Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर १८, २०१९

नागपुरातील वीज ग्राहकांना आता मिळणार "थर्मल रसीद"


नागपूर/प्रतिनिधी:
वीज ग्राहकांनी केलेला वीजबिलाचा भरणा अचूक, त्यांच्या खात्यावर वेळेत समायोजित व्हावा यासाठी महावितरणने आपली सर्व वीजबिल भरणा केंद्र (पोस्ट ऑफिस वगळून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. ग्राहकांना छापील रसीद ऐवजी "थर्मल प्रिंटर 'वरील संगणकीकृत क्रमांकासह पावत्या देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून नागपूर शहरातील काँग्रेसनगर, महाल, बुटीबोरी, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स या ५ विभागातील वीज ग्राहकांना बुधवारपासून या पद्धतीच्या पावत्या वितरित करण्यास सुरुवात झाली.

नागपूर शहरातील वरील ५ विभागासह राज्यातील आणखी २५ शहरी विभागांमध्ये या पद्धतीच्या पावत्या १६ सप्टेंबर पासून वितरित करण्यात येत आहेत. नागपूर शहरातील वीज ग्राहकांनी अशा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खात्री करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

कल्याण आणि भांडुप परिमंडलातील ठाणे, वाशी, कल्याण-१ व २, वसई या मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या ग्राहकांना वीजबिल भरणा केंद्रातून छापील कागदाऐवजी थर्मल पेपरवर संगणकीकृत क्रमांकासह पावत्या छापून देण्यास १ एप्रिल २०१९ पासून सुरुवात करण्यात आली होती.

आता नागपूर शहरासह नाशिक , मालेगाव, औरंगाबाद , भुसावळ, जळगाव शहर, नांदेड, अकोला शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, इचलकरंजी, कोल्हापूर शहर, सांगली शहर, भोसरी, कोथरूड, पिंपरी, पुण्यातील शिवाजीनगर, बंडगार्डन, नगर, पर्वती, पद्मावती, रास्तापेठ या २५ विभागांमध्ये वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना संगणकीकृत क्रमांक असणाऱ्या पावत्या थर्मल पेपरवर छापून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना हा संगणकीकृत क्रमांक वापरून महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अँपवर (app) वीजबिल भरल्याची खात्री करता येईल. त्यामुळे ग्राहकांनी भरणा पावतीवर संगणकीकृत क्रमांक असल्याची खातरजमा करावी व संगणकीकृत पावतीशिवाय वीजबिल भरू नये. तसेच फसवणूक टाळण्यासाठी हस्तलिखित पावत्या नाकाराव्यात व यासंदर्भात नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

महावितरणने वीजबिलासह सर्व प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, मोबाईल अँप (app), महापॉवर पे यासारखे विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेत ०.२५ टक्के सूट देण्यात येते. तरी अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.