मायणी, ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे): येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १२व्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक नीलम माणगावे (जयसिंगपूर) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी व संमेलनाचे समन्वयक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या युवा ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे १२वे वर्ष आहे. यापूर्वी डॉ.आ. ह. साळुंखे, डॉ. द.ता. भोसले, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. बाबुराव गुरव, कवी प्रमोद कोपर्डे, कवी एकनाथ पाटील, कवी गोविंद पाटील, कादंबरीकार नामदेव माळी आदी मान्यवरांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
चालू वर्षीचे 12 वे युवा ग्रामीण साहित्य संमेलन शनिवार दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी स्वर्गीय ज.गो.जाधव संस्कृतिक भवन येथे संपन्न होणार असून संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांची निवड करण्यात आली आहे. मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, उपाध्यक्ष बाळकृष्ण विभूते व इतर संचालक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
'साहित्यचर्चा' या दुसऱ्या सत्रात 'लोकसाहित्य: एक सांस्कृतिक ठेवा' या विषयावर डॉ. विजया पवार (कराड) या मांडणी करणार आहेत. तर 'कथाकथन' सत्रात कुंडल येथील कथाकार सर्जेराव खरात यांचे सुश्राव्य कथाकथन होणार आहे. कवयित्री लता ऐवळे(सांगली) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून कविसंमेलनाचे सूत्रसंचालन कुंदा लोखंडे करणार आहेत. कविसंमेलनामध्ये किरण अहिवळे (फलटण), अंकुश चव्हाण (मायणी), शिवप्रसाद पवार (चितळी) विठ्ठल भागवत (विटा), शाहीर नारायण कदम (धोंडेवाडी), महेश मोरे (निमसोड), आनंद बागल (कातरखटाव), रंजना सानप (मायणी) श्रीमयी दिवटे (मायणी), अंजली गरवारे (मायणी), अनुराधा गुरव (वडूज), शिल्पा खरात (माहुली), प्रदीप शिवाजी भिसे (अंबवडे), सचिन गोसावी (फलटण), आकाश आढाव (फलटण), प्रदीप कुमार भांदिर्गे (मोराळे), भाग्यश्री फडतरे(खातवळ) आदी निमंत्रित कवी सहभागी होत आहेत. हे संमेलन आदर्श कॉलेज विटा अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाखाली होत आहे. संमेलनासाठी श्रीमती मालती रघुनाथ पिटके यांनी विशेष सहकार्य केले असून डॉ. शौकतअली सय्यद, प्रा. शिवशंकर माळी हे संमेलनाचे नियोजन करीत आहेत. संमेलन स्थळी ग्रंथप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तरी नवोदित लेखक कवी व रसिक श्रोते-वाचक यांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.