Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८

कोराडी तलाव साफसफाई, खोलीकरणाच्या कामाला प्रारंभ

ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते राठोड-१ जहाज कोराडी 
जलाशयात सोडण्यात आले 
कोराडी/प्रतिनिधी:
कोराडी तलावाचे पुनर्जीवन, खोलीकरण/सौन्दर्यीकरण, आई जगदंबा मंदिर परिसर विकास, जलक्रीडा, पर्यटन क्षेत्र विकास असा ऊर्जामंत्र्यांचा स्वप्नपूर्ती प्रकल्प आहे. या कामामधील अत्यंत महत्वाकांक्षी अश्या तलाव साफ सफाई, गाळ काढणे व खोलीकरण कामाचा शुभारंभ आज उर्जामंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते करण्यात आला. 
याप्रसंगी सुनिता चिंचूरकर सरपंच कोराडी, उमेश निमोने उप सरपंच कोराडी, सीमा जयस्वाल नगराध्यक्षा नगर पंचायत महादुला, राजेश रंगारी नगर पंचायत उपाध्यक्ष महादुला, अर्चना दिवाणे माजी उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य कोराडी हेमराज चौधरी, नरेंद्र धनोले, बंडू मोहनकर, निर्मला मोरे तर महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, मुख्य अभियंते अनंत देवतारे, राजकुमार तासकर, उप मुख्य अभियंते राजेश कराडे, प्रदीप फुलझेले, अधीक्षक अभियंता शैलेन्द्र गजरलवार, कार्यकारी अभियंता शिरीष वाठ, ऊर्जामंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार शेखर अमीन, अभी इंजिनियरिंग तर्फे संजय व शलभ विजयवर्गी प्रामुख्याने उपस्थित होते. 
२० मीटर लांबी,७ मीटर रुंदी व सुमारे ९० टन वजनाच्या या महाकाय तरंगत्या फलाटाची लोखंडी पत्रे जोडून कोराडी येथील भारतीय विद्याभवन्स शाळेजवळ तज्ज्ञांच्या देखरेखीखाली निर्मिती करण्यात आली आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड बांद्रा, मुंबई येथील पोर्ट अधिकाऱ्यांच्या रीतसर परवानगीनुसार माननीय उर्जामंत्री यांचे शुभहस्ते राठोड-१ जहाज अत्यंत सुरक्षितरीत्या कोराडी जलाशयात आज सोडण्यात आले. 
कोराडी तलावाची जागा १९४ हेक्टर परिसरात व्यापलेली आहे. महानिर्मितीतर्फे कोराडी तलाव पुनर्जीवन, साफसफाई, गाळ काढणे, खोलीकरण व सौन्दर्यीकरणाचे काम मेसर्स अभी इंजिनियरिंग कोर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात आले असून सदर कामाची किमत ५५.०६ कोटी इतकी आहे. हे काम १८ महिन्यात पूर्ण करायचे आहे. प्रथम टप्प्यात कोराडी तलावातील शेवाळ, टायफा, गवत तसेच विविध प्रकारच्या अनावश्यक वनस्पती काढण्यात येणार आहेत याकरिता राठोड-१ तरंगत्या फलाटावर पोकलेन ठेवून ह्या अनावश्यक वनस्पती काढण्यात येणार आहे. रोज सुमारे १६ तास काम करून एक हेक्टर परिसरातील वनस्पती काढण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १२ मीटर बाय ३.५ मीटर आकाराच्या हॉलंड बनावटीच्या ब्रूट या कटर सक्शन ड्रेजरच्या सहायाने पाण्याखालील सुमारे ३ ते ५ मीटर खोलीतील गाळ २०० एम.एम. पाईपद्वारे बाहेर काढण्यात येणार आहे.अनावश्यक वनस्पती काढल्याने पाणी स्वच्छ राहील, मासे तसेच जलचर प्राण्यांना पर्यावरणपूरक संरक्षण मिळेल. तलाव परिसर नयनरम्य दिसेल, गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढेल. औष्णिक विद्युत केंद्राच्या वीज उत्पादनासाठी पाण्याची उपलब्धता राहील, गाळमिश्रित मातीचा कृषीक्षेत्राला लाभ होईल किंवा खोलगट भागात या मातीचा भरणा करून जमिनीचा समतोल राखणे सुकर होईल. प्रारंभी, महेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविकातून राठोड-१ बाबत संक्षिप्त माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरूर हक यांनी केले. हा नाविन्यपूर्ण सोहळा बघण्यासाठी कोराडी महादुला परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, परिसरातील नागरिक, महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.