जुन्नर /आनंद कांबळे
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती सोहळा बुधवार दिनांक 19 रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारंपारिक पद्धतीने संपन्न होणार असून शिवजयंती निमित्ताने जुन्नर मध्ये दिनांक 14 ते दिनांक 19 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावर्षीचा शिवनेर भूषण छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
शासन मान्यता प्राप्त शिवनेरी भूषण पुरस्कार सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मारुती ताजणे यांना तर छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आशुतोष कारभारी डुंबरे यांना राज्याचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रधान करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर मध्ये शिवजयंती सोहळ्याच्या आढावा बैठकीत आमदार बेनके यांनी जाहीर केले.
यावेळी जुन्नर बाजार समिती सभापती संजय काळे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, उपसभापती रमेश खुडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, मुख्य अधिकारी जयश्री काटकर आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य, नगरसेवक , राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवजयंती सोहळ्यास राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी, जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्राजक्ता तनपुरे, खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे आदींसह जिल्ह्यातील मान्यवर, महा विकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
शिवजयंती उत्सव निमित्ताने जुन्नर मध्ये वकृत्व स्पर्धा , मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा, पोवाडा गायन, महिलांकरिता हळदीकुंकू, राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धा, गड चढन स्पर्धा , कबड्डी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती आखाडा, नंदेश उमप व डॉ . अमोल कोल्हे यांचा ' शिवसोहळा ' कार्यक्रम,' लखलख चंदेरी' हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शिवजयंती दिनी सकाळी शिवाई मातेस विभाग आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा , शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ पालखी सोहळा, व जन्मस्थानी शिवजन्म सोहळा कार्यक्रम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, परिसरातील विकास कामांची पाहणी, जुन्नर मधील बाजार समिती प्रांगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेले आहे.
शिवजयंती निमित्ताने आयोजित या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.