फुलांची आयात निर्यात ठप्प : मागणी घटली, व्यवसायावर अवकळा
सतीश बाळबुधे
यवतमाळ : देवी देवतांच्या पुजेला प्रथम प्राधान्य फुलांना दिल्या जाते. शिवाय, सजावटीसाठी फुलांना महत्त्व आहे. फुलांमधून सौंदर्य दळवळते. सध्या उत्सवाच्या काळात फुलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येते. यावर्षी मात्र, ‘कोरोना’ ताळेबंदी असल्याने प्रत्येक व्यवसायिक हतबल झाले आहेत. मागील वर्षी फुलांच्या मागणीत गणपती, ज्येष्ठा गौरी व मोहरमची तुलना केल्यास यावर्षी ५० टक्के फुलांची विक्री झाल्याची शोकांतीका शहरातील फुल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच ‘कोरोना’मुळे दरवळणारा सुगंध हरवल्याने व्यवसायिकांचे कंबरडे मोडले, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
यवतमाळ येथे जरबेरा, आर्किड, डच, गुलाब, निशीगंधा, मोगरा, लिली, गलांड आदी फुले नागपूर, पुणे, हैद्राबाद येथून आयात केली जातात. ‘कोरोना‘मुळे यावर्षी गणपती, महालक्ष्मीमध्ये नागरिकांनी घरगुती पुजेला प्राधान्य दिले आहेत. शिवाय, अनेक मंडळाचे ‘श्री‘ देखील घरगूती स्थापना करण्यात आले आहे. गतवर्षी या उत्सवात १०० टक्के फुलांचा व्यवसाय झाला होता. फुलांचे भाव कमी अधिक होत असले तरी देखील नागरिकांनी फुलांचे हार खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे फुलव्यवसायाला आाता मोलच राहला नाही. वाहतूक खर्च बघता फुलविक्री करणे अवघड होत असल्याच्या प्रतिक्रीया येथील व्यवसायिकांनी दिल्या आहेत. फुलांची काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परिणामी, साठवणूकीवर विक्रेत्यांचा अगाऊ खर्च होतो. एकंदरीतच कोरोनामुळे आर्थिक गाडा कधी रुळावर येइल, याची शाश्वती सध्या तरी कोणी देऊ शकणार नाही.
🌺फुलांचे दर
झेंडू २०० रुपये किलो
गुलाब गड्डी ८० रुपये
गलांडा २०० रुपये किलो
लग्नसराईलाही फटका
लग्नात वधु-वरांचे हार, गाडी सजावट, स्वागत समारंभ, डेकोरेशन आदी कामांसाठी फुलांची आवश्यकता असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे मार्चमध्येच लॉकडाऊन जाहीर झाल्याने फुल विक्रेत्यांना फटका बसला आहे. कधी कधी मजूरीही निघेनाशी झाली आहे. कसेबसे उदरनिर्वाह करणे हाच व्यवसायिकांचा चंग दिसून येत आहे.
फुलांच्या व्यवसायात गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु, इतका थंड व्यवसाय कोणत्याच ऋतूत नव्हता. आज मजूरीही निघणे अवघड झाली आहेत. ‘कोरोना’मुळे नागरिकांनी फुले घेण्याचा ओघ कमी केला आहे. या कोरोनामुळे सर्वच व्यवसायाला फटका बसला आहे. अनेकदा नुकसान सहन करावे लागते. कधी पार्सल वेळेवर येत नाही तर कधी फुले खराब होतात. त्यामुळे मागणीत देखील घट निर्माण झाली आहेत.
-पंकज कळसकर, फुल विक्रेता, यवतमाळ