Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून ०६, २०१८

कोराडी औष्णिक वीज केंद्रात पर्यावरण दिन साजरा

कोराडी/प्रतिनिधी:
पर्यावरण हि निरंतर व लोकचळवळ बनावी, प्रत्येक गोष्ट शासनावर न ढकलता, प्रत्येकाच्या योगदानाची गरज आज निर्माण झाली आहे कारण भौतिक व आर्थिक विकासाच्या नादात मानवाकडून सातत्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व हे थांबविणे आपल्या हातात आहे असे मत महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे यांनी मांडले. कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातर्फे आयोजित जागतिक पर्यावरण दिनाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. 
महाराष्ट्रातील जनता सजग आहे, पर्यावरण संरक्षण प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वापरलेल्या कपड्यांच्या पिशव्या केल्या तर प्लास्टिकला एक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पूर्वी गावात स्वागताला झाडे, हिरवाई असायची आता गावाच्या वेशीवर प्लास्टिक स्वागत करताना दिसते, आता कचऱ्यातून संपत्ती निर्माण करावी लागेल असे परखड मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी मांडले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता अभय हरणे तर प्रमुख अतिथी म्हणून महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे, पर्यावरण तज्ज्ञ श्रीकांत कानेटकर, मुख्य अभियंते राजकुमार तासकर, सुनील आसमवार, निरीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.पद्मा राव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी उप मुख्य अभियंता गिरीश कुमारवार यांनी तपशीलवार अहवाल वाचन केले. याप्रसंगी राजकुमार तासकर, सुनील आसमवार यांची समयोचित भाषणे झाली तर पद्मा राव यांनी हवेचे प्रदूषण व नियंत्रण यावर उत्तम सादरीकरण केले. सर्वसाधारणपणे प्रत्येक माणूस २१६०० वेळा श्वास घेतो. त्यातून त्याच्या फुफ्फुसांमध्ये जवळजवळ १६ ते१७ हजार लिटर हवा वापरली जाते. हवेत २० टक्के प्राणवायू असतो. म्हणजे प्रत्येक माणसाला रोज ३२०० ते ३४०० लिटर प्राणवायू लागतो. जर या प्राणवायूचे वजन केले तर आपण दररोज २.६ ते २.८ किलो प्राणवायू घेतो. आज बाजारात याची व्यापारी किंमत २० ते २१ हजार रुपये आहे. म्हणजे आपल्या दर श्वासाची किंमत एक रुपया आहे! निसर्गाने आपल्याकडून ही किंमत वसूल करायचे ठरविले, तर आपल्या सगळ्यांनाच अवघड होईल असे श्रीकांत कानेटकर म्हणाले. अध्यक्षीय भाषणातून अभय हरणे म्हणाले कि, वीज उत्पादनाच्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले आहे, सोबत पर्यावरणीय मानके अतिशय कडक झाली आहेत या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्राने पर्यावरण रक्षण करण्याची सामाजिक जबाबदारी समजून नैसर्गिक स्त्रोतांचा हरित उर्जेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. हि सुंदर सृष्टी निर्माण करण्यात जर आपले योगदान नाही तर हि सृष्टी खराब करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नसल्याचे हरणे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता ढेपे (बहाळे) यांनी तर आभार प्रदर्शन राहुल सोहनी यांनी केले. याप्रसंगी चित्रकला,निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. 
याप्रसंगी उप मुख्य अभियंते अरुण वाघमारे, किशोर उपगनलावार, गिरीश कुमारवार, अधीक्षक अभियंते राहुल सोहनी, विराज चौधरी, श्याम राठोड, तुकाराम हेडाऊ, भगवंत भगत, जे.बी.पवार, शैलेन्द्र गजरलवार, उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हेमा देशपांडे, संकेत शिंदे, मुकेश मेश्राम, धनंजय मजलीकर, दिलीप जाधव, मिलिंद धर्माधिकारी, कोराडी वीज केंद्राचे अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.