Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ०८, २०१३

आंबेडकरी विचारवंत, कवयित्री डॉ. ज्योती लांजेवार यांचे निधन

नागपूर -  आंबेडकरी विचारवंत ज्येष्ठ कवयित्री डॉ. ज्योती बाबूराव लांजेवार यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 63 वर्षांच्या होत्या.  उद्या सकाळी 10 वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईल.

डॉ. ज्योती लांजेवार या मराठी वाङमयप्रेमींना आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना सुपरिचित आहेत. नागपूर येथील बिझाणी महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या अलीकडेच निवृत्त झाल्या होत्या.
दिशा, शब्दनिळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन हे कवितासंग्रह आणि आजची सावित्री, पक्षीण आणि चक्रव्यूह हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह, फुले-आंबेडकर आणि स्त्रीमुक्ती चळवळ, दलित कादंबरीतील स्त्रीचित्रण, भारतीय समाज आणि स्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरीचा गोंधळ, दलित साहित्य चळवळ व दिशा, साहित्यातील स्त्रीवाद आदी वैचारिक समीक्षा संपादने तसेच माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या लेखनाची इंग्रजी, जर्मन, स्वीडीश ऑस्ट्रियन, सिहली, नेपाळी आदी भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. आजवर त्यांना बी. सी. मर्ढेकर काव्य पुरस्कार, डॉ. आंबेडकर फेलोशिप, लोकमित्र पुरस्कार, पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार,  हिदी साहित्य अकादमी पुरस्कार, शासनाचा दलितमित्र पुरस्कार, साहित्य संघाचा शरच्चंद्र मुत्ति*बोध काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.


25 नोव्हेंबर 1950 ला इमामवाडा येथे बोंदाटे कुटुंबात ज्योतीताईंचा जन्म झाला. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण मॉरिस कॉलेजमध्ये झाले. बिंझाणीनगर महाविद्यालयात त्या मराठी विभागाच्या प्रमुख होत्या. लिखाणातून वैचारिक क्रांती सुरू असतानाच त्यांच्या वाट्याला पुत्रशोक आला. काही वर्षांपूर्वी ज्योतीताईंचा मुलगा निखिल याचे अपघाती निधन झाले. त्यानंतर त्या कमालीच्या अस्वस्थ झाल्या. मुलाच्या मृत्यूविषयीचे आक्रंदन सातत्याने त्यांच्या लिखाणात झळकले. "एका झाडाचे आक्रंदन' या कवितासंग्रहात तरुण मुलाच्या निधनाने व्यथित झालेली आई स्पष्ट जाणवते. तरीही त्यांनी जिद्दीने कुटुंब सावरले आणि लिखाण सुरू ठेवले. चळवळीतील योगदानासाठी व लिखाणासाठी अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी आणि पदांनी त्यांना गौरविण्यात आले. विदर्भ साहित्य संघाचे संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनातील त्यांची प्रकट मुलाखत विशेष गाजली होती. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा येथील 60व्या साहित्य संमेलनाच्याही त्या अध्यक्ष होत्या.
विदर्भ साहित्य संघाच्या हीरकमहोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक डॉ. ज्योती लांजेवार यांची निवड करण्यात आली होती.
ज्योतीताई गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. आज पहाटे 3 च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले. परंतु, पावणेचारला त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाची वार्ता कळताच डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आशा सावदेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, मनोहर म्हैसाळकर, इसादास भडके आदींनी ज्योतीताईंच्या ट्रस्टनगर येथील निवासस्थानी भेट दिली. अंत्यसंस्कारासाठी आरपीआय नेते रामदास आठवले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आमदार अनिल गोंडाणे आदी मान्यवर नागपुरात दाखल होणार आहेत. त्यांच्या पश्‍चात डॉ. अपर्णा व डॉ. रिना या मुली, मुलगा ऍड. अखिल तसेच बराच मोठा परिवार आहे.
---------------------------------

         पुरोगामी विचारसरणीची लेखिका               

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या, ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ कवयित्री, लेखिका, समीक्षक आणि अलिकडेच नागपूर इथल्या महाविद्यालयातून मराठी विभागाच्या प्रमुख म्हणून निवृत्त झालेल्या प्रा. ज्योती लांजेवार यांच्या लेखनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आणि पगडा आहे. दलित स्त्री आणि चळवळीतील स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेले लेखन चळवळीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके इंग्रजी, जर्मन, स्वीडीश, ऑस्टियन, सिंहली, नेपाळी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरीत झाली आहेत.

दिशा, शब्द निळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन हे कवितासंग्रह, तसेच आजची सावित्री, पक्षीण आणि चक्रव्यूह असे कथासंग्रह लिहणार्या प्रा. ज्योती लांजेवार लेखिकेबरोरच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. अनेक चळवळीत भाग घेणार्या समीक्षापर अनेक पुस्तके लिहणार्या लांजेवार या नागपूर येथील बियाणी महाविद्यालयातून मराठी विषयाच्या विभागप्रमुख म्हणून त्या अलिकडेच निवृत्त झाल्या.

कथा आणि कविता संग्रहाबरोबरच प्रा. लांजेवार यांनी अनेक वैचारिक समीक्षापर लेखन आणि संपादन केले आहे. यात प्रामुख्याने समकालीन साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह, फुले-आंबेडकर आणि त्री मुक्ती चळवळ, दलित कादंबरीतील त्री चित्रण, भारतीय समाज आणि त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय कार्य आणि शौरींचा गोंधळ, दलित साहित्य चळवळ व दिशा, साहित्यातील त्रीवाद यांचा समावेश आहे. तर माझा जर्मनीचा प्रवास हे प्रवास वर्णनपर पुस्तकही त्यांनी लिहले आहे. त्यांच्या जर्मनीतल्या दीड महिन्याच्या वास्तव्यात आलेले अनुभव या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.

शाळेत असताना लिहायची आवड होती आणि हळूहळू ती आवड वाढत गेली. लहानपणापासूनच मी कविता करीत होते. मला जे सुचायचं ते लिहित मी होते. मला रोज येणारे अनुभव यावर मला जसं जसं सुचायचं तसं तसं मी लिहून ठेवायचे. शाळेत असताना सर्व स्पर्धेत मी भाग घेत असे आणि त्यानंतर कॉलेजमध्ये कथा कथन, कवितांच्या स्पर्धेत मी भाग घेतला. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये लिहिणं चालू ठेवलं. त्याकाळी मी लिहिलेल्या काही नाटय़छटा नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावरुन सादरही झाल्या आहेत. तर अस्मिता दर्शन वरुन मला त्यावेळी काव्यवाचन करण्याची संधीही मिळाली आहे. तेव्हापासून मला काव्य वाचनाच्या अनेक कार्यक्रमांसाठी बोलावणे येऊ लागले. त्यातून मलाही आनंद मिळत असल्याने मी काव्यवाचनाचे कार्यक्रम करू लागले. गेल्या 40 वर्षाहून अधिक काळ उलटला तरी मी लिहिते आहे, याचा मला आनंद आहे. आता जरी प्रकृती साथ देत नसली तरीही लेखनामध्ये खंड पडलेला नाही. कारण लेखन थांबवणे मला अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच आजही काहीतरी सतत लिहित राहते
मराठी साहित्यात मग ते काव्यवाचन, कविता, कथा आणि कादंबरी असो, या सर्व प्रकारात भाषेचे खूप महत्त्व आहे. मराठी विषयच आपण शिकवित असल्याने याचा फायदा आपल्याला आपल्या लेखनात झाला का ? यावर त्या म्हणतात की, शाळेत असल्यापासून मी कविता करीत होते. मात्र शाळेत असताना लिहिलेल्या कविता या नक्कीच बाळबोध होत्या. पुढे कॉलेजमध्ये कविता लिहित असताना भाषेची समज येत गेली, पुढे-पुढे भाषा कळत होती. त्यामुळे त्याचा उपयोग नक्कीच झाला आणि मराठी भाषेमुळे लेखनात निश्चितच प्रगल्भता आली, असे मी म्हणेन. प्राध्यापिकेचे म्हणाल तर प्राध्यापकी करताना आधी तुम्हाला स्वतंत्र अभ्यास करुन, वाचन करून मगच मुलांना शिकवावे लागते आणि त्यामुळे वाचन आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी प्राध्यापिकेसाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे लेखनासाठी माला याचा निश्चितच खूप मोठा फायदा झाला. मुळात आतापर्यंत माझ्या मनाला जे भावलं तेच मी लिहित गेले आणि लिहिते आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि त्यांनी केलेल्या लेखनाचा पगडा आहे आणि त्यामुळेच मी स्वतःला पुरोगामी विचारांची मानते. माझ्या मते भारतीय समाज आणि त्री हे पुस्तक लिहितानासुध्दा भारतीय स्त्रीबाबत केला जाणारा विचार, तिची समाजातील भूमिका या विषयी मी लिहिले आहे. माझ्या आगामी पुस्तकात महाराष्ट्रातील दलित त्रियांच्या चळवळी विषयी मी विस्तृत लेखन केले आहे. या पुस्तकात मी आजच्या स्त्रिया, त्यांचे सामाजिक चळवळीतील स्थान, तसेच चळवळीत भाग घेणार्या स्त्रियांचे संदर्भ यांचा समावेश केला आहे. विदर्भात आजही वेगवेगळया चळवळी सुरू आहेत, ज्यात स्त्रिया प्रामुख्याने भाग घेत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मिल मजदूर चळवळीचे देता येईल. या चळवळीत भाग घेणार्या स्त्रियांचे अनुभव मी या पुस्तकात मांडले आहेत. तर माझे दुसरे पुस्तक आत्मकथन असणार आहे. यात माझे चळवळीतले दैनंदिन अनुभव, स्त्रियांचे स्थान यावर यात सविस्तर माहिती असणार आहे. माझी आई सुध्दा या चळवळीत काम करीत असल्याने मी चळवळीचा प्रवास अगदी लहानपणापासून खूप जवळून बघितला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे घडलेल्या प्रा. लाजेवार यांना बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची झालेली शकले मनात सतत सलत असतात, त्यामुळेच चळवळीत काम करताना रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासाठी त्यांनी स्वतः अनेक स्तरावर प्रयत्न केले. मात्र अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांमुळे दुर्दैवाने रिपब्लिकन ऐक्य अनेकदा प्रयत्न करूनही होऊ शकले नाही.
आपले चळवळीतील कार्य आणि लेखन यातून समाजात परिवर्तन व्हावे, दलित समाजाचा उद्धार व्हावा हे उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी आतापर्यंतच वाटचाली केली आहे. हेच बाळकडून त्यांना त्यांच्या आईकडून मिळाले होते असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------

Dr Jyoti Lanjewar

Short Bio-sketch of the renowned Marathi poet Dr. Jyoti Lanjewar
Born in Nagpur, Maharastra, on 25thNovember 1950. She grew up in a family that had dedicated itself for social cause and upliftment.
She was educated at Nagpur where she did her masters, M.Phil and PhD. She has accepted a permanent position as professor and head of Marathi at SB City College, Nagpur and is serving till date.
Dr Jyoti Lanjewar needs no introduction in Marathi literature
She is a noted writer, critic, poet, feminist scholar and social activist. She has authored more than 14 books out of which 4 are poetry collections, and are 7 books on criticism,
Her poems have been translated in almost all Indian languages
And also foreign languages including Singhalese, Russian, German, Swedish and English. Her poetic works are taught at several universities both in India and abroad. Her poetry has been anthologized in several compilations and anthologies on Modern Indian poetry.
A singular compilation of her selected poems translated in English by Dr. Aparna Lanjewar Bose has come out in the form of the book ‘Red Slogans in the green grasses. published by Scion, Pune
A recipient of numerous literary awards and fellowships to name a few:
The Akhil Bhartiya Sahitya Mahamandal’s Vasanti Gadgil Award
The B.S. Mardhekar Literary Award conferred by the All India literary Academy, Dalit Mitra Puraskar, Government of maharashtra
Padmashri Daya Pawar Award, Aurangabad Mahanagarpalika Award for finest literary creation, Bangla Dalit Sahitya Akademi Award,
Dr. Ambedkar foundation Award, Canada,
Sharad Chandra Muktibodh Award, Hindi Rashtriya Sahitya Akademi Award, 2006, Gaya,
Anna Bhau Sathe Literary Award, 2007,
Kavivarya Suresh Bhatt Smruti Award, 2008, at National Book Fair, Delhi
The Doordarshan Sayadri’s Hirkani Award for outstanding achievement in Academic, Literary and Social field, 2008, MumbaiShe was invited as a writer in residence at Germany during the Frankfurt book Fair Oct-Nov 2006. She is the first Dalit women writer to be honored so.
She has also visited countries like Vienna, and Switzerland on invitations. She has held several social and literary workshops both at home and abroad

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.