Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०६, २०२०

समाज विकासाचे बातमीदार भरत अवचट

जुन्नर /आनंद कांबळे




राज्यशासनाच्या वतीने सन २०१७ चा पहिला शिवनेरी भूषण प्रतिभावंत पत्रकार पुरस्कार प्राप्त, सन २०११ मध्ये पिंपळवंडी येथे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात शिवांजली भूमीपुत्र पुरस्काराने सन्मानित, सन १९९२ मध्ये पुणे येथे बृहन महाराष्ट्र कॉलेज आँफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघटनेने पत्रकार वरुणराजे भिडे स्मृती पुरस्काराने सन्मानित, सन २००३ मध्ये ओतूर ग्रामस्थ व मित्र परिवाराने नागरी सत्कार करुन मानपत्र, पुणेरी पगडी व ५१ हजार रुपयांची थैली देऊन सन्मानित केलेले सकाळचे जेष्ठ पत्रकार आदरणीय भरत त्र्यंबक अवचट यांचा ५ मार्च २०२० रोजी ६५ वा वाढदिवस संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयी.......
आदरणीय भरत त्र्यंबक अवचट यांचा जन्म ५ मार्च १९५५ रोजी ओतूर येथे झाला. ओतूर येथील प्राथमिक शाळेत त्यांनी इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या ग्रामीण विभागाच्या गुणवत्ता यादीत ते आले होते. त्यानंतर पुणे भावे स्कूलमध्ये एस. एस. सी.पर्यंत, त्यानंतर बृहन महाराष्ट्र कॉलेज आँफ कॉमर्स मध्ये १९७४, १९७५ साली त्यांनी बी. कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आय. एल. एस. लॉ कॉलेज मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. मँट्रीक नंतर त्यांनी दोन प्रकारचे व्यवसाय सुरु करुन त्याची व्यापी वाढवत नेली. त्यांना यशस्वी व्यापारी अथवा उद्योजक बनायचे होते. लॉच्या दुसऱ्या वर्षाला असताना जुलै १९७७ साली त्यांच्यावर खुप मोठा आघात झाला. मेंनेजायटीसचा ॲटेक त्यांना आला. त्यातून पॕरेलिसेस होऊन त्यांचे डावे अंग लुळे पडले. स्ममरणशक्ती क्षीण झाली. त्यानंतर सर्व कुटुंबीय, विशेषतः आई, वडील, मोठा भाऊ अनिल, मोठी वहिनी डॉ. अनिता यांनी घेतलेल्या अपार कष्टामुळे त्यांना माणूस म्हणून परत उभे राहता आले. कुबडीवर थोडेसे चालायला लागल्यावर ते ओतूरला आले. तेथे त्यांनी राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरु केली. स्पोर्ट क्लब वाचनालय सुरु केले. सन १९८० ला ते परत पुण्यात आले. प्रथम ग. वा. बेहेरे व नंतर वर्षभर एस. एम. जोशी यांच्याकडे त्यांच्या आत्मचरित्राचे शब्दांकन करण्याचे काम त्यांनी केले.
'पॕरेलिसेस हाच त्यांच्या जीवनाचा टर्निंग पाँईट ठरला,' अपंगत्वावर मात करण्यासाठी ते धडधाकट पेक्षाही जास्त कार्यरत राहण्याचा प्रयत्न करु लागले. महात्मा फुले समता प्रतिष्ठान, राष्ट्रसेवादल व इतर सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य करु लागले. शारीरिक न्युनगंड नाहीसा व्हावा म्हणून माध्यम पथनाट्य गटात सहभागी झाले. जलतरण तलावावर जाऊन पोहणे सुरु करत त्यांनी दोन चाकी सायकल चालवायला सुरुवात केली. याच काळात ते लेखन व वाचन करु लागले. दै. श्रमिक विचार, दैनिक प्रभात मध्ये नोकरी करत असताना साप्ताहिक मनोहर माणूस, मागोवा, साधना व दैनिक सकाळ, प्रभात, केसरी, श्रमिक विचार यामधून फीलॉन्स पध्दतीने सातत्याने लेखन केले. १९८० साली चारही प्रकारच्याअपंगाच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी जागृत अपंग संघटनेची स्थापना केली. १९८१ हे जागतिक अपंग वर्ष होते. या कालावधीत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुणे शहरात सर्वात जास्त उपक्रम राबविले. मुंबई, लातूर, औरंगाबाद येथील शिबिरात अपंगाच्या समस्यांच्या सत्राचे सुत्रसंचालन त्यांनी केले.
सन १९८२ मध्ये त्यांचा अपघात होऊन ते अधिकचं पंगू झाले. त्यानंतर पुन्हा ते ओतूरला आई, वडिलांकडे येऊन राहू लागले. येथे आल्यावर छात्रभारती विद्यार्थी संघटना व अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम त्यांनी सुरु केले. अभ्यासमंडळाद्वारे युवकांचा गट तयार करुन मोर्चे, निषेधपत्रके, कालबाह्य प्रथांना आव्हान असे उपक्रम यशस्वी केले. सन १९८४ च्या दरम्यान कुक्कुटपालन व्यवसाय त्यांनी सुरु केला. ग्रामीण युवक कुक्कटपालन खरेदी विक्री सहकारी पतसंस्थेची स्थापना त्यांनी केली. पुणे येथे वास्तव्यास असताना त्यांनी लेखनाबरोबर सामाजिक घटकातील घटनांचे वार्तांकन करुन विविध वृत्तपत्रांना वार्ता नेऊन देण्याचे काम ते करत होते.
सन १९९७ च्या सुमारास ओतूर येथे दैनिक सकाळचा बातमीदार म्हणून निवड होताना त्यांना पुण्यातील अनुभव कामी आला. तत्कालीन वृत्तसंपादक सुरेशचंद्र पाध्ये यांच्या मार्गदर्शनाचा व एस. के. कुलकर्णी यांच्या 'पाऊले पत्रकारितेची' या पुस्तकाचा त्यांना खुप उपयोग झाला. सामाजिक चळवळीत वावरण्यामुळे परिसरातील समस्या शोध घेण्याची दृष्टी त्यांना प्राप्त झाली. ओतूर पासून २५ कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पश्चिमघाट पर्वत रांगेत डोंगर शिखरावर वसलेल्या गावात ७ हजार आदिवासी लोकवस्ती आहे. त्यांच्या वडिलांनी १९३६ साली एल. सी. पी. एस. होऊन ओतूर येथे दवाखाना सुरु केला होता. त्याकाळात जवळपास निम्या तालुक्यात औषधोपचार मिळण्याचे हे एकमेव ठिकाण होते. कोपरे परिसरातील रुग्णांना डोली करुन धावत ओतूरला आणले जाई. याला ५ ते ६ तास वेळ लागत असे. एकदा त्यांच्या घरासमोर डोली ठेवण्यात आली. त्यांचे वडील धावत बाहेर आले. डोलीतून त्या रुग्णाला बाहेर काढताना तो रुग्ण मृत अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. मग रडारड, आक्रोश त्यांच्या मनावर परिणाम करुन गेला. ही घटना त्यांच्या मनावर खोलवर रुतून बसली होती. बातमीदारी मिळाल्यानंतर अनेक वेळा त्यांनी त्या परिसराला भेटी दिल्या. तेथे रस्ता नावापुरताच होता. अनेक फोटोसेशन केले. डोलीचे फोटो काढले. पंधराशे फुट खोल दरीत असलेल्या मांडवी नदीतून आदिवासी स्त्रिया कसे पाणी आणातात याचे फोटो काढण्यासाठी ते स्वतः दरीत उतरायचे.
सकाळने त्यांच्या या वृतचित्रणाला भरभरुन प्रसिद्धी दिली. त्यामुळे राजकारणी लोकांना या परिसराकडे लक्ष द्यावे लागले. तेथे सुधारणा सुरु झाल्या. रस्ता, वीज, बंधारे, एस. टी. सुरु झाली. त्याचप्रमाणे तालुक्यात डोंगर शिखरावर वसलेल्या सुमारे वीस गावातील समस्यांचे वार्तांकन त्यांनी केले. याचसुमारास वीस वर्षे रेंगाळलेले पिंपळगाव जोगा धरणाच्या कामाला मंजुरी मिळुन काम सुरु झाले होते. त्यावेळी त्यांनी धरण प्रकल्पाचा अभ्यास करुन पूर्णतः व अंशतः बाधीत होणाऱ्या गावांचा संपर्क वाढविला. पुण्यात डॉ. बाबा आढाव यांच्या धरणग्रस्त शेतकरी परिषदेच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. तेथील बातमीदारी करताना पुनर्वसनाबाबत देखील जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धरणाचे बांधकाम, पुनर्वसन याबाबत त्यांनी पुढील १४ ते १५ वर्षात दीडशेपेक्षा जास्त वार्तांचा फॉलोअप दिला. जुन १९९७ मध्ये पाणी अडणार ही त्यांनी दिलेली वार्ता क्रांतिकारक ठरली. सर्व धरणग्रस्त एकत्र आले. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या सर्व घटनांमध्ये बातमीदार व कार्यकर्ता म्हणून त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहीला, खास बाब म्हणून मढचे पुनर्वसन व्हावे यामागणीसाठी पाठपुरावा त्यांनी केला. तत्कालीन युतीच्या राज्यशासनाने धरणग्रस्तांना बऱ्यापैकी न्याय दिला. याबाबत दैनिक सकाळने दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले. धरणग्रस्तांचे काम सुरु असताना या पाणीसाठ्यामुळे कृष्णानदीच्या पाण्याबाबत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये झालेल्या पाणीवाटप कराराचा भंग होण्याची शक्यता गृहीत धरुन १८ कोटी रुपये खर्चाच्या खुबी बंड प्रास्तविक करण्यात आला. साडेचार किलोमीटर लांबीच्या या महाकाय संरक्षक भिंतीकडे सर्वजण संशयाने पाहू लागले होते. त्यावेळी ते हेलिकॉप्टर मधून घेतलेल्या छायचित्राच्या आधारे बनविलेली टोपोशीट ची नक्कल मिळवुन सविस्तर व सखोल तांत्रिक माहिती देणारा लेख त्यांनी लिहिला. या लेखाची सर्व थरांतून खुप प्रशंसा झाली.
ओतूरला बातमीदार म्हणून नेमताना त्यांना जुन्नरची देखील बातमीदारी करण्याची अट घालण्यात आली होती. त्याप्रमाणे आठवड्यातून दोनदा ते दिवसभर जुन्नर याठिकाणी जात असे. पश्चिम जुन्नरच्या आदिवासी भागात अविकसित ३० ते ४० गावे आहेत. तेथे प्रश्नचं प्रश्न होते. जुन्नर शहर व आदिवासी परिसर असे दोन भाग मनात योजुन ते वार्ता संकलन करीत असे. आदिवासी परिसरातील सर्व कार्यकर्ते जुन्नरमध्ये भेटत असतं. जुन्नच्या इतिहासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. काही महिन्यांच्या भटकंतीनंतर 'जुन्नरची रेशमी परंपरा' हा लेख पुरातन हस्त कागद उद्योगावर व सुमारे ४०० वर्षे अस्तित्वात असलेली व 'मालिकांबर नहर' हे जुन्नरच्या समृद्ध इतिहासाला उजाळा देणारे सचित्र लेख त्यांनी लिहिले. दहा वर्षे ते जुन्नर तालुक्यात दै. सकाळचे एकमेव पत्रकार होते. शारीरिक मर्यादा असूनही त्यांनी ही उणीव कधीही भासू दिली नाही. अवर्षण प्रवण ग्रस्त असलेली पुर्व जुन्नरमधील गावे, जुन्नरच्या हद्दीतील परंतू राजकीय दृष्ट्या आंबेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होणारी गावे, जुन्रर व अकोले तालुक्याच्या सीमेवरील गावे, डोंगर शिखरावर वसलेली संपुर्ण तालुक्यातील गावांच्या दैनंदिन समस्या विशेषतः उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाई यांचे फोटो काढून त्यांनी वार्तांकन केले. सातवाहनकालीन नाणेघाट, हरिश्चंद्र गड, तालुक्यातील लेण्या, श्री कपर्दिकेश्वर यांचा इतिहास जाणून त्यांनी लेख लिहिले. कृष्णा पाणीवाटप करारान्वये पाणी अडविण्याची मुदत सन २००० मध्ये संपत असल्याने मांडवी नदीवरील चिल्हेवाडी धरणाचे अत्यंत घाईने नियोजन करण्यात आले. १८ आदिवासी कुटुंबांची घरे शेतजमिनी बुडीत क्षेत्रात जाणार होत्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी बातमीदारी बरोबरचं कार्यकर्त्याची भूमिका निभावली. गुरुवारी आठवडे बाजारच्या दिवशी सर्वजण त्यांच्या घरी एकत्र येत असतं. तेथेच ते त्यांना मार्गदर्शन करत असतं. आंदोलनाच्या बातम्या देखील ते देत असतं. या धरणग्रस्तांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यात त्यांच्या माध्यमातून दैनिक सकाळचे मोलाचे योगदान आहे. तालुक्यात हरिश्चंद्रगड परिसरातील जंगल व आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकरचे जंगल आहे. वन्य प्राण्यांच्या दृष्टीने या दोन्ही जंगलांना जोडणारा कॉरीडॉर, पिंपळगावजोगा धरणाचा जलाशय, रस्ते, नागरीवस्त्या यामुळे विस्कळीत झाल्याने जंगलात वावरणारे बिबटे मानवी वस्तीत आले आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात चिल्हेवाडी येथे सर्वप्रथम बिबट्याच्या हल्ल्यात मानवाचा बळी गेला. त्यानंतर ४ ते ५ अशाच प्रकारच्या घटना घडल्या. याचे अभ्यासपुर्वक विश्लेषण करणाऱ्या बातम्या त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांचा मित्र, बिनविषारी असलेल्या मांडुळाची तस्करी होत अल्याची कुणकुण कानी पडताच सुमारे दहा-बारा गावांना भेटी देऊन माहिती मिळवून सकाळ विशेष यामध्ये प्रसिध्द झालेल्या वार्तेमुळे या प्रकरणाला आळा बसला. मांडवी नदीपलीकडील दोन-तीन वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना नदी ओलांडून पाचघर येथे शाळेत यावे लागते.
पावसाळ्यात ही मुले शेतीमाल आणण्यासाठी टांगलेल्या असुरक्षित पाळण्यातून प्रवास करत शाळेत येतात. याची सचित्र वार्ता मुख्य अंकात पहिल्या पानावर प्रसिध्द झाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही याची दखल घेतली. येथे पुल प्रास्तावित झाला असून हे काम मंजूरीच्या अंतिम टप्यात असल्याचे त्यांनी सांगितले. बातमीदारी बरोबर अनेक विधायक उपक्रम त्यांनी राबविले. २५ पेक्षा जास्त रास्ता रोको, २५ वर्षे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन, स्त्रियांसाठी तनिष्का व्यासपीठाची निर्मिती, अनाथ, आदिवासी मुलांसाठी आनंदयात्रेचे सलग ३० वर्षे आयोजन आणि याप्रकारचे अनेक विधेयक उपक्रम त्यांनी राबविले. दुर्लक्षित परिसराच्या व समाजाच्या विकासाकरिता बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले योगदान आत्मिक समाधान मिळवून देणारे ठरले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.