सावरटोला येथील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून,मासेमारीत, बीज उत्पादनात आघाडीवर.
नवेगावबांध दि.१३ नोव्हेंबर:-
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनीमोरगांव तालुक्यातील सावरटोला गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या उमरी सावरटोला या गावातील तलवाचे फिड संस्थे च्या मदतीने पुनरुजीवनाचे काम करण्यात आले आहे. तलावाच्या पुनर्जीवनाने जैवविविधता संरक्षण व संवर्धनाचे काम तर झालेच याबरोबरच मासेमारी चे उत्पन्न ही वाढले.त्याबरोबरच मुलकी मासे यांचे संवर्धन,पक्षी संवर्धन,संरक्षण असे विविधांगी विकासाबरोबरच पक्षीप्रेमी,मासे खवय्ये यांचेही लाड पुरविल्या जात आहेत. मनात आणले तर इच्छित कार्य कसे पूर्णत्वास नेता येईल.याची सरिता मेश्राम व झाशीराम मेश्राम यांचे तलाव संवर्धनाचे काम साक्ष देते.
आधी हा तलाव वीरान आणि ओसाड पडलेला असायचा. या तलावात पूरक वनस्पति चा अभाव व बेशरम वनस्पती चे बेसुमार वास्तव्य होते. त्यामुळे या तलावात पक्ष्यांनी सुद्धा पाठ फिरवली होती. पक्षी नामा मात्र राहायचे. पण या भकास,ओसाड तलावातील फिड संस्थेच्या मदतीने या बेशरम वनस्पतींचे निर्मूलन करून या तलावाची नांगरणी करून जैवविविधता असलेल्या व मुलकी माशाचे खाद्य असलेल्या वनस्पतीची लागवड करण्यात आली.त्यामुळे या तलावाच्या सौंदर्यात व मुलकी मासोळ्यात भर पडली. सुंदरता वाढली,आज हा तलाव सौंदर्याने नटलेला दिसतो.या तलावात ४३ प्रकारच्या वनस्पति व २१ प्रकारचे पक्षी आढळतात, नव्हे वास्तव्याला राहतात.
ग्रामीण भागातील तलावाचे पुनर्जीवन करण्याचे काम करणाऱ्या फीड या संस्थेने
सावरटोला या गावातील ४.७८ हेक्टर,
उमरी क्रमांक १ तलाव ७.६४ हेक्टर,
उमरी क्रमांक २ बिड तलाव ४.७९ हेक्टर,भुरसी तलाव १७.८८ हेक्टर मधील तलावाचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. या तलावांच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी केला जातो फिड या संस्थेने हे तलाव पुनर्जीवनाचे काम हाती घेऊन या तलावांच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. तसेच जैवविविधता जोपासणाऱ्या चिला,चौरा,गाद,परसुड,कमळ,उरसुडी,शिवणीफुल अशा
अनेक वनस्पतींची लागवड स्थानिक ढिवर समाजातील महिला भगिनींनी केली ,मुलकी मासोळ्या
करवळी,पेरसी,वाईर,दाळक,मोलवार,भुरभुसा,गहंदी,वागुर,शिंगुर,झामडी,
पोष्टी,गणी,चाचे वागूर, सिंगूर, दाळक, मरळ, भाडर, डुक्कर, वारेंजा, काटवा, जली काटवा, बोल्या, करवळी, चांदनी, तंबू, बाम, गहंदी, पेरसी, पोस्टी, कुणूस, कणास, मुलकी रोहू, चाच्या, बोटरी, बिलोना, गणी, तुरजुना, लोंटी आदी नष्टप्राय होऊ पाहिलेल्या व दुर्मिळ होत चाललेल्या मुलकी मासोळ्या चे संवर्धन या तलावात करण्यात आले.
आज पक्षांचे माहेरघर या ठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे हे तलाव पक्ष निरीक्षण करणाऱ्या व अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी व हौसी निरीक्षकांसाठी एक आनंदाची पर्वणीच झाली आहे.उमरी तलावात आज मीतीला स्थानिक पक्षी
नाकेर (comb duck),
सर्गा बाडा(northern pintail),
चांदी(common coot),
टिबुकली(little grebe),
लहान पानकावला(little cormorant),पांढरा कंकर(indian white ibis),
घोगोला फोड़या(asian open bill),
जांभळाला कोहलक(purple herron),मध्यम बगळा(mediam egret ),पांढरया छातीचा खंडया(white brested kingfisher ) हे स्थानिक पक्षी वास्तव्याला आहेत. मुळे लुप्त होऊ पाहणाऱ्या व दुर्मिळ होत असलेल्या अनेक स्थानिक पक्षांचे पुनर्जीवन संगोपन ,संरक्षण व संवर्धन आज या सर्व तलावात होत आहे. स्थानिक पक्षांबरोबरच अनेक स्थलांतरित पक्षी या ठिकाणी वास्तव्याला येत असतात. हिवाळ्याच्या काळात विदेशातून अनेक पक्षी ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात पासून स्थलांतर करून येथे येतात. ते यायला आज सुरुवातही झाली आहे.
उमरी तलावातील बाहेरुन येणारे पक्षी
पियु (pheasant tailed jacana),
पानपीपुलि(bronze winged jacana),
कलहंस(greylag goose) आधी पक्षी या ठिकाणी स्थलांतरित होऊन येत असतात. या काळात मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे हे पक्षी स्थलांतरित काळ आनंदात घालवितात त्यामुळे निसर्गप्रेमीसाठी पक्षी निरीक्षणाची ही एक अपूर्व संधी असते.फीड ही संस्था गेल्या 12-13 वर्षापासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात तलाव पुनर्जीवनाचे काम करत आहे. १२ मत्स्य सहकारी संस्था व 43 गावात जैवविविधता संरक्षण व संवर्धन या क्षेत्रात स्थानिक मासेमारी करणाऱ्या ढिवर वर समाज बांधवांना सोबत घेऊन ही संस्था काम करते पारंपरिक मासेमारी व त्यांच्याकडे असलेले ज्ञान हे लक्षात घेऊन मासेमारी उत्पन्न कसे वाढवता येईल यावर या संस्थेने भर दिला बंगाली मासोळ्यांनी या तलावातील वनस्पती नष्ट करून टाकली होती वनस्पती लागवड करून ढिवर समाजातील अज्ञान,अशिक्षितपणा, व्यसनाधीनता यापासून दूर करून मासेमारीचे उत्पन्न वाढविणे व या समाजाला आर्थिक रित्या संपन्न करणे याकडे विशेष लक्ष दिले जाते. तलावातील गाळ यंत्राच्या साह्याने काढण्यात येत असल्यामुळे तलावातील जैवविविधता,पूरक असलेले जीवजंतू नष्ट होत होते. पर्यायाने मासेमारीचे उत्पन्नही कमी होऊ लागले. त्याला पर्याय म्हणून मासोळ्यांचे खाद्य असलेल्या वनस्पतीची लागवड या उपक्रमांतर्गत केली जाते.मासेमारी हीच उपजीविका असलेल्या या समाजाला आर्थिकदृष्ट्या सबळ करणे हा उद्देश यामागे आहे. त्यांचाच सक्रिय सहभाग घेऊन हे काम पुढे नेले जात आहे. रोजगार,शिक्षण,आरोग्य यावरही भर दिला जात आहे.
.एक महत्त्वाचा काम संस्थेच्या मदतीने पहिल्यांदाच सुरु झाले आहे.सरिता मेश्राम व त्यांच्या सोबतीला १५ महिलांचा गट , पेन व तलावामध्ये टाकी तयार करुन,मासेमारी करीत आहेत, मासेमारी क्षेत्रामधे महिला मत्सबिजपालन करतात स्वतः मासेमारी करतात. हे येथे उल्लेखनीय आहे.
पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात सक्रिय फिड संस्थेचे संस्था प्रमुख मनिष राजनकर ,यांच्या मार्गदर्शनाखाली, सामाजिक कार्यकर्त्या सरिता मेश्राम, जैवविविधता मित्र झाशीराम मेश्राम यांच्या पुढाकाराने, सरपंच युवराज तरोणे यांच्या सहकार्याने, हरीहर मासेमार सहकारी संस्था सावरटोला यांच्या पुढाकाराने करण्यात आले.सोसायटीचे अध्यक्ष सेवदास मेश्राम, सचिव यादोराव मेश्राम, सदस्य लक्ष्मण मेश्राम, थोटुजी मेश्राम,तथा काही सदस्य गण तसेच मासेमारी समाजातील महिला ,मंगला वलथरे,सारिका मेश्राम, सुलोचना मेश्राम, चेतना मेश्राम या महिलांनी स्वतः पाण्यात उतरून वनस्पती लागवड केली. जैवविविधता समितीचे अध्यक्ष पांडुरंग भोपे यांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यात फिड संस्थेचे कार्यकर्ते नंदलाल मेश्राम, दिलिप पंधरे,शालु,कोल्हे,कविता मौजे,विजय रूखमोडे,इंदिरा वेठी,तसेच वनस्पती तज्ञव्यक्ती पतिराम तुमसरे, ,जागेश्वर मेश्राम,कृपाल मेश्राम यांचे या कार्यात मोलाचे सहकार्य लाभले.
कोट
अज्ञान,अशिक्षितपणा व व्यसनाधीनता याच्या आहारी गेलेल्या ढिवर समाजाचे उत्पन्न वाढावे,त्यांनाही आर्थिक दृष्ट्या संपन्न करून, सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. या हेतूने या समाजातील तरुण मुले,मुली,महिला,पुरुष यांच्या बैठका घेऊन त्यांना तलावाचे पुनर्जीवन या कामात सक्रिय सहभागी करून घेतले.मासेमारीवरच उपजीविका अवलंबून असलेल्या या समाजात परिवर्तन दिसून येतो. मासेमारीचे उत्पन्न वाढले,शिक्षण,आरोग्य व रोजगार याबाबतची जागरूकता या समाजात आली. मासेमारीचे उत्पन्न वाढीबरोबरच जैवविविधता संरक्षण व संवर्धन करून आज हे सर्व तलाव देसी विदेशी पक्षांचे माहेरघर झाले आहे. आज या समाजातील पुरुष महिला सन्मानाने जगत आहेत याचेच मला समाधान आहे.
-सरिता मेश्राम,
सामाजिक कार्यकर्त्या सावरटोला.
कोट
हे सर्व काम करत असताना ,मासेमार सोसायटीच्या लोकांना जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ,काही कार्यक्रम घेण्यात आले,मुलकी मासे बंगाली मासे, यामधला फरक , ग्रामपंचायत कडुन जैवविविधता समिती चा ठराव करण्यात साठी बर्याचशा अडचणी यायच्या, कशाचा कचरा लावतेत तळ्यात असे टवाळक्या करायचे. जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण याचे महत्त्व आज टवाळखोरांनाही पटले आहे.आज ते सर्व बदलत चालले आहे, ग्रामपंचायत सरपंच, युराज तरोणे,ग्रामसेवक चिमणकर,तथा स्थानिक जैवविविधता समिती मदत करतात,सहभागी होतात, तलाव संवर्धन करण्याच्या कामांमध्ये.
-झाशीराम मेश्राम,
जैवविविधता मित्र सावरटोला.