वणी:-
ग्रंथ निर्मितीचे काम अतिशय कठीण काम आहे. ग्रंथ निर्मितीची सुरुवात आपल्या मनात येणाऱ्या विचारापासून होते. त्यानंतर या विचारांचं ग्रंथात रूपांतर करण्यासाठी निर्धाराची आवश्यकता असते. असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश विजयराव देशमुख यांनी केले. ते येथील नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी उदघाटन म्हणून बोलत होते.
नगर वाचनालयाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या नवीन ग्रंथांची प्रदर्शनी स्व. अण्णाजी देशमुख व स्व. भाऊराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला हे होते. या प्रसंगी प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी केले.
या प्रसंगी या वाचनालयाच्या वीस हजाराची देणगी देणाऱ्या अकोला येथील सुधीर देशमुख व सुभाष देशमुख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठी साहित्य क्षेत्रातील शिरोमणी पु. ल. देशपांडे व सुधीर उर्फ बाबूजी फडके यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष असल्यामुळे त्यांच्या साहित्याची विशेष प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आली होती. अध्यक्षीय भाषण करतांना नगरवाला यांनी नगर वाचनालयातर्फे वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करून लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संचालक मंडळाच्या परवानगीने संगणक संच देण्याचे जाहीर केले.
दि.15 व 16 सप्टेंबरला सुरू असलेल्या या प्रदर्शनीला वणीकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे,राम मेंगावार, पूजा नाईक यांनी परिश्रम घेतले.