणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. परिसरातील गावागावात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात असून हिवरा तांडा परिसरात ७ किलो मीटर अंतरापर्यंतची सर्व गावं सील करण्यात आली आहेत.
जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेंट झोन तयार करत गावात घरोघरी आरोग्य तपासणी करण्याची मोहीम सुरु केली. या परिसरात ३ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या कंटेन्मेंट झोन मधील हिवरा तांडा, हिवरा, जामखुटा, राजनी, हराशीं, बेल्लार, दहेगाव मुस्तफा, बोथली किन्हाळा, बेल्लारा तांडा, पाचोड आदी गावातील 8 हजार 05 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांची आरोग्य तपासणीही केली जात आहे.
बफर झोनमध्ये येणाऱ्या 7 किलो मीटर अंतरावरील वाढोना, बेडोना, चिंचोली डांगे, येथील 5 हजार 269 नागरिकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. या परिसरात फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. नागरिकांच्या आरोग्य तपासणीच्या कामात शिक्षक, आरोग्य सेवक, आशा, आरोग्य सेविका, आशा वर्कर अशी यंत्रणा कामात लागली आहे.
हिवरा तांडा येथील रुग्ण हे आर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. तेथील ३ डॉक्टरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. एवढंच नव्हे, तर आर्वी उपजिल्हा रुग्णालयासह सावंगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 28 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. तर 11 जणांना अलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मृत महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या 141 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.