Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०२, २०२३

डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत

नागपूर:
ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुरू असतांना ओबीसींच्या जनगणनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात डॉ ऍड अंजली साळवे आणि भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनने दाखल केलेल्या याचिकेमुळे ओबीसींना न्याय मिळेल असा विश्वास डॉ ऍड अंजली साळवे यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरु झाली आणि त्यापाठोपाठ देशाच्या इतरही राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील डॉ ऍड अंजली साळवे यांनी 2019 सालापासून ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी विविध स्तरावर आंदोलने आणि निवेदनेच नव्हे तर विधिमंडळात ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करून तो केंद्राकडे पाठवण्याची मागणी करत केंद्र जर ओबीसी गणना करत नसेल तर ती राज्यांनी करावी ही मागणी लावून धरली त्याला प्रतिसाद म्हणून 2020 ला तत्कालीन राज्य सरकार द्वारे ओबीसी जनगणना ठराव पारित झाला, परंतु केंद्राने तो फेटाळून लावला. डॉ साळवे यांनी कित्येक खासदारांमार्फत ओबीसी जनगणनेचा लढा संसदे पर्यंत पोहोचवित सर्वोच्च न्यायालयात देखील आपला लढा सुरु केला.

जनगणना कायद्यानुसार देशातील राज्यनिहाय लोकसंख्येची माहिती एकत्रित करणे, तसेच वर्ग, जाती, उपजाती आणि तत्सम माहिती सरकारद्वारे गोळा करणे अपेक्षित आहे व त्याआधारे जनतेसाठी शासकीय योजनांची आखणी, धोरण निश्चिती, त्यांचे नियोजन व अंमलबजावणी करायची असतांना सरकार जवळ मागासवर्गीय घटकांचा नेमका आकडाच नसतांना इतकी वर्षे कोणत्या आधारावर या घटकांसाठी नियोजन केले जात आहे हे एक कोडंच असल्याचे मत डॉ साळवे यांनी व्यक्त केल आहे.

मागासवर्गीयांना केवळ वोट बँक म्हणून वापरलं जातं आहे, परंतु त्यांची नेमकी संख्या किती आहे, याबाबत कोणीही ठोस भूमिका सरकार घेत नसल्याचे शल्य आहेत, भारतीय राज्य घटना तसेच जनगणना कायद्यानुसार इतर मागासवर्गिय घटकांची जनगणना होणे अपेक्षित असतांना अनुसूचित जाती - जमाती सोबतच इतर मागासवर्गियांची सुद्धा स्वतंत्र जनगणना होणे अपेक्षित आहे. इतर मागासवर्गियांच्या जनगणनेच्या घटकांचा मुद्दा जनगणनेत दुर्लक्षित केल्या जात असल्याने दिवंगत ऍड भगवान पाटील व इतरांनी दाखल केलेल्या 2001 व 2011 च्या याचिकेला पुनर्जीवित करण्यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये मध्यस्थ म्हणून मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता, उच्च न्यायालयात त्यांचे सहकारी ऍड अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

ओबीसी जनगणनेची न्यायालयीन लढाई अधिक सशक्त व्हावी यासाठी डॉ ऍड अंजली साळवे यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटने सोबत काही कायदेशीर डावपेचा अंतर्गत मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. सोबतच इतर राज्याच्या ओबीसी जनगणनेची प्रकरणे मा.सर्वोच्च न्यायालयात एकत्र असल्याचे डॉ. साळवे यांनी सांगितले. ओबीसी घटकांचा समावेश जनगणनेच्या प्रश्नावली नमुन्यात होईस्तोवर प्रस्तावित जनगणनेला स्थगिती देण्यात यावी सोबतच यासंदर्भात इतरही योग्य वाटत असेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निगर्मित करण्याची प्रार्थना या अर्जात त्यांनी केली आहे.

ओबीसीची स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी ‘जनगणना 2021 मध्ये ओबीसी (व्हीजे, एनटी, डिएनटी, एसबीसी) चा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ अशी पाटी लावा मोहिम सुरु करणा-या डॉ साळवे यांच्या प्रयत्नांना सामान्य ओबीसी नागरिकांकडून उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत असून या मोहिमेचे लोण आता विदर्भासोबतच संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. मंडल आयोगाच्या शिफ़ारसीनुसार माजी पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या सरकारने ओबीसीसाठी लागू केलेल्या आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर डॉ ऍड अंजली साळवे यांची ओबीसी जनगणना 2021, न्यायालय, संसद, विधीमंडळ, पाटी लावा ही मोहीम ऐतिहासिक ठरली आहे. प्रस्तावित जनगणनेत इतर मागासवर्गिय घटकांची स्वतंत्र गणना झाल्यास आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या या उपेक्षित घटकांना जनगणनेत यथोचित स्थान मिळेल व लोकसंख्येच्या अनुपातात त्यांना त्यांचा हक्क मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.