Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०६, २०२१

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मे महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा आॅफलाईन घेण्याचा हट्टवाद सुरुच

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मे महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा आॅफलाईन घेण्याचा हट्टवाद सुरुच

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा बहिष्काराचा इशारा

       कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे इ. ५ वी आणि इ. ८ वीची  २३ मे ला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाला ३ पत्रे देऊन विनंती केली होती. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट आज परीक्षा परिषदेने ५/५/२०२१ ला  पर्यवेक्षण व अन्य बाबींचे नियोजन करण्याविषयीचे पत्र  पाठवून संभ्रम वाढवला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेलाही याविषयी निवेदन दिल्यानंतर परीक्षा परिषदेने हा विषय शासनाकडे टोलवला असून शासन याबाबत निर्णय घेणार असल्याचे शिक्षक परिषदेला पत्राद्वारे सांगितले आहे. शासनाला दि. २०.४. २०२१, दि. २८.४.२०२१ आणि दि. ३.५.२०२१ अशी ३ वेळा निवेदने देऊनही शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. 

     देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकलेल्या असतानाही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही आॅनलाईन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या परीक्षा मात्र आॅफलाईन पद्धतीनेच घेण्याचा हट्ट मुद्दामहून आहे का? असे पालक व शिक्षक विचारत आहेत. केंद्र शासनाच्या सूचनांकडे, शिक्षक संघटना ,पालक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यभरात एकूण ६ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

एका परीक्षा केंद्रावर २०० ते ५०० परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात  पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात आॅफलाईन परीक्षा कोविडच्या काळात घेणे, खरंच आवश्यक आहे का? काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने कोणत्याही परीक्षा या काळात घेण्यात येऊ नये, असे निर्देश दिलेले असतानाही दि. ५.५.२०२१ रोजी परीक्षा परिषदेने परीक्षा होणार असल्याचे  नियोजन पत्र काढणे, म्हणजे हा मुद्दाम केलेला हट्टवादच आहे. असेच खेदाने म्हणावे लागत आहे. 

      दि. २ मे पासून १४ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी देण्यात आलेली असल्यामुळे अनेक पालक व शिक्षक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तर काहींनी तसे नियोजन केले आहे. एकीकडे शिक्षकांना उन्हाळी सुट्टी जाहिर करायची नि त्याच काळात अशी परीक्षा ठेवून त्यांना त्यांची रजा अर्धवट सोडून पुन्हा शाळेत बोलावणे म्हणजे शासनाचा दुट्टपीपणा आहे, असे वाटते.  तसेच केवळ या परीक्षेसाठी शिक्षकांना बोलवायचे का? असा प्रश्न मुख्याध्यापकांकडून विचारला जात आहे. कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या काळात लहान मुलांची परीक्षा घेण्यात येऊ नये, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालकांनी केलेली आहे. शिक्षक परिषदेनेही या सगळ्या मागण्या शासनापर्यंत ३ वेळा पोहचवून सुद्धा शासनाने अजून निर्णय घेतला नाही. उशिरा निर्णय घेण्याची परंपरा शिक्षण विभागाने कोविड काळातही जपली आहे. त्यामुळे पालक व शिक्षक यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. 

      परीक्षा पुढे न ढकलल्यास तसेच   मे  महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा आपला अट्टाहास असाच चालू ठेवल्यास, विद्यार्थी,  शिक्षक शिक्षकेत्तर, पालक यांच्या आरोग्यासाठी, शिक्षक परिषद या परीक्षेवर  बहिष्कार घालण्याचा इशारा देत आहे.

योगैश बन  

कार्यवाह 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर.....९८२३०४४४०३


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.