वीज क्षेत्रातील वाढती स्पर्धा व भविष्यातील आव्हानांना पेलण्याकरिता महानिर्मितीच्या मनुष्यबळाने अद्ययावत ज्ञानासोबत स्मार्टवर्क करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी केले. प्रकाशगड मुख्यालय, वांद्रे,मुंबई येथे महानिर्मितीच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “अनुभूती” या मराठी-हिंदी गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. वीज उत्पादनाशी निगडीत असलेले अधिकारी-कर्मचारी तणावमुक्त राहावेत,त्यांच्यामध्ये नवा जोश निर्माण व्हावा यादृष्टीने “अनुभूती” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोळसा, पाणी व तंत्रज्ञान यांच्या सुयोग्य नियोजनातून महानिर्मितीच्या मनुष्यबळाने सातत्याने ६५०० मेगावाट वीज उत्पादन केल्याने यावर्षी कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील राज्यातील जनतेला भारनियमनमुक्तीचा दिलासा देण्यास मोठा हातभार लावल्याबद्दल चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
विनोद बोंदरे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या “अनुभूती” या सांगीतिक कार्यक्रमासाठी मध्य भारतातील सुप्रसिद्ध गायक सागर मधुमटके, योगेंद्र रानडे, इशा रानडे, सारंग जोशी, वादक मंडळींमध्ये नंदू गोहणे(ऑकटोपॅड), राजा राठोड(कि बोर्ड), परिमल जोशी(कि बोर्ड),रॉबिन विलियम(गिटार),प्रशांत नागमोते(तबला) तर श्वेता शेलगावकर यांच्या अर्थपूर्ण बहारदार सूत्रसंचालनाने रसिकांना दर्जेदार “अनुभूती” मिळाली. सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार, मोहम्मद रफी, मन्ना डे,कुमार शानू, अरुण दाते, लता मंगेशकर,आशा मंगेशकर यांची अजरामर गाणी त्यांच्या हुबेहूब आवाजात सादर केल्याने एकाहून सरस एक जुनी-नवी गाणी रसिकांना ऐकायला मिळाली. ज्यामध्ये “मोरया-मोरया”, “जयोस्तुते”, “या जन्मावर या जगण्यावर”, “शुक्रतारा मंद वारा” सारख्या सुमधुर मराठी गीतानंतर “आओ हुजूर तुमको”, “मेरे सपनो कि रांनी”, “फिर वही रात है”, “आप कि नजरो ने समझा”, “गाता रहे मेरा दिल”, “न जा कहि अब ना जा”, “लाखो है निगाह मे”, “इशारो इशारो” , “कुहू कुहू बोले”, “बेखुदी मे सनम”, “जिंदगी कैसी है पहेली हाये”, “यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी”,”बाबू समझो इशारे”, “तुम मुझे यु भुला ना पाओगे”, “जाईये आप कहा जाएंगे”, “होटो मे ऐसी बात मै”, “तुम दिलकि धडकन हो”, “बचना ए हसीनो”, “प्यार तुम्हे इस मोड पे ले आया”, “लागा चुनरी मे दाग” या भैरवीने “अनुभूती” या अविस्मरणीय कार्यक्रमाची सांगता झाली.