Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ०९, २०१३

चंद्रपूर शहर ; मी पाहिलेला पूर

चंद्रपूर शहर दोन्ही बाजूंनी दोन नद्यांनी वेढलेले शहर असल्यामुळे पुराचे पाणी शहरात यायला सुरुवात होते. अर्धी वस्ती पाण्याखाली येते. अध्र्या रात्रीसुद्धा नावेत बसून घरे रिकामी करावी लागतात. नावाडीदेखील या कामासाठी सुसज्ज असतात.  
* रत्नप्रभा कपूर, औरंगाबाद 
(साभार- दिव्यमराठी )


मी लग्नानिमित्त चंद्रपूरला गेले, त्या वेळी मे महिन्याचा प्रखर उन्हाळा बघितला. तेव्हा लोक चंद्रपूरला सूर्यपूर म्हणू लागले. नंतर पावसाळ्याची चाहूल लागली. मेघ गडगडले, विजा कडाडल्या, बॉम्ब टाकल्यासारखा वीज पडल्याचा आवाज आणि आभाळ फाटल्यासारखी गर्जना करत रौद्र रूप धारण करून मुसळधार पाऊस तासन्तास चालायचा. कधी कमी, कधी जास्त असा पाऊस जवळजवळ दोन-अडीच महिने अखंडित सुरू होता.

चंद्रपूर शहर दोन्ही बाजूंनी दोन नद्यांनी वेढलेले शहर असल्यामुळे पुराचे पाणी शहरात यायला सुरुवात होते. अर्धी वस्ती पाण्याखाली येते. अध्र्या रात्रीसुद्धा नावेत बसून घरे रिकामी करावी लागतात. नावाडीदेखील या कामासाठी सुसज्ज असतात. पावसाळ्याचे तीन महिने मी चंद्रपूरला काढले. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला. बघ्यांची गर्दी वाढली. नदीकाठच्या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. अडीच महिने सूर्यदर्शनच झाले नाही. एखाद्या वेळी सूर्य डोकावलाच, तर काळे ढग त्याला आडवे येत होते. निसर्गाचा असा खेळ सतत चालू होता. त्यामुळे दिवसादेखील अंधार पडत होता. सूर्यदर्शन तर झालेच नाही, त्याप्रमाणे एकाही चतुर्थीला चंद्रदर्शनही झाले नाही. चंद्र आणि चांदणे आभाळामागे लपलेले दिसायचे. आकाशात तीन महिने मेघांचे साम्राज्य पसरलेले होते. दिवसा सूर्याची प्रभा आणि रात्री चंद्राची आभा दिसायची.

एक शोकान्तिका : पुरामुळे घरांची परझड, सामान नदीत वाहून जाणे, वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडणे अशा कित्येक घटना रोज ऐकण्यात, वर्तमानपत्रात, टीव्हीमध्ये दिसत होत्या. त्या वेळी मुख्यमंत्र्यांचे आगमनही झाले होते. पावसाच्या पुराची एक शोकान्तिका मी बघितली. सातवीत शिकणारी चार मुले, पूर पाहण्यासाठी निघाली. चौघेही पाण्यात उतरले. काही वेळाने तिघे बाहेर आले; परंतु एक मुलगा पाण्यात बुडाला आणि नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. ती तीन मुले घरी परत आली; परंतु त्या मित्राच्या आईला त्यानं काही सांगितलं नाही. त्याची आई घरी वाट पाहत होती. नंतर ती आपल्या मुलाच्या मित्रांच्या घरी विचारपूस करायला गेली. तेव्हा भीतभीत त्या मित्रांनी घटना सांगितली आणि त्या मातेने टाहो फोडला. सर्वांचेच डोळे पाणावले. त्या मित्रांनी लवकर सांगितले असते, तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते.

असाही पाहुणचार : माझी मुलगी एका फुल विक्रेत्याकडून नेहमी हार-फुले घ्यायची. एक दिवस तो फुलवाला म्हणाला काकू, पाऊस वाढला, नद्यांना पूर आला, तर आमच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्या वेळी मी माझ्या परिवारासह तुमच्या घरी राहायला आलो तर चालेल का? माझ्या मुलीने त्याला होकार दिला. नेमके तसेच झाले. त्याने कोणाच्या तरी घरी सामान हलवून आमच्या घरी बस्तान मांडले. त्याच्यासोबत त्याची बायको आणि आई होती. मुलीनेही आनंदाने त्याला घरात राहायला जागा दिली. सकाळचा चहा, नाष्टा, दोन्ही वेळा जेवण, रात्री झोपण्याची व्यवस्था सर्व करून दिले. माझ्या मुलीचा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे ते कुटुंबसुद्धा मनमोकळेपणाने राहिले. दुसर्‍या दिवशी साजूक तुपातील शिर्‍याचा पाहुणचार झाला. दोन दिवसांनी पूर ओसरला. जाताना मुलीने त्या फुलविक्रेत्याच्या बायकोची ओटी भरली. त्याचे कुटुंबीय कृतज्ञता व्यक्त करून घरी गेले.
या घटनेमुळे मलाही माझ्या मुलीचा अभिमान वाटला. आपल्या संस्कृतीत 'अतिथी देवो भव:' म्हणतात. याचा मी चांगलाच अनुभव घेतला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.