महाराष्ट्रातही गोसेवा आयोग स्थापन व्हावा
ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये सुनील सूर्यवंशी यांची मागणी
नागपूर, १ ऑगस्ट
मागील सरकारने विदर्भातील गोशाळांना आर्थिक सहाय्य केले होते. परंतु नवीन सरकारने कोरोनाच्या नावाखाली ही मदत रोखली आहे. गोशाळांनी आपल्या कामाच्या सर्व नोंदी करण्यासाठी प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आपल्या कामाचे सर्वेक्षण करायला पाहिजे. सर्व गोशाळांनी संघटना उभारुन समन्वय साधावा. त्यातून उदभवणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होईल. गोशाळांच्या संवर्धनासाठी त्यांचं संघटन व प्रशासकीय व्यवस्था गरजेची आहे,असे ते म्हणाले
सरकारने सुद्धा गोशाळांच्या विकासासाठी त्यांची उत्पादने यांना आवश्यक परवाना (Licence) मिळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करावी. अन्न व औषधी विभागाऐवजी स्वतंत्र विभागाकडे हे कार्य सोपवून सहजता आणावी.
ग्रामायण प्रतिष्ठानच्या ५१ व्या ज्ञानगाथा कार्यक्रमाच्या उदबोधनात त्यांनी ही मागणी केली. श्री सुनील सूर्यवंशी हे महाराष्ट्र शासनाच्या गोसंवर्धन गोवंश सेवा समितीच्या राज्य स्तरीय समितीचे सदस्य, मानद पशु कल्याण अधिकारी व गोशाळा महासंघाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या उदबोधनाला विशेष महत्व आहे.
प्राचीन काळापासून भारतात गोरक्षण ही संकल्पना आहे. त्यामागे धार्मिक भावना असली तरी आज त्या सोबतच लोकांना गायीचं आर्थिक व मानवी जीवनातलं महत्व कळू लागले आहे. आज महाराष्ट्रात ९५० व विदर्भात २०० नोंदणीकृत गोशाळा आहेत. यांची कार्ये पण भिन्न प्रकारची आहेत. यांत कांही गोशाळा केवळ गायींचं संवर्धन करतात तर कांही गोवंश उत्पादनातून उद्योग निर्मिती करतात. यांत गाईपासून मिळणारे दूध व अन्य दुग्धजन्य पदार्थ, गोमय पासून तयार होणाऱ्या धूप, उदबत्ती, मंजन, गणेश मूर्तींची निर्मिती असे उद्योग तर गोमय, गोमूत्रा पासून निर्मित औषधी, खत आदि उद्योग आधारित आहेत. या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री सुनील सूर्यवंशी यांनी केले.
भारतात गायींच्या एकूण ३६ प्रजाती आहेत. महाराष्ट्रात ५ प्रकारच्या प्रजाती आहेत. विदर्भात मुख्यत्वे गायीची गौळाऊ जात आढळते. या गायीपासून कमीतकमी ४ ते ५ लीटर दूध मिळते. या शिवाय शेण व गोमुत्र या पासून मिळणारी उत्पादनं ही आर्थिक उत्पन्न देणारे उद्योग आहेत. दूध देणाऱ्या गायीच नव्हे तर भाकड गायी सुद्धा उपयोगी आहेत. त्यांच्या पासून शेणखत, औषधी व इतर आधारित उद्योगांना त्या सहाय्यभूत ठरु शकतात. त्यासाठी अकोला येथील गोकुलम गोरक्षण संस्था, गोंदिया येथील लक्ष्मी गोशाळा आदी गोशाळांच्या कार्याचा उल्लेख केला.
नागपूर स्थित विश्व हिंदू परिषद व्दारा संचालित गोविज्ञान अनुसंधान केंद्राने गायीचे वैज्ञानिक महत्व सिद्ध केले आहे. देवलापार येथील गोशाळा ही भारतात गोसंवर्धन संबंधित विषयात मार्गदर्शन करणारी अग्रणी संस्था आहे. या संस्थांच्या कार्याबद्दल जागृती झाल्यास गाईंच्या कत्तलींना आळा बसेल.
कार्यक्रमांच्या सुरुवातीला सौ. आरती खेडकर यांनी ग्रामायण च्या कार्याबद्ल माहिती दिली. ग्रामायण प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री अनिल सांबरे यांनी गोशाळा व गोमय उत्पादने यांचे महत्व सांगत त्यांचे स्वतंत्र प्रदर्शनी व्दारे प्रचार करण्याचे आवाहन केले. या दृष्टीने ग्रामायण सर्वतोपरी सहाय्य करेल याची ग्वाही त्यांनी दिली.