ताडोबातील वन्य प्राण्यांची संख्या वाढली; कारण जाणून घ्या
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba-Andhari Tiger Reserve) |
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba-Andhari Tiger Reserve) अनेक गावांचे मागील पाच वर्षात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले आहे. या स्थलांतरणामुळे ताडोबातील वन्यजीव मोठ्या संख्येत वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर नवीन गवताळ प्रदेशातील पर्यावरणाच्या आरोग्याची पाहणी करण्यासाठी चंद्रपूरचे अभ्यासक व अशासकीय संस्थांचे पदाधिकारी यांनी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ताडोबाच्या कोर भागातून स्थलांतरित झालेल्या गावांच्या जमिनीवर पाहणी केली. ताडोबातील गावांच्या पुनर्वसनानंतर नवीन गवताळ मैदाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक विलास सोयाम व वनरक्षक यांनी शेतांच्या पाहणी दौऱ्याला संबोधित केले. नव्याने पुनर्स्थापित गवताळ प्रदेश सर्व प्रकारचे वन्यजीव आणि शिकार प्रजातींसाठी आवश्यक चर, लपण्याची आणि प्रजननासाठी जागा प्रदान करतात. काही वनौषधी, झुडुपे आणि जंगली शेंगायुक्त वनस्पतींचे सतत आच्छादन असलेल्या गवताळ प्रदेशात वनस्पतींचे प्राबल्य असलेले विशिष्ट क्षेत्र आहेत. लहान, मध्यम आणि उंच असे तीन प्रकारचे गवत या गावांच्या क्षेत्रात विकसित करण्यात आले आहे. १९७२ च्या सुमारास खातोडा आणि पांढरपौनी, २००६ च्या सुमारास बोटेझरी आणि अर्धे कोळसा यानंतर मागील काही वर्षात जामणी, पळसगाव, रामदेवी नवेगाव, रानतळोधी इत्यादी गावांचे यशस्वीरित्या कोर क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे.
येथील गवत आणि वनस्पतींची मुळे जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून ठेवतात आणि उन्हाळ्यात त्याचे बाष्पीभवन होण्यापासून रोखतात, ज्यामुळे जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास खूप मदत होते. ताडोबा सुमारे ८८५ हेक्टर गवताळ प्रदेश व्यापतो हा भूभाग ताडोबातील एकूण भूमीच्या नऊ टक्के इतका आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात नैसर्गिक गवताळ प्रदेश नाही. मात्र नवेगाव, जामनी, पांढरपौनी आणि पळसगाव या गावांच्या पुनर्वसनानंतर नवीन गवताळ प्रदेश विकसित आणि शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले आहे. ताडोबातील नवेगाव, जामनी, पांढरपौनी आणि पळसगाव परिसरातील गावांच्या जमिनीवर या गवतांची वाढ करण्यात आली. एकट्या नवेगाव रामदेगी येथील आधीच्या २३० हेक्टर जमिनीवर २४ विविध प्रजातींचे गवत विकसित करण्यात आले आहेत. त्यांची मराठी नावे मोथा मारवेल गवत, लहान मारवेल गवत, रवी गवत, शिक्का गवत, मोशन गवत, कुसल गवत, घोन्याल गवत, वतन गवत, पडायळ गवत, सुरवेल गवत, रान बाजरी गवत, दतड गवत, देवधन गवत, रानतुर गवत, रानमूग गवत, हेटी गवत, डूब गवत, रान बरबती, गोंडली गवत, जंगली नाचणी, कावळा फळ, बेर गवत, दुर्वा गवत अशी आहेत. तसेच निरुपयोगी गवत काढण्यासाठी, ते वेळेवर ओळखून फळ लागण्यापूर्वी ते वर्षातून दोन ते तीन वेळा उपटले जाते. त्यामध्ये भुतगंजा, तरोटा, चिकना, लेंडुळी, चिपडी, आघाडा, पांढरा चिकवा, फेत्रा गवत, कोंबडा गवत, दिवाळी गवत, गाजर गवत, रेशीम काटा या प्रजाती काढल्या जातात. मोहा, बोर, बेहडा, आवडा, आंबा, जांभूळ, चीच, सीताफळ, जांब, लिंबू, फणस, उंबर, बांबू, कडू निंब, वडाचे झाड, पिंपळाचे झाड, फेत्रा, सिंदू, इंग्लिश चिच, पाकळी झाड, फणस झाड ही फळे आहेत. अशी फळझाडंही तिथे दिसली. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात सकाळ-संध्याकाळ दोन ते तीन हजार सांबर, चितळ या स्तलांतरित झालेल्या गावांच्या आधीच्या जमिनीवर पाहावयास मिळतात. जंगलातील तृणभक्षक प्राण्यांची संख्याच मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ताडोबाच्या अन्नसाखळीतील सर्वात वरच्या स्तरातील मांसभक्षक वाघ बिबट्यांचीही या परिसरातील संख्या वाढली हि ताडोबाची यशस्वी गाथा आहे.
गवताळ भूमीला भेट देणाऱ्यांत प्रा.सुरेश चोपणे व प्रा. योगेश दुधपचारे ग्रीन प्लॅनेट, सौरभ डोंगरे इअर्स फाऊंडेशन, अजय पोद्दार टीईआर ट्रस्ट फॉर इकोलॉजिकल रिस्टोरेशन, एचसीएस हॅबिटॅट कॉन्झर्व्हेशन सोसायटीचे दिनेश खाटे, शशांक मोहरकर, करण तोगट्टीवार, पिंटू उईके, सेव्हिंग अँड कॉन्झर्व्हिंग फॉरेस्ट (एससीएफ) ट्रस्ट आणि मोहम्मद सुलेमानचे मोहम्मद सुलेमान, सार्ड संस्थेचे भाविक येरगुडे, मनीष नाईक ट्री फाउंडेशन, तरुण पर्यावरणवादी संघटना शंकरपूरचे आमोद गौरकर आदी उपस्थित होते.