Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १२, २०२०

खरा महात्मा



महात्मा ज्योतिबा फुले हे समान मानवी हक्काचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांची कृती व लढे हे त्याचे साक्षी आहेत. उच्चधर्मियांची मक्तेदारी संपुष्ठात यावी. दारिद्र्य नष्ट व्हावे. जातिभेद संपावे. अनिष्ट रूढी, परंपरांना मुठ माती द्यावी. शेतकऱ्यांची लुट थांबावी. त्यांना न्याय मिळावा. महिलांना समानतेची वागणूक असावी. या विचाराचे विश़्वकुटुंब निर्माण व्हावे.यासाठी ते लढले. संघर्ष केला. त्यासाठी उभे आयुष्य जगले. या लढ्यात अनेक संकटे आली. तरी ते डगमगले नाही. त्यांचा लढा माणूसकीसाठी होता.
ते शिकत असताना त्यांना उच्चवर्णियांचा त्रास झाला. चार वर्ष शिकले. त्यानंतर शिक्षणात खंड पडला. तेव्हाच त्यांना उच्चवर्णियांकडून होणाऱ्या त्रासाची जाणीव झाली. खंडानंतर पुढील शिक्षण मिशनऱ्यांचा शाळेतून घ्यावे लागले.

महात्मा फुले यांनी समाज परिवर्तनासाठी पुस्तकें लिहिली. ते पहिले मराठी नाटककार होते. तृतीय रत्न या नाटकात शिक्षणाला तिसरा डोळा म्हणाले. बहुसंख्ये समाज अडाणी होता. तो शिकावा. तो शिकल्याशिवाय प्रगती होणार नाही. या मताचे होते. समाजातिल अनिष्ठ रूढी, परंपरा संपविण्याचा प्रयत्न केला. मुलींनी शिकावे . विधवांची विवाह व्हावीत. यासाठी धडपड होती. मुलींना शिकविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्यासाठी पहिली मुलींची शाळा उघडली. त्याची सुरूवात घरातून केली. सावित्रीबाई यांना अगोदर शिकविले. त्या शिक्षिका बनून घराबाहेर पडल्या. लोक शेणमाती अंगावर फेकत. त्यामुळे घरून जास्तीचा लुगडा नेत.शाळेत तो बदलत अन् नंतर मुलींना शिकवित. महिलांवर फुले दाम्पत्याचे फार उपकार आहेत. विटंबना बघा जो समाज मुलींच्या शिक्षणाला विरोध करीत होता. त्यांच्या मुली अगोदर शिकल्या. केवळ शिकल्याच नाही.तर प्रत्येक महत्वाच्या हुद्यावर पोहचल्या. ते शेतकरी ,शुद्र, अतिशुद्रांनी शिकावे म्हणून झटले. प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे असावे. असा आग्रह धरणारे ते पहिले भारतिय होते. त्यांनी हंटर आयोगाला दिलेले निवेदन हे शिक्षणाचे महत्व सांगणारे बोलके दस्तावेज आहे.

शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्य धर्म या पुस्तकांमधून त्यांनी सामाजिक,आर्थिक व धार्मिक मते मते मांडली. सोवळ्या-ओवळ्याच्या विचारांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. मूर्तीपुजेची थट्टा केली. तीर्थयात्रा, श्राध्द विधीला विरोध केला.त्याला लंबाडीचा धंदा संबोधले. त्यांना दैवी चमत्कार मान्य नव्हता. निसर्ग नियमाने सृष्टी चालते. अशी त्यांची धारणा होती. शुद्रअतिशुद्रांनी हिंदु धर्मग्रंथ वाचू नये.या कोत्या मानसिकतेवर ते प्रहार करीत. तेव्हा ख्रिश्चन व मुस्लीम धर्माचा हवाला देत. पुरोहितांमार्फत लग्न लावण्यास विरोध होता. त्यासाठी त्यांनी मराठीत मंगलाष्टके लिहिली. अवतार कल्पना नाकारली. कर्मकांडांवर हल्ला केला.
सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहले. ते पुस्तक मानवी हक्काच्या दृष्टीने क्रांतीकारी आहे. त्यात मानवी स्वातंत्र्याचा उदघोष आहे.

त्यांनी अस्पृश्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडली. ती सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सत्यशोधक चळवळीचा पाया घातला. ती चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज आहे. त्यातच बहुजनांचे कल्याण आहे. महात्मा फुले यांच्यानंतर सत्यशोधक चळवळ प्रभावी झाली असती, तर आर्थिक व जातीय विषमतेचा नायनाट झाला असता. शेतकऱ्यांना असे वाईट दिवस बघावे लागले नसते.किमान आता तरी ती चळवळ प्रभावी व्हावी. ते थोर होते. त्यांच्या विचारांत समाज बदलण्याची ताकत आहे. महात्मा फुले महान होते. त्यामुळेच त्यांना मुंबईतील कोळीवाड्याने सर्वप्रथम महात्मा ही पदवी दिली होती .डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरू मानले. यातच त्यांचे मोठेपण लक्षात येते.


भूपेंन्द्र गणवीर
ज्येष्ठ पत्रकार 
११ एप्रिल, 2020

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.