वर्धा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनालासुरुवात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी केली प्रकल्पाची पाहणी
वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे कोविड उपचारासाठी वापरल्या जाणा-या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उत्पादनाला आजपासून सुरुवात झाली असून आपण स्व:त या प्रक्रीयेची पाहणी केली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा येथे दिली. वर्धा जिल्ह्याच्या एम.आय.डी.सी. भागात जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पाहणी दौऱ्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते .यावेळी वर्धाचे खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे संचालक विरेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.
हैदराबाद स्थित हेटरो कंपनीने सदर इंजेक्शन निर्मितीसाठी असणारी परवानगी ही वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सला दिली असून यामध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे सहकार्य मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले. अशी परवानगी मिळणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे . या लाइफ सायन्स कंपनीचे संचालक विरेंद्र क्षीरसागर यांनी कमी वेळात आवश्यक असणारी सामग्री तसेच इतर यंत्रणा विकसित केली. कंपनीद्वारे दर दिवसाला 30 हजार इंजेक्शन निर्मितीची क्षमता विकसित करण्यात येणार असून सर्व चाचणी यशस्वी झाल्यानंतर आजपासून इंजेक्शन उत्पादन सुरू झाले आहे.रेमेडसवीर इंजेक्शनचे 1 लाख व्हायल्स रविवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत. या इंजेक्शनचे विदर्भात वितरण संबंधित जिल्हाधिका-यांमार्फत होईल नंतर राज्यातही त्याचा पुरवठा करण्यात येईल . वर्धा जिल्ह्याला प्रथम प्राथमिकता मिळेल असेही गडकरी यांनी नमुद केले.
या प्रकल्पामुळे विदर्भातील करोना रुग़्णांना लाभ मिळणार आहे. सेवाग्राम येथील रुग्णालयाला तसेच सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयाला प्रत्येकी 10 वेंटिलेटर देण्यात आले आहेत. वर्ध्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सेवाग्राम येथे 20 टन तर विनोबा भावे रुग्णालय येथे 20 टन ऑक्सिजन संग्रहाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे असेही गडकरी यांनी यावेळी सांगितल.