Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०७, २०२०

प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या निरमाची कहानी

माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव
_________________________
🔹प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणणाऱ्या निरमाची कहानी🔹
________________________
मेहसाणा, गुजरात मधील एक ग्रामीण भाग. विशेषत: दूध-दुभत्यांसाठी प्रसिद्ध. याच भागातील करसनभाई शेतकरी दांपत्याच्या पोटी जन्मला.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=213620755702522&id=100011637976439
वयाच्या २१ व्या वर्षी रसायनशास्त्राचा पदवीधर झाला. राज्यसरकारच्या भूगर्भ आणि खनिज विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करु लागला. १९६९ सालच्या आसपास फॉस्फेट फ्री सिंथेटीक डिटर्जंट पावडर म्हणजेच फॉस्फेट नसलेली कपडे धुण्याची भुकटी त्याने तयार केली. ही पावडर तो त्या परिसरात घरोघरी जाऊन विकायचा. त्यावेळी जर कोणी भाकित केलं असतं की ही पावडर करसनला कोट्याधीश बनविणार आहे तर त्याला वेड्यात काढलं असतं. पण याच पावडरमुळे करसन नावारुपाला आला. ही पावडर म्हणजे काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाम पर्यंत नावारुपाला आलेली आणि सर्वांत जास्त वापरली गेलेली निरमा पावडर होय. या निरमा पावडरमुळे ४ हजार करोड रुपयांपर्यंत पोहोचलेला करसनभाई म्हणजेच करसनभाई खोडीदास पटेल. व्यावसायिक जगतात यांना के.के.पटेल या नावाने ओळखले जाते.
सुरुवातीला करसनभाई ३.५० पैसे प्रति किलो दराने ही पिवळी भुकटी दारोदारी जाऊन विकायचे. यावेळी हिंदुस्थान लिव्हरची सर्फ पावडर १५ रुपये किलो भावाने मिळायची. आपल्या १० बाय १० च्या खोलीत करसनभाई पावडर तयार करत. १५ ते २० किलो पावडरची गोण सायकलवर टाकून ते १७ किलोमीटर परिसरात पावडर विकत. निव्वळ तीन वर्षांत उत्तम दर्जामुळे त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. या पावडरला त्यांनी आपल्या मुलीच्या, निरुपमाच्या नावावरुन निरमा हे नाव दिलं. दुर्दैवाने निरुपमाचं अपघाती निधन झालं. आपल्या उत्पादनाचा बाजारात चांगलाच जम बसला आहे हा आत्मविश्वास आल्यानंतर करसनभाईने सरकारी नोकरी सोडली. पूर्णपणे त्यांनी व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. हळूहळू त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रात आपले पाय रोवले.
१९८५ पर्यंत देशाच्या विविध भागांत निरमा एक विश्वसनीय घरगुती ब्रॅण्ड म्हणून नावारुपास आला. १८ वर्षांनतर निरमाने निळ्या रंगाची निरमा सुपर डिटर्जंट पावडर बाजारात आणली. आक्रमकपणे त्यांनी याची जाहिरात देखील केली. १९९४ साली शेअरबाजारात निरमा नोंदणीकृत झाली. १९९९ पर्यंत डिटर्जंट पावडर सोबतच अंघोळीचा साबण, सौंदर्यप्रसाधने आदी क्षेत्रात निरमा नावाजली जाऊ लागली.
_________________________
माहिती  सेवा ग्रूप पेठवड़गाव
_________________________
ही उत्पादने फॉस्फेट न वापरता बनवली गेल्याने पर्यावरणपूरक म्हणून देखील ओळखू जाऊ लागली.
१९६९ साली एका व्यक्तीनिशी सुरु झालेल्या या कंपनीमध्ये आजमितीस १४ हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ४ हजार करोड रुपयांहून अधिक उलाढाल ही कंपनी करते. २००४ साली निरमाने ८ लाख टन पावडरची निर्मिती केली होती. पावडरनिर्मितीचा हा एक उच्चांक मानला जातो. आज निरमा कंपनी निव्वळ पावडरच नव्हे तर अंघोळीचा साबण, हवाबंद डब्ब्यातील अन्नपदार्थ, कारखान्यास लागणारे उत्पादने, मीठ आणि खते देखील तयार करते. २००२ मध्ये निरमा हा ब्रॅण्ड आपल्या भारतात ‘झपाट्याने बदलत जाणारी ग्राहकोपयी वस्तू’ या गटात ९ व्या स्थानी होता. २००३-०४ मध्ये देशाचा सुपरब्रॅण्ड म्हणून निरमाची निवड झाली होती.
‘कमी किंमत- उच्च दर्जा’ ही निरमाची खासियत. उत्पादक-वितरक-घाऊक व्यापारी- किरकोळ व्यापारी- ग्राहक अशा साखळीतून जर उत्पादन जात असेल तर एका रुपयांत तयार होणारी वस्तू ग्राहकांजवळ पोहोचेपर्यंत १०० रुपयांची झालेली असेल. हे करसनभाईंना ठाऊक होते. त्यांनी थेट दुकानदारांनाच माल विकण्याचा निर्णय घेतला. मात्र माल ठेऊन जा आणि विकल्यानंतर पैसे घेऊन जा अशी व्यवहाराची पद्धत असल्याने निरमा कंपनीचा माल आणि पैसा हे दोन्ही महत्वाचे घटक बाजारात मोठ्या प्रमाणावर अडकले. परिणामी निरमाचा खप घटला. करसनभाईंनी आपल्या कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि बाजारात अडकलेला माल किंवा पैसा परत आणा असे फर्मान सोडले. बाजारातून सगळा माल निरमा कंपनीने परत घेतला.
एखादा दुसरा उद्योजक असता तर त्याने हारच मानली असती. पण हार मानतील ते करसनभाई कसले. प्रसिद्धीची ताकद ओळखणाऱ्या करसनभाईंनी एक जाहिरात तयार केली. आणि रेडीओ, सिनेमागृह, दूरचित्रवाणी या माध्यमातून तब्बल एक महिना निरमाच्या जाहिरातींचा मारा केला. ही जाहिरात इतकी प्रभावी होती की निरमाच्या मागणीने दुकानदार त्रस्त झाले. या जाहिरातीने तब्बल दोन दशके रुपेरी पडदा गाजविला. सर्वांत जास्त काळ एकच जाहिरात झालेली ही जाहिरात म्हणजे *‘निरमा, निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूध सी सफेदी...’*
लोकांच्या प्रचंड मागणीने दुकानदार त्रस्त झाले. त्यांनी कंपनीकडे पावडर मागितली. परत करसनभाईने कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली. दुकानदारांना पावडर देण्यास सांगितले मात्र एका अटीवर, ‘आधी पैसे, मग माल’. निरमाच्या या जाहिरातीमुळे प्रतिस्पर्धी कंपन्याच्या तोंडाला फेस आणला होता हे मात्र खरे. बाजारपेठेला शब्द्श: करसनभाईने झुकविले होते.
करसनभाई पटेल हे समाजसेवी उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात. अनेक शैक्षणिक, संशोधन संस्था त्यांनी निर्माण केल्या आहेत. निरमा एज्युकेशन रिसर्च फाऊंडेशन( एनईआरएफ) मार्फत विविध शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. निरमा लॅब्जच्या माध्यमातून अडचणींना सामोरे जाणाऱ्या होतकरु तरुण उद्योजकांना उद्योजकीय मार्गदर्शन केले जाते. निरमा मेमोरिअल ट्रस्ट, निरमा फाऊंडेशन, चनासमा रुप्पुर ग्रामविकास ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जाते. करसनभाईंनी निरमा विद्यापीठाची स्थापना देखील केलेली आहे.  करसनभाईंच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी सन २०१० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.
लहानपणी रामायण, महाभारत पाहताना निरमा, निरमा म्हणत पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली एक छोटी मुलगी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेई. प्रत्येक घरातल्या मुलीचं जणू काही ती प्रतिनिधीत्वच करायची. या मुलीला नावारुपाला आणणारा तिचा जनक मात्र नेहमीच पडद्यामागे राहिला. करसनभाईंची हा शून्यातून कोटीपर्यंतचा प्रवास प्रत्येक तरुणास स्फूर्तीदायी आहे.♍


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.